Tuesday, July 23, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ५५

मी वाचलेलं पुस्तक : ५५

इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स : ‘स्वप्नमीमांसा’

अलीकडेच स्वप्नांमध्ये कुतूहल जागृत झाल्याने यावेळी मी ‘इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स’-‘स्वप्न मीमांसा’ हे प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आणि मनोविश्लेषणाचे प्रणेते सिग्मंड फ्राॅइड यांचे पुस्तक वाचून काढलं. मराठी भाषेत या पुस्तकाचा अनुवाद डॉ. कमलेश सोमण व जीवन आनंदगांवकर यांनी केला आहे. हे पुस्तक म्हणजे फाॅइडच्या अगदी स्वतंत्र प्रतिभेतून निर्माण झालेला एक मौलिक ग्रंथच आहे.

आपली स्वप्ने हा अबोध मनाकडे जाणारा राजमार्ग असतो हे फ्राॅइडचं मत या पुस्तकाच्या वाचनातून लक्षात येते. स्वप्नांची रचना कशी बनते, त्यांची मूळ प्रेरणा कोणत्या प्रकारची असते यासाठी लेखकाने अपार कष्ट घेऊन स्वप्नमीमांसातून अनेक अद्भुत व आश्चर्यकारक मनोव्यापारावर चांगलाच प्रकाश पाडला आहे. यातही मानवाच्या व्यक्तिमत्त्व विकासात बाल्यावस्थेतील अनुभवांना मोठे स्थान असते हे निर्विवादपणे सुस्पष्ट केले आहे.

बालकांच्या मनातील लैंगिकतेचे आकर्षण व समलिंगी जन्मदात्याबाबतची विरोधी व शतृत्वाची भावना हे वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन विचारास चालना देणारे आणि तेवढेच सामान्य जनांच्या रुढीबध्द समजुतींना अनपेक्षित धक्का देणारे ठरते हा विचार पुस्तकाच्या वाचनातून लक्षात येतो.

या बाबतीत फ्राॅइडचं म्हणणं असं आहे, “स्वप्न हा वेषांतराचा एक प्रकार आहे. स्वप्ने ही इच्छापूर्तीची साधने असतात. स्वप्ने ही झोपेचे रक्षण करणारी आवश्यक अशी बाब असते. स्वप्नमीमांसा करून माणसांच्या अबोधापर्यंत सहज पोहोचता येते ; कारण स्वप्नात प्रतिकात्मक अभिव्यक्ती साधलेली असते. एकदा या प्रतीकांची भाषा उलगडली की, वरकरणी कितीही निरर्थक वाटणारे स्वप्न हे खोल अर्थाने भरलेले आहे, असे आपल्या लक्षात येते. माणसाच्या मनात दिवसा उत्पन्न झालेल्या इच्छा अथवा खोलवर दडलेल्या, लहानपणापासून तो मोठेपणापर्यंतच्या अतृप्त राहिलेल्या इच्छा, तसेच माणसाने दडपून टाकलेल्या, निरोधित केलेल्या वासना व इच्छा स्वप्नरूपाने व्यक्त होत असतात ; त्याचे अंशतः समाधान माणूस स्वप्नसृष्टी निर्माण करून मिळवीत असतो”

फ्राॅइडचं म्हणणं पुढे असं आहे की, “दडपून टाकलेल्या वासनांना माणसाच्या ‘अहम’ कडूनचा प्रतिकार झोपेतही चालूच असतो. तथापि त्या वासना- इच्छा तर दुर्दम्य असतात. त्यामुळे अहम व त्या वासना यांच्यात जणू तडजोड होते. अहम ला चालतील व खपतील अशा प्रतीकात्मक प्रतिमांचा अवलंब स्वप्नात केला जातो व अशा रितीने स्वप्नांची गुंफण केली जाते तेव्हा स्वप्न ही एक तडजोड असते. माणसाच्या निद्रेचा भंग होऊ न देता स्वप्नाद्वारे त्याच्या इच्छा समाधान पावतात व स्वप्न हे निद्रेचेही रक्षण करते. माणसाला झोपेतून दचकून उठवणारी जी दु:स्वप्ने पडतात, ती देखील इच्छातृप्तीच्या स्वरूपाचीच असतात ; इच्छा तृप्तीच्या दिशेने ती फारच पुढे गेलेली असतात इतकेच !”

विसाव्या शतकातील वैचारिक क्षेत्रात सर्वाधिक प्रभाव पडणारे विचारवंत म्हणून फ्रेड्ररिक नीत्शे, कार्ल मार्क्स, आणि सिग्मंड फ्राॅइड यांचा उल्लेख करावा लागेल. नीत्शेने ईश्वर, धर्म, इत्यादींच्या श्रध्दांना हादरे दिले.
कार्ल मार्क्सने अर्थकारण, समाज आणि संस्कृती-इतिहास, राजकारण आणि इतर संबंधित क्षेत्रात क्रांतीकारक विचार मांडले, तर फ्राॅइडने मानवी मनाच्या स्वरूपाचे अगदी अभिनव पृथक्करण करून माणसाच्या कार्यपद्धतीचे धक्कादायक रेखाटन केले. या तिन्ही विचारवंतांनी आपल्या विचारांनी विसावे शतक गाजवले यात शंका नाही.

फ्राॅइडने आपल्या शोधातून मानवी मनाचे तीन भागात म्हणजे ‘इगो’-अहम, सुपर ईगो-अत्यहम, इड म्हणजे इदम असे भाग केले आहे. ते आणि स्वप्नमीमांसेच्या विविध पध्दती, नमूना स्वप्नांचे विश्लेषण, स्वप्नांचे स्तोत्र, स्वप्नांचे कार्य, विकृती, स्वप्नांच्या हालचालींचे मानसशास्त्र, यावर जवळपास साडेचारशे पानांच्या पुस्तकात विस्तारपूर्वक विवेचन केले आहे ते प्रत्यक्षात वाचलेलं अधिक चांगले !

शेवटी स्वप्ने ही इच्छांची परिपूर्ती करीत असतात आणि आपल्या निद्रेचे-झोपेचे संरक्षण करीत असतात हेच खरे !

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नासिक.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. मानसशास्त्रज्ञ फ्राॅईड ह्यांच्या ग्रंथाचा अतिशय सुंदर अनुवाद असलेले हे पुस्तक श्री.सुधाकर तोरणे सरांनी उत्तम परिचय करून दिल्यामुळेच वाचकांपर्यंत पोहोचले आहे. त्यासाठीच तोरणे सरांचे हार्दिक आभार आणि अभिनंदन 🙏💐

  2. स्वप्न सृष्टीचे इतके मार्मिक आणि लक्षवेधी विश्लेषण वाचून मनापासून आनंद झाला. फ्राॅईड ह्यांच्या मूळ ग्रंथाविषयी अनेकवेळा ऐकलेले आहे, पण तो ग्रंथ पेलण्याची आपल्या बुद्धीची कुवत नाही ,हे जाणून त्या वाटेला कधीच वळले नाही. परंतु त्या महान ग्रंथाचा मराठी अनुवाद वाचायला मिळेल ही आशा मनात जागी केली, इतकेच नव्हे तर हे मराठीतील पुस्तक वाचण्याची उत्कंठा वाटेल इतका सुंदर परिचय करून दिल्याबद्दल सुधाकर तोरणे सरांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन 🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः