Friday, December 6, 2024
Homeसाहित्यमी वाचलेलं पुस्तक : ५७

मी वाचलेलं पुस्तक : ५७

युवा वर्गाने वाचलेच पाहिजे असे पुस्तक “आम्ही अधिकारी झालो” आजकाल आपण पहातो की, साधी पोलीस शिपायाची भरती असो, की तलाठी पदासाठी भरती असो, या पदांसाठी आवश्यक असलेल्या पात्रतेपेक्षा किती तरी अधिक पात्रता धारण करणारे उमेदवार या कनिष्ठ पदांसाठी अर्ज करीत असतात. कनिष्ठ पदांसाठी इतकी झुंबड उडते, तर अधिकारी पदासाठी काय परिस्थिती असेल? याची कल्पनाच केलेली बरी.

अशा या युवा वर्गासाठी सार्थ मार्गदर्शन करणारे, विविध सेवा, पदांसाठी अधिकारी म्हणून निवडल्या गेलेल्यांचे मौलिक विचार, स्वानुभव आपल्याला “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकात वाचायला मिळतात.

निवृत्त माहिती संचालक, श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या व संपादित केलेल्या “आम्ही अधिकारी झालो” या अलीकडेच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठावरील सुरेश भट यांची कविता पुस्तकात काय आहे ते सांगून जाते. या पुस्तकात जवळपास ३५ अधिकारी यांच्या अतिशय अप्रतिम यशकथा देवेंद्रजींनी प्रामाणिकपणे, सत्यनिष्ठपणे साकारल्या आहेत. त्या नव्या पिढीतील जिज्ञासूंना अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक आहेत.याची खात्री प्रत्येक अधिका-याच्या यशकथा आणि त्यांच्या जीवनाचा परिचय यातून लक्षात येतो.

ग्रामीण भागातून आलेल्या, गरीब परिस्थितीवर संघर्ष करून मात केलेल्या अधिकाऱ्यांच्या यशकथा तर फारच वेधक आहेत. पुस्तकाची अनुक्रमणिका बघताच यश कथांचे वैविध्य लक्षात येते.

प्रारंभीच ‘अमीट नीला सत्यनारायण’ यांच्या काही आठवणी देवेंद्रजींनी उलगडल्या आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेबरोबरच कला, साहित्य, संस्कृती, गीत- संगीत, अशा विविध प्रांतामध्ये स्वतःचा ठसा उमटविलेल्या नीला सत्यनारायण यांचा एक कडक, शिस्तप्रिय कणखर निश्चय अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा लेखकाने साकार केली असून एक संवेदनशील कवी, गीतकार, लेखक, कलारसिक म्हणून त्यांची प्रतिभा ही उत्तम रितीने विशद केली आहे.

दुसरी यश कथा आहे, ती जी श्रीकांत यांची. कथेचे शीर्षक अतिशय बोलके म्हणजे “तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर” असे आहे. तिकीट कलेक्टर म्हणून नोकरी करीत ,त्यांनी कसे शिक्षण पूर्ण केले, वयाच्या तेविसाव्या वर्षी ते आय ए एस कसे झाले आणि त्यानंतर अत्यंत लोकाभिमुख, कार्यक्षम अधिकारी म्हणून कशी सेवा बजावत आहेत, याची लक्षणीय वाटचाल लेखकाने विशद केली आहे.

“विदर्भ कन्या झाली आयएएस” या शिर्षकाखाली देवेंद्र भुजबळ यांनी विदर्भातील एका गावातील असलेल्या श्रीमती भाग्यश्री बानायत यांचा सुरेख परिचय करून दिला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्या कशा आयएएस झाल्या व पुढे नागालँड राज्यात व महाराष्ट्रात नागपूर येथे रेशम संचालक म्हणून कसे भरीव योगदान दिले आहे, हे लेखकाने ओघवत्या भाषेत सांगितले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल भागातील दोघां सख्या भावांची ‘आय ए एस’ होण्याची कथा तर चित्तथरारकच आहे. सातवी पर्यंत घरात लाईट नसताना श्री चंद्रकांत डांगे, एम टेक तर त्यांचे बंधू प्रदीपकुमार हे व्हेटर्नरी डॉक्टर होऊन पुढे दोघेही डांगे बंधू उपजिल्हाधिकारी आणि पुढे आय ए एस कसे झाले ही तर एखाद्या चित्रपटाची शोभेल, अशी कथा आहे.

आपल्या मुलांचे करिअर घडविण्यात घरच्यांची भूमिका, पाठिंबा किती महत्वाचा असतो, हे आपल्याला “आईने घडविल्या आय ए एस मुली” या प्रकरणात दिसून येते.
हेमाली डाबी कांबळे, असे या आईचे नाव असून आपल्या दोघी मुलींना भारतीय प्रशासकीय सेवेच्या तयारीसाठी पूर्ण वेळ देता यावा म्हणून त्यांनी आपल्या उच्च पदाचा राजीनामा दिला आणि संपूर्ण लक्ष मुलींच्या ध्येयप्राप्तीच्या प्रयत्नांकडे दिले. त्याचे फळ म्हणुन मोठी कन्या टीना डाबी कांबळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिली आली आणि तिने सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले. तर तिची धाकटी बहीण रिया ही भारतातून १५ व्या क्रमांकावर आयएएस मध्ये उत्तीर्ण झाली.

“मजुराची मुलगी झाली आय ए एस” या यश कथेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेत स्वाती मोहन राठोड ही ४९२ क्रमांकावर उत्तीर्ण झाली. स्वातीचे वडील बांधकामाच्या ठिकाणी मोलमजुरी करायचे. वेळप्रसंगी भाजी विकून, दागिने गहाण ठेवून, आपल्या चार मुलांना मोठ्या जिद्दीने शिकविणाऱ्या या बंजारा समाजातील राठोड दांपत्याची मुलगी स्वाती एम.ए झाल्यावर पाच प्रयत्न केल्यावर आय ए एस झाली. तिच्या उदाहरणावरून दिसून येते की आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, परिस्थिती किती जरी प्रतिकूल असली तरी आपल्या ध्येयापोटी निष्ठा प्रखर असेल, आपल्यात जबरदस्त चिकाटी असेल, तर यशस्वी झाल्या वाचून राहत नाही.

तर “दारू विकणारीचा मुलगा झाला आय ए एस” यातील नायक आधी डॉक्टर होतो, नंतर आयपीएस,आय ए एस परीक्षा उत्तीर्ण होऊन नंदुरबार जिल्ह्याचा कलेक्टर होतो, अतिशय अचंभित करणारी कहाणी आहे साक्री तालुक्यातील सामोदे गावच्या डॉ.राजेंद्र भारूड यांची !
प्रसंगी परिस्थितीचा बाऊ करणाऱ्या आई वडील, नशीब, परमेश्वर यांना दोष देणाऱ्यांनी डॉ.भारुड यांचे उदाहरण सदैव आपल्या डोळ्यासमोर ठेवले पाहिजे असे लेखकाने म्हटले आहे.

“बिच्छु टेकडी ते दिल्ली” तील पल्लवी चिंचखेडे हीची कथा तर फार रोमांचकारी आहे. पल्लवी राहते तो परिसर बिच्छू टेकडी म्हणून अमरावतीत प्रसिद्ध आहे. अजूनही या परिसराचा विकास झालेला नाही. या भागात विंचू खुप निघतात म्हणून या टेकडी ला बिच्छू टेकडी म्हणतात.
वडील पेंटर व आई शिवणकाम करते. अशा परिस्थितीत पल्लवी इंजिनियर होऊन पुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिची दिल्लीत भारतीय कम्युनिकेशन फायनान्स सर्व्हिससाठी निवड झाली आहे.

अकोला जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबातील ऋषिकेश विजय ठाकरे या तरुणाची ‘आधी आय आय टी मग आय ए एस’ या नावाचे शिर्षकांतून त्याची कथा उलगडते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२३ मध्ये झालेल्या परीक्षेत तो २२४ क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

सध्या लातुरच्या पहिल्या महिला कलेक्टर असलेल्या वर्षा ठाकूर-घुगे यांचे यश असेच आहे. या अगोदर त्यांनी नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यश संपादन केले आहे. मराठवाडा विभागातून पहिल्या महिला उप जिल्हाधिकारी म्हणून निवडल्या जाण्याचा मान ही त्यांनी मिळविला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडीचा शुभम पांडुरंग जाधव, हा शेतकऱ्याचा मुलगा आय पी एस झाला. आता तो पश्चिम बंगाल राज्यातील पूर्व वर्धमान येथे सहपोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहे.

“ग्रामकन्या ते आय पी एस” या कथेच्या नायिका, तेजस्वी सातपुते या नगर जिल्ह्यातील एका गावात शिकून कशा आय पी एस याची रंजक कथा असून कोरोना च्या काळात त्यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदी कसे उल्लेखनीय काम केले, याची सविस्तर माहिती दिली आहे. सध्या त्या मुंबई पोलीस दलात परिमंडळ ६च्या उपायुक्त आहेत.

साॅफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करणारा बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव तालुक्यातील खातखेडचा तरुण आशिष उन्हाळे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत २०२३ साली गुणवत्ता यादीत २६७ रॅंक प्राप्त करुन सर्व सामान्य युवकांच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे.

या पुस्तकात आणखी २५-२६ अधिकारी यांच्या कथा आहेत. विस्तार भयापोटी मी त्यांच्या नावाचाच उल्लेख करतो. गृप कॅप्टन सुधीर निंभोरकर, लेफ्टनंट कर्नल महेंद्र सासवडे, कॅन्टीन बाॅय ते मंत्रालयात जाॅइंट सेक्रेटरी झालेले बंजारा समाजातील राजाराम जाधव, डेअरी बाॅय ते सह विक्रीकर आयुक्त वाय.जी.कांबळे, दहावी नापास ते माहिती संचालक झालेले स्वतः लेखक देवेंद्र भुजबळ यांच्या जीवन कार्याची कहाणी आजच्या तरुण पिढीला निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल.

तहसीलदार सौ.प्रिती डुडुलकर, नियोजन विभागाच्या उपसंचालक वर्षा भाकरे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चंद्रकांत हलगे, दृष्टीहिन झाली बॅंक अधिकारी (सुजाता कोंडीकिरे), भिकारी झाला अधिकारी (सुरेश गोपाळे), कौशल्य विकास सहा.आयुक्त सौ. प्रांजली बारस्कर इत्यादी अधिकारी यांचा परिचय प्रेरणा देणारा आहे तो या पुस्तकातूनच वाचला पाहिजे.

श्री देवेंद्र भुजबळ यांनी अतिशय परिश्रम घेऊन, न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन ने हे पुस्तक प्रकाशित करून जणू आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
आजकाल छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होणारे, व्यसनाधीन होणारे तरुण तरुणींनी हे पुस्तक वाचले तर त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी नक्कीच बदलेल, असा मला विश्वास वाटतो.

सुधाकर तोरणे

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, महाराष्ट्र शासन, नाशिक.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !