Tuesday, July 23, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ५३

मी वाचलेलं पुस्तक : ५३

“थेटरातील टाळ्या शिट्या”

गेल्या सप्ताहात ‘मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा’ या आवडत्या इतिहासाच्या पुस्तकाबरोबर तितक्याच आवडत्या चित्रपट जगतातील एक पुस्तक विरंगुळा म्हणून वाचायचं ठरवलं होतं. ते तिथंच मिळालं. त्या पुस्तकाचं नाव आहे ‘थेटरातील टाळ्या शिट्या’! लेखक आहेत चित्रपटसृष्टीवर सातत्याने लिहिणारे व अनेक साहित्य पुरस्कार मिळवणारे अभ्यासक- समीक्षक-सिनेपत्रकार श्री दिलीप ठाकूर. त्यांचे हे पुस्तक गेल्याच वर्षी प्रकाशित झाले. या पूर्वी त्यांची सुमारे ४५ हून अधिक पुस्तके याच चित्रपटसृष्टीवर, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, प्रेक्षक तसेच सिनेमाच्या विविध अंगावर लिहिलेली आहेत. त्यापैकी मोजकी पुस्तके मी यापूर्वी वाचली आहेत. विविध नियतकालिकांतून त्यांचे लेखही नित्य प्रकाशित होतात. या पुस्तकाचे कुतूहल वाटल्याने ते एका दिवसात समग्र वाचून काढले. चित्रपटांचा एक प्रेक्षक म्हणून मला हे पुस्तक खरोखरीच आवडले !

या पुस्तकात नेमके काय आहे तर चित्रपटाचा प्रेक्षकांच्या भुमिकेतून चित्रपटाच्या वाटचालीत प्रेक्षकांची ‘भावना व भूमिकेवर’ त्यांनी प्रकाश टाकला आहे. चित्रपट हे शेवटी प्रेक्षकांसाठी निर्माण होत असतात. त्यांना आवडला तर हमखास यशस्वी घौडदौड आणि नाही आवडला तर खेळ संपला. फ्लाॅप शो ! लेखकाने ‘एक प्रेक्षक’ म्हणून अगणित प्रेक्षकांच्या भावना कळत नकळतपणे या पुस्तकातून व्यक्त केल्या आहेत.

पहिल्याच लेखाचे शिर्षक आहे ‘यह पब्लिक है’.. यावरून पुस्तकाचा आशय स्पष्ट झाला आहे.

लेखक स्वतः मुंबईकर. त्यांना मुंबईचा अभिमान निश्चितच आहे. त्यांनी अगदी दुसऱ्याच प्रकरणात मुंबई चित्रपटसृष्टीला पोषक म्हणून काही काही गोष्टी रुजायला, वाढायला, फोफावयाला लागते, तशीच सुपीक जमीन, सुविधा, वातावरण लागते ते चित्रपट सुट्टीला मुंबईत भरभरून मिळाले, आजही मिळतेय, आणि पुढेही कायम मिळत राहील, असे म्हटले आहे.

आजच्या ग्लोबल युगात तशी चित्रपटात काय अगदी मालिका, रियालिटी शो, शाॅर्ट फिल्म, माहितीपट, गेम शो, जाहिराती, व्हिडिओ अल्बम, वेबसीरिज, ओटीटीसाठी चित्रपट यांच्या निर्मिती प्रचंड वाढ झाली असून त्यांच्या निर्मितीसाठीच्या गरजाही वाढल्या आहेत. शूटिंग स्पॉट पासून इंडोअर सेट उभारणे, मालिका असेल तर दीर्घकाळासाठी सेट उभारणे, याबरोबरच इतर अनेक तांत्रिक सोपस्कारसाठी अधिकच गरज वाढत जाणार आहे.आणि त्यासाठीच मुंबईतच हे मनोरंजन विश्व का रुजले, वाढले, फोफावले याचा विचार जर केला तर त्यासाठी थोडेसे फ्लॅशबॅक मध्ये जायला लागेल असे त्यांनी विशद केलं आहे आणि पुढची अनेक प्रकरणे लिहिली आहेत.

मुंबई चित्रपट सृष्टीचा पाया आणि त्यावरची इमारत उभी राहिली ती कशी याची देखील समग्र माहिती या पुस्तकात दिली आहे. मुंबईत एकेक करत अनेक स्टुडिओ उभे राहत होते आणि चित्रपट निर्मितीची वाढ होत गेली ती होतांना देशाच्या विविध भागातून कलाकार, लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मुंबईत येऊ लागले. कारण मुंबईतच संधी होती हा माध्यम व्यवसाय येथे मूळ धरत होता. त्याची वाढ होत होती तसं पाहिलं तर तीसच्या दशकात पुणे शहरात ‘प्रभात’ कोलकत्तात ‘न्यू थिएटर’ आणि मुंबईत ‘बॉम्बे टॉकीज’ यांनी चित्रपट निर्मितीचा पाया रुजवला. १९४३ मध्ये व्ही.शांताराम यांनी परळ येथे राजकमल कला मंदिर स्टुडिओची स्थापना केली. आपण फक्त पटकथा आणि संवाद घेऊन जायचे या, या स्टुडिओत शूटिंग पासून डबिंग, मिक्सिंग, रेकॉर्डिंग वगैरे तांत्रिक बाबी पूर्ण करून चित्रपट बाहेर येत होते. संपूर्ण चित्रपट निर्मितीचे ठिकाण म्हणजे स्टुडिओ अशीच व्याख्या व ओळख झाली होती. १९४८ मध्ये राज कपूर यांनी चेंबूर येथे ‘आर के स्टुडिओ’, कमाल अमरोही यांनी अंधेरीच्या महाकाली परिसरात भव्य ‘कमालीस्थान’ स्टुडिओ उभारला, शशधर मुखर्जी यांनी अंधेरीला ‘फिल्मीस्थान’ तर आंबोली येथे ‘फिल्मालय’ स्टुडिओ उभारला. नंतर मेहबूब खान यांनी बांद्रा येथे ‘मेहबूब’ स्टुडिओ उभारला, त्यानंतर अनेक निर्मात्यांनी बरेच स्टुडिओ उभारले. महाराष्ट्र शासनाने १९७८ साली सर्व सुविधांसह दादासाहेब फाळके ‘चित्रनगरी’ गोरेगावात निर्माण केली. हा संपूर्ण इतिहास लेखकाने विस्तृतपणे दिला आहे.

चित्रपटाच्या जवळ येणा-या मॅजिक लॅंटर्न ते डिजिटल कॅमेरा, बायस्कोप ते ओटीटी प्लॅटफॉर्म, पेपर कटिंग ते मोबाईल, तसेच हाताने रंगवलेली पोस्टर्स ते डिजिटल माईंड, कृष्णधवल सिनेमा, मॅटिनी शो, पहिल्या रांगेत बसून सिनेमा पहाण्याची प्रेक्षकांची क्रेझ, सिनेमाची वाट पहाण्याची रोमांचकता, लांबच्या लांब रांगा, गर्दित हरवलेलं थिएटर, जुने चित्रपटांचे शौकीन, पिक्चर कैसी है ? लागलं आणि पडलं. होर्डिंग्ज, सिनेमाचे तिकीटदर, चित्रपटातून निर्माण करण्यात आलेली फॅशन, गाॅसिप्स गोष्टी, सिनेमाची चोरी इत्यादी विषयांवर अनेक प्रकरणातून विस्ताराने लिहिले आहे ते पुस्तकातच वाचलेलं बरं !

पुस्तकाच्या “थेटरातील टाळ्या शिट्या” या शिर्षकावरून त्या सिनेमात नेमक्या कोठे पडतात याचाच परामर्ष आता मी घेत आहे. प्रेक्षकांच्या बोली भाषेत टाळ्या तेथेच पडतात. डायलॉग-संवादाला जास्त महत्व असतं ! “क्या डायलॉग मारा यार” असं म्हणणारे प्रेक्षक दैनंदिन जीवनात देखील प्रसंगानूरुप सिनेमातील डायलॉग मारत असतात. १९७५ नंतर या संवादाला फारच महत्त्व आलं. अनेक ठिकाणी एखाद्या सणासुदीला अथवा काही कारण नसतानाही लाऊड स्पीकर लागलाय “इसलिये के लोहा लोहे को काटता है… यहाँ से पचास पचास कोस दूर गाव मे जब बच्चा रोता है तो माॅं कहती है बेटे सो जा … सो जा नही तो गब्बरसिंग आ जाएगा’, ‘बहुत यारांना लगता हैं’ .. एव्हाना आपल्या लक्षात आले असेल की रमेश सिप्पी दिग्दर्शित १९७५ मधला सर्वकालीन सुपर हिट ‘शोले’चे जबर डायलॉग आहेत. या चित्रपटाच्या खणखणीत यशात अनेक लहान मोठ्या गोष्टींत सलीम जावेद यांचे धारदार संवाद, ते सादर करण्यातील प्रत्येक व्यक्ती रेखेतील कलाकारांची पद्धत आणि खास करून थेटर मधील ७० एमएम चा भव्य पडदा आणि स्टीरियोफोनिकचा वाटा फार महत्त्वाचा आहे. ‘शोले’ पिक्चर पब्लिकला आवडला आणि मग त्याचे डायलॉग असे काही सुपरहिट ठरले की त्याची तबकडी प्रकाशित करण्यात आली आणि त्याचीही विक्रमी विक्री झाली कॅसेटचे युग हळूहळू वाढत होते त्यातही शोले च्या डायलॉगला भारी मागणी होती. अगदी समाजकारण राजकारणातही एखाद्या संदर्भात ‘शोले ‘चा एखादा संवाद कोणीतरी देतोच ! तसं पाहिलं तर हिंदी चित्रपटातील डायलॉग गाजण्याची परंपरा तशी खूपच मोठी आहे. ‘केजीएफ २’ चे डायलॉगची जबरा क्रेझ निर्माण झाली. के.असिफ दिग्दर्शित १९६० मधील ‘मुगल ए आझम,’ चित्रपटातील संवादांना रसिकांची अतिशय उत्तम दाद मिळाली.

एका प्रसंगात ‘अकबर’ ची भूमिका करणारे पृथ्वीराज कपूर, ‘सलीम’ ची भूमिका करणारे दिलीपकुमार याला उद्देशून म्हणतो “हम एक लाडले बेटे के बाप जरूर है, लेकिन अपने बेटे के धडकते दिल के लिए, हम हिंदुस्तान की तकदीर नहीं बदल सकते” त्यावर सलीमही तितक्याच परखडपणे आपल्या पिताजींना सुनावतो “तकदीरे बदल जाती है, जमाना बदल जाता है ,मुल्लों की तारीख, इतिहास बदल जाता है, शहेनशहा बदल जाते है, मगर बदलती दुनिया मे मुहब्बत, जिसका दामन थाम लेती है, वो इन्सान नही बदलता…! थिएटर मध्ये टाळ्यांचा कडकडाट तर मी देखील प्रत्यक्षात अनुभवला आहे.

१९६५ मधील यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ चित्रपटातील राजकुमार ची व्यक्तिरेखा जोरदार संवादाने कडक ठरली “चिनाॅय सेठ, यह बच्चों के खेलने की चीज नही, हात कट जाए तो खून निकल आयेगा…” हा संवाद गाजला आणि अशाच शैलीत त्याने म्हटलेला “जिनके घर शीशे के होते है वो दुसरो के घर पत्थर नहीं फेका करते…” प्रचंड टाळ्या !

१९७१ साली हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद ‘मधील राजेश खन्नाची अखंड प्रचंड बकबक म्हणजे मुक्त डायलॉग बाजी आहे.त्यात जास्त गाजला.. “बाबू मोशाय, जिंदगी और मौत उपरवाले के हात में है, जहापनाह, उसे ना आप बदल सकते है ना मैं, हम सब तो रंगमंच की कठपुतलिया है,जिनकी डोर उपरवाले की उंगलियो में बंधी है, कौन कब कैसे उठेगा यह कोई नही बता सकता” हा भावपूर्ण संवाद तर आनंद चित्रपटाचे सारं आहे. याशिवाय “जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं”…”मैं मरेने से पहले मरना नहीं चाहता” असे राजेश खन्नामय झालेले अनेक लहान मोठे संवाद गाजले. ‘बावर्ची’ या चित्रपटात राजेश खन्नाचा असाच एक डायलॉग आहे.. “किसी बडी खुशी के इंतजार मे हम ये छोटी छोटी खुशियों के मौके खो देते है”…. सलीम जावेद यांच्या युगात पटकथा आणि संवाद यावर जास्त लक्ष केंद्रित होऊन हुकूमी टाळीबाज संवाद लिहिले जाऊ लागले.. प्रकाश मेहेरा दिग्दर्शित ‘जंजीर’ मधील अमिताभ बच्चन ने प्राणला उद्देशून म्हटले “यह पुलीस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं” या संवादाने अमिताभ बच्चनला स्टार केले. ‘दिवार’ मधील आणखी एक डायलॉग… “जाओ पहले उस आदमी का साइन ले के आओ जिसने मेरे बाप को चोर कहा था, पहले उस आदमी का साइन ले के आओ जिसने मेरी माॅं को गाली दे के नौकरी से निकाल दिया था, पहले उस आदमी का साइन ले के आओ जिसने मेरे हाथ पर लिखा था…. ये, .‌‌. उसके बाद मेरे भाई तुम जहाँ कहोंगे मैं साइन कर दुंगा”.. अमिताभचच ‘कालीया’ चित्रपटातील” हम जहां खडे होते हैं लाइन वही से सुरू होती है”… अशा जोरदार डायलॉगबाजीची अगणित उदाहरणे सांगता येतील. अनेक मिमिक्री कलाकारांना या डायलॉगनी भरपूर खाद्य दिले आहे आणि त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद ही मिळाला‌.

चित्रपट हे दृष्य माध्यम असले तरी आपल्या देशात ते प्रामुख्याने संवादाचे माध्यम म्हणून रुजले आणि अगणित विशेष संवादांना तसेच विशिष्ट संवाद शैलीला उत्तम लोकप्रियता मिळाली. हे डायलॉग चे महत्व येथेच थांबवतो.

चित्रपट संस्कृतीत दिग्दर्शक, निर्माता, गीतकार संगीतकार, गायक, वादक, कलाकार, तंत्रज्ञ, कामगार, स्टुडिओ, प्रदर्शक, वितरक थिएटर्स, मल्टिप्लेक्स, पूर्व प्रसिद्धी, समीक्षा, याबरोबरच सर्वात महत्त्वाचं म्हणजे रसिक प्रेक्षक चित्रपटाच्या यशापयशात फार मोठी भूमिका बजावू शकतात.त्यांना आवडलेला ‘पिक्चर ‘डोक्यावर घेतात.टाळया शिट्टयांनी थिएटर गाजवितात.आणि न आवडलेले पिक्चर बद्दल तर सांगणेंच नको ! शेवटी चित्रपटाचे भवितव्य प्रेक्षकच घडवतात.हेच अंतिम सत्य !

चित्रपट सृष्टीचा सर्वांगीण आढावा छान शैलीत लेखकाने घेतला आहे.या क्षेत्रात ‘स्ट्रगल’ करण्याची इच्छाशक्ती असलेल्या युवायुतींनी हे पुस्तक जरूर वाचावे, अभ्यासावे असे मी शेवटी म्हटल्यास वावगे होणार नाही.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नासिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. लेखकाने चित्रपट सृष्टीच्या घेतलेल्या आढाव्याचा सुंदर व सखोल आढावा श्री सुधाकर तोरणे सरांनी ह्या पुस्तक परिक्षण करतांना घेतली आहे. दिवसेंदिवस श्री तोरणे सरांची पुस्तक परिक्षणाची खोली वाढत आहे व वाचकाला पुस्तकाचे सार थोडक्या शब्दात वाचायला मिळते. श्री तोरणे सर पुस्तकातील लेखकाने लिहिलेल्या विषयांचं मर्म बरोबर शोधून प्रस्तुत करत असतात. श्री तोरणे सरांच व संकलन करणाऱ्या न्युज स्टोरी टुडेचे श्री भुजबळ सरांचे अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः