नवी मुंबईतील सानपाडा येथील मिलेनियम टॉवर्स हे सिडको चे एक बहु प्रतिष्ठित, सर्व सुविधांनी युक्त, आदर्श असे गृह संकुल समजल्या जाते. या संकुलात ए विंग मध्ये ९ टॉवर, बी विंग मध्ये २ टॉवर, सी विंग मध्ये ३६ रो हाऊस आणि डी विंग मध्ये ४ टॉवर असे मिळून एकूण १२०० सदनिका आहेत. या शिवाय दुकाने, रुग्णालय, व्यायामशाळा, हॉटेल देखील आहे. सर्व जाती धर्माचे, विविध प्रांतातील नागरिक इथे गुण्या गोविंदाने रहात असून सर्व सण वार इथे वर्ष भर सर्वांच्या सहभागाने साजरे होतात.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते २००० साली या संकुलाचे भूमिपूजन झाले होते. संकुलाचा पहिला टप्पा २००२ मध्ये पूर्ण होऊन रहिवासी राहायला आले. तर संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम २००२ पासून सुरू होऊन मे २००५ मध्ये सर्व खरेदीदारांना त्यांच्या त्यांच्या सदनिकांचा ताबा देण्यात आला.
उत्कृष्ट नियोजन, बांधकामाचा चांगला दर्जा, रेल्वे स्टेशन, हाय वे पायी चालत जाण्या इतपत जवळ, तसेच वर्ष भर होत असलेले विविध कार्यक्रम, उपक्रम यामुळे हे संकुल रहिवाशांसाठी नेहमीच अभिमानाचा विषय ठरले आहे.

या वेळी मात्र या संकुलात गुडघा भर पाणी तुंबल्याने आणि ते बराच काळ राहिल्याने नागरिकांचे दोन दिवस बरेच हाल झाले. लिफ्ट च्या जागेत पाणी तुंबून राहिल्याने दोन्ही लिफ्टस बंद पडल्या. त्यामुळे तर ज्येष्ठ नागरिकांचे खूपच हाल झाले. या संकुलात काही टॉवर हे ११ मजली तर काही टॉवर हे १४ मजली आहेत. इतके मजले चढून जाणे येणे शक्य नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे फारच हाल झाले. अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी सुद्धा कुणी घराबाहेर पडू शकत नव्हते. लिफ्ट बंद पडल्याने स्वयंपाक करणाऱ्या मावशी, मोलकरणी सुध्धा घरात येऊ शकल्या नाहीत. सुदैव इतकेच म्हणायचे की, कुणी गंभीर रित्या आजारी पडले नाही, किंवा इतर काही दुर्घटना घडली नाही, अन्यथा काय अनावस्था प्रसंग ओढवला असता, याची कल्पनाही करवत नाही.

तसेच अनेक सदनिकांमध्ये गळती सुरू झाल्याने आता मूळ बांधकामाच्या दर्जा विषयी ही शंका उपस्थित होत आहेत.
या परिसरातील सर्व रस्ते, मैदाने, उद्याने सुध्धा बराच वेळ पाण्याखाली गेल्याने वाहतूकही बंद पडली होती.
हे असे का झाले ? भविष्यात पुन्हा असे काही होऊ नये यासाठी सिडको, नवी मुंबई महानगर पालिका आणि अन्य संबंधित असणाऱ्या यंत्रणांनी तातडीने उपाय योजना करणे फार गरजेचे आहे.

या बाबतीत जागरूक पर्यावरण कार्यकर्ते श्री बी एन कुमार यांनी त्यांची मते, निरीक्षणे विविध प्रसार माध्यमांद्वारे व्यक्त केली आहेत. माझ्याशी संपर्क साधून त्यांनी अधिक माहिती घेतली. तसेच शासन स्तरावर या समस्येबाबत पाठपुरावा चालवला आहे.
नवी मुंबईतील पुर परिस्थितीबाबत च्या बातम्या मुंबई येथून प्रसिद्ध होणाऱ्या फ्री प्रेस जर्नल, नवभारत, भास्कर, लोकमत या वृत्तपत्रांनी ठळकपणे प्रसिद्ध केल्याने या विषयाकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष जाऊन नक्कीच भरीव उपाय योजना होईल, अशी अपेक्षा आहे.

— लेखन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800