प्रसार माध्यमातील विविध व्यक्तींवर मी लिहिलेल्या यश कथांचे “माध्यम भूषण” हे पुस्तक न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स तर्फे लवकरच प्रसिद्ध होत आहे. त्या पुस्तकातील एक यश कथा नायिका वासंती वर्तक यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची यश कथा पुढे देत आहे. वासंतीताईना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
दूरदर्शनच्या प्रतिभावंत वृत्तनिवेदिका, सूत्रसंचालक असलेल्या वासंती वर्तक यांनी मराठी साहित्याच्या अभ्यासक म्हणूनही आपली ओळख निर्माण केली आहे, ही खूपच कठीण पण अभिमानास्पद, अनुकरणीय अशी बाब आहे.

वासंती ताईंचे पूर्वाश्रमीचे नाव वासंती पटवर्धन असे आहे. त्यांचा जन्म १८ मार्च १९५६ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातीलच रेणूका स्वरुप मेमोरियल गर्ल्स हायस्कूलमध्ये (तेव्हाची मुलींची भावे स्कूल) तर महाविद्यालयीन शिक्षण स.प. महाविद्यालयात झाले. मराठी साहित्यात बी.ए. झाल्यावर पुढे त्यांनी पुणे विद्यापीठातून एम.ए.ची पदवी संपादन केली. तत्पूर्वी प्री डिग्रीला अर्थशास्त्रात सर्वोच्च गुण मिळाल्यामुळे बी.ए. ला अर्थशास्त्रच घ्यावे असा प्राध्यापकांचा आणि घरच्यांचाही आग्रह होता. पण नाटक, खेळ, वक्तृत्व, कॉलेजचे मासिक, अशा अनेक गोष्टीत रस असल्यामुळे मराठीचा अभ्यास सोपा जाईल म्हणून त्यांनी मराठी विषय घेऊन १९७५ साली बी.ए. तर १९७७ साली एम ए केले. याचा पुढे माध्यम क्षेत्रात त्यांना खूप फायदा झाला.
वासंतीताईंनी एम.ए. चा निकाल लागण्यापूर्वीच स.प.महाविद्यालयात शिकवण्यास सुरुवात केली. तिथे त्यांनी एक वर्ष शिकविले. दरम्यान, सप्टेंबर १९७७ मध्ये दूरदर्शनची निवेदिकेसाठीची जाहिरात पाहून त्यांनी अर्ज केला. त्यासाठी असलेली लेखी परीक्षा, स्क्रिन टेस्ट त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. स.प. महाविद्यालयात शिकविणे, दूरदर्शनच्या वृत्त विभागात भाषांतरकार म्हणून काम करणे आणि निवेदिका अशा तीन गोष्टी एकाच वेळी त्या करीत होत्या.

पुढे वासंती यांचा विवाह डिसेंबर १९७७ मध्ये विवेक वर्तक यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांनी एप्रिल १९७८ मध्ये स.प. महाविद्यालयातील काम सोडून दिले. पती विवेक अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, आयआयटीतून सुवर्णपदक मिळवून इंजिनियर झालेले होते. दोघांचेही करिअर त्यांना अत्यंत महत्वाचे वाटायचे, त्यामुळे विवाहानंतरही वासंती वर्तक यांचे दूरदर्शनवरील निवेदन सुरुच राहिले.
वासंतीताई तीन वर्षे निवेदिका राहिल्यानंतर दूरदर्शनच्या वृत्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. गोविंद गुंठे, डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या पाठिंब्यामुळे वृत्त निवेदन करु लागल्या. खरे म्हणजे निवेदिका आणि वृत्त निवेदिका म्हणूनही त्यांची लेखी परीक्षा आणि स्क्रीन टेस्ट नंतर निवड झाली होती. पण कमी वयाच्या म्हणजे केवळ २१ वर्षांच्या असल्यामुळे वृत्त निवेदिका म्हणून त्या विश्वासार्ह वाटणार नाही म्हणून त्यांना फक्त निवेदिका म्हणून रहावे लागले.
निवेदनाची सवय असल्यामुळे, महाविद्यालयीन जीवनात वर्क्तृत्वाची अनेक बक्षिसे मिळाल्यामुळे वृत्त निवेदन सोपे जाईल असे वासंतीताईंना वाटत होते. पण स्टुडिओच्या उंबरठ्यापासून उभे असलेले हितचिंतक, रंगभूषा, वेशभूषा, वस्त्रभूषा यावर इतक्या कॉमेंटस् करत होते, वाचनाविषयी इतक्या सूचना चारी बाजूने अंगावर कोसळत होत्या की त्यांच्यावर भयंकर दडपण आले होते. स्टुडिओच्या अंधारात समोर असलेल्या कॅमेऱ्याच्या लाल दिव्यावर लक्ष केंद्रित करुन माणसांशी बोलल्याप्रमाणे सहजतेने बातम्या वाचणे, वाटले तेवढे सोपे नक्कीच नव्हते. बातम्या वाचून संपल्या तरी हात थरथरत होते. पण नंतर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव झाल्यावर ही धाकधूक संपली आणि फार आनंद झाला. पुढे त्यांनी सलग २००७ पर्यंत दूरदर्शनसाठी नियमितपणे बातम्या वाचल्या. त्यानंतर इतर मुलाखतींचे कार्यक्रम केले आणि आजही दूरदर्शन, आकाशवाणीसाठी मुलाखती घेणे चालू आहे.

वासंतीताईंची ही वाटचाल दिसते तेवढी सहजसोपी मात्र नाही. कारण त्यांना झालेली पहिली मुलगी मेंदू विकाराने आजारी होती. रोज रात्री दर १५ मिनिटांनी ती जागी होत असे. त्यामुळे तिच्याकडे बघावे लागे. साहजिकच वासंतीताईंची रोज रात्रीची झोप नीट होत नसे. त्यामुळे खूप ग्लॅमरस दिसणे, त्यासाठी विशेष लक्ष देणे असे काही त्यांच्याकडून होत नसे.
एकदा तर बातम्या वाचण्यापूर्वी १० मिनिटे आधी वासंतीताईना शेजारणी चा फोन आला. त्यावेळी नंदकुमार कारखानीस वृत्त संपादक होते, त्यांनी फोन हाती दिला, तेव्हा वासंतीताईंच्या शेजारणीने सांगितले, तुमची मुलगी पलंगावरून खाली पडली असून तिला खूप लागले आहे. रक्तस्त्राव जोरात चालू आहे, ताबडतोब घरी या. हे ऐकताच वासंतीताई खूप रडू लागल्या. केलेला सर्व मेकप खराब झाला. हे पाहून कारखानीस म्हणाले, तुम्ही लगेच घरी जा, मी बातम्या वाचतो ! पण घेतलेला वसा सोडायचा नाही म्हणून वासंतीताईंनी स्वत:ला सावरले, घाईत मेकअप केला आणि नेहमीप्रमाणेच बातम्या वाचल्या. हे पाहून कारखानीसही खूप हेलावून गेले. त्यांच्या डोळ्यातही अश्रु तरळले.
पुढे ही मुलगी पंधरा वर्षांची झाल्यावर वारली आणि एक अध्याय संपला. मोठी मुलगी चौदा वर्षाची असतानाच दुसरी मुलगी १९९१ मध्ये झाली. ही मुलगी आता एमबीए झाली आहे.
खरे म्हणजे, वासंतीताईंचे पती खाजगी कंपनीत उच्च पदावर नोकरीस होते, तोपर्यंत सर्व काही सुरळीत सुरु होते. पण स्वत:चा उद्योग उभारायचा म्हणून त्यांनी नोकरी सोडून दोन भागीदारांसह उद्योग उभारला. दुर्देवाने त्या दोघांमध्ये भांडणे होऊन पोलीस तक्रार झाली. पोलिसांनी कंपनीला सील ठोकले. दोन्ही भागीदार परदेशात निघून गेले.त्यामुळे घेतलेले एकत्रित कर्ज फेडण्याची वेळ विवेक वर्तक यांच्या वर आली. त्यांनीही पुढे वीस वर्षे हे कर्ज प्रामाणिकपणे फेडले. कर्करोगाने त्यांचे काही काळापूर्वी निधन झाले. जवळपास पाच वर्षे ते कर्करोगाशी झुंझत होते. पण त्यांनी कधी हार मानली नाही. पतीचा अत्यंत संयमी, शांत स्वभाव, वडिलांची, सासुबाईंची पूर्ण साथ यामुळेच आपण सर्व कठीण प्रसंगातून स्वत:ला सावरु शकलो, असे वासंतीताई कृतज्ञपणे म्हणतात.
माध्यमामध्ये राहिल्यामुळे खूप जग पाहता आले. आपल्यापेक्षाही किती लोक दु:खी कष्टी आहेत ते पाहिले की आपले दु:ख काहीच नाही असे त्यांना वाटायचे. सुदैवाने माहेर, सासरची सर्व मंडळी समजूतदार असल्याने मुलीकडे त्यांनी आत्मियतेने पाहिले. कधीही औषधांसाठी किंवा कशाहीसाठी पैसे कमी पडू दिले नाहीत वा कधी वासंतीताईंना दोषही दिला नाही.
प्रसार माध्यमांमध्ये राहूनही स्वत: प्रकाशझोतात न राहता इतरांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न वासंतीताईंनी सतत केला व करीत असतात. शेकडो जाहीर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. विशेषत: साहित्य विषयक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
माध्यमांचा प्रकाश स्वत:वर ओढवून न घेता इतरांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी वापरायला हवा असं त्यांना सतत वाटत आलं आहे. त्यातूनच त्या लेखनाकडे वळल्या. लोकसत्ता मधल्या ‘एकला चलो रे’ या सदरानं त्यांना उत्तम लेखिका म्हणून मान्यता मिळाली. एकल पालक म्हणून हिंमतीनं विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या स्त्रियांविषयीचे हे सदर होते. त्यातही सर्व आर्थिक स्तर, धर्म, जात, शैक्षणिक विविधता जपत या सदराचं रंगरुप रेखलं. त्यातून अशा वाटेवर चालणाऱ्या स्त्रियांना बळ मिळावे हाच उद्देश होता.
याशिवाय वासंतीताईचे उल्लेखनीय योगदान म्हणजे, जेव्हा “सर्व शिक्षा अभियान” सुरू झालं होतं तेव्हा त्या या अभियानाच्या माध्यम सल्लागार होत्या. त्यानंतर एका खाजगी कंपनीच्या सर्व शालेय अभ्यासक्रम मल्टीमीडियामध्ये टाकण्याच्या प्रकल्पातही सल्लागार म्हणून वर्षभर त्यांनी काम केले.
आकाशवाणी मुंबईची पहिली दैनंदिन मालिका “मंत्र जगण्याचा” ही जवळ जवळ दोन तीन वर्षे चालली. उमा दीक्षित त्याच्या निर्मात्या होत्या आणि डॉ विजया वाड यांच्या समवेत त्या सुद्धा एक लेखिका होत्या. एफ एम रेडीओ वर स्त्री केंद्रित, स्त्री कर्तृत्वावर आधारित अनेक कार्यक्रम लिहिले. त्या सुद्धा दैनंदिन मालिका होत्या. त्या मालिकेचे जवळजवळ २ हजार भाग त्यांनी लिहिले. या शिवाय आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या दिलखुलास कार्यक्रमात त्यांनी अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
आज प्रसार माध्यमांमध्ये मुली, महिला मोठ्या संख्येने येत आहेत, ही खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. माध्यमांच्या विस्तारामुळे मुलांनाही मोठ्या प्रमाणात संधी मिळत आहे. पण या सर्व नवोदितांनी “ग्लॅमरच्या आहारी न जाता समतोल जीवन जगले पाहिजे,” असे वासंतीताई म्हणतात. त्यांचा हा सल्ला केवळ नवोदितांनीच नव्हे तर माध्यमात कार्यरत असणाऱ्यांनी सुद्धा ध्यानी घेऊन, त्याचे आचरण करणे फार गरजेचे आहे.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800