“एका“
आपल्या ‘न्युज स्टोरी टुडे’ पोर्टल वर ब-याच दिवसांपूर्वी सिंगापूर येथील ‘ऋतुगंध’ या अंकात संपादिका सौ.मोहना कारखानीस यांचा एक लेख वाचून मी उत्तम अभिप्राय दिला होता. तसेच संपूर्ण अंकाचे श्री.देवेंद्र भुजबळ यांच्या सौजन्याने चांगल्या प्रकारे परिक्षण केले होते. तसेच मोहना कारखानीस यांच्या दमदार, शैलीदार लेखनाचा आस्वादही या पोर्टलवरून घेतला होता.
अलीकडेच मार्च २४ मध्ये सौ मोहना कारखानीस यांची “एका” ही कादंबरी प्रकाशित झाली. कुतूहलाने, उत्सुकतेने, मी दिवसभरात न थांबता, ती समग्र वाचून काढली हे या कादंबरीचे मला भावलेलं आगळेच वैशिष्ट्य ! आणि एका शब्दात सांगायचे म्हटले तर ही २०० पानांची कादंबरी मला खुपचं आवडली !

इंडोनेशिया, सिंगापूर व भारत या तीन देशांच्या सामाजिक, आर्थिक व व्यावसायिक परिस्थितीच्या चित्रणाबरोबरच सर्वच संस्कृतीमध्ये स्त्रीचे दमन हा एक धागा जगाच्या पाठीवर समान आहे हे मोहनाजींनी या कादंबरीत प्रकर्षाने सांगितले आहे.
“एका” ही या कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा आहे. कालप्रवाहात फरफटत गेलेल्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करणाऱ्या, नियतीचे फटके खाणाऱ्या आणि तरीही हार न मानता, जिद्दीने जीवनाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या फक्त ‘एका’ ची कहाणी नसून संपूर्ण स्री वर्गाची कहाणी आहे.
इंडोनेशियातील बेडोनो या बेटात लहान बैठकीच्या घरात राहणाऱ्या आई अनिसा उर्फ ‘इबु’ आणि बाप ‘रोकानी’ यांची एका ही मुलगी. आई चौदा वर्षांची असताना प्रथम झालेली मुलगी म्हणून ‘एका’ हे नाव पडले. बहासा ही या बेटातील लोक समुहाची भाषा. या बेटांवरील काहींचे पूर्वज भारतात कधीकाळी राहिले होते असे म्हणतात. परदेशी इंग्रज साहेबांनी त्यांना मसाल्याच्या व्यापारासाठी, मजुरीसाठी, शहरे बांधण्यासाठी, आणि कारखान्यात काम करण्यासाठी इंडोनेशियात आणले होते. साहेब परत गेले, पण गरिबीने नाडलेली, पैशासाठी आलेली ही माणसे बेडोनो बेटावर राहिली. शिक्षणात मागासलेली राहिलीत. काही भात शेती, मासेमारी करू लागली तर काही शहरात गेली. कादंबरीतील पात्रांच्या भावना परिणाम कारक पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखिकेने स्थानिक इंडोनेशियन भाषेचा चफलख वापर केला आहे.
या कादंबरीतील एकाच्या जीवनात आलेली पात्रे म्हणजे, रोकानी, टाॅमसाहेब, हसन कार्पेंटर, यांसारखी एकापेक्षा एक आग ओकणारे व जीवन होरपळवणारे आगीचे गोळे म्हणण्यालायक व्यक्ती ‘एका’ला जाळून राख करण्याचा प्रयत्न करतात, परंतु अनिसा (इबु), डेव्हिड, मारिया, अरिफ चाचा, आलिया, अंकल यांसारखे शीतल झरे एका ला होरपळू न देता जगण्याची उमेद देतात. ‘एका ‘कोणत्याही प्रसंगी भावनिक न होता व्यावहारिक वास्तववादी निर्णय घेते. कोणत्याही मोहाच्या क्षणी वाहवत जात नाही. आपले खडतर व नाट्यमय चढउतारांनी भरलेले जीवन कोणत्याही बाह्य समर्थन व सहकार्या शिवाय फक्त आपल्या अंत:प्रेरणेतून, हिमतीने लढा देऊन, स्त्री जीवनाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवते.
‘मेड’ किंवा ‘हेल्पर’ हा अनेक देशात घरकाम करणाऱ्या स्त्रियांचा वर्ग आहे. या स्त्रिया भरपूर मेहनत करून स्वतःपेक्षा कुटुंबाला सावरतात, ज्यांच्याकडे काम करतात त्यांच्या घराचा या स्त्रिया कणा असतात. भारतातील मेड आणि सिंगापुरातील मेड यांच्यात बराच फरक आहे. त्यांचे जगणे जवळून पाहून, मोहनाजींनी ही कादंबरी लिहिली आहे. त्यासाठी भारताबरोबरच इंडोनेशिया, सिंगापूर येथील ‘मेड’ ना भेटून त्यांच्या राहणीमानाविषयी, पार्श्वभूमी विषयी, रिसर्च करून, त्यांची भाषा समजून घेतली आणि त्यांच्या सुखदुःखाला वाचा फोडावी असे वाटल्याने त्यांनी ही ओघवत्या सुरेख शैलीत कादंबरी लिहून पूर्ण केली हे या लेखिकेचे असाधारण वैशिष्ट्य आहे.
एका ही तशी १२-१४ वर्षांची सुंदर, सुसंस्कृत मुलगी आहे. तिला लहान चार भावंडे आहेत. दोन जुळ्या मुलांना जन्म देऊन एकाची आई बाळंतपणात दगावते. केवळ पैशासाठी तिचा निकाह तीन बायकांच्या प्रौढाशी जास्त मेहेर मिळवून पैशासाठी हपापलेला दारुड्या बाप लावून देतो. तिथं तिचा अमानूष छळ होतो आणि ती चार दिवसांत घरी पळून जाते. पुढे सिंगापूरला श्रीमंत कुटुंबात मेड म्हणून कशाप्रकारे जाते, पुढे काय काय होते ते वाचकांना औत्सुक्यभंग होऊ नये म्हणून कादंबरीतच वाचलेलं बरं ! अगदी शेवटी ७ वर्षानंतर सिंगापूर सोडून भारतात कलकत्त्याला कशी येते, टाॅम साहेबांची एकावर जिवलग मैत्रीण सारखी मुलगी मारिया एकाला इंग्रजी भाषा प्रेमळपणे कशी शिकवते. तिचा लंडनचा डॉक्टरी शिकणारा भाऊ डेव्हीडची सहानुभूती, सिंगापूरची डायना मॅडम, तिचा हलकट नवरा, तसेच नंतर दुसऱ्या करारातील गोड स्वभावाच्या आलिया मॅडम, भारतातले बंगाली अंकल, एकाच्या भावाचा अपघात, यासंबधी लेखिकेने कादंबरीत रंगवलेल्या या सा-या घटना ओघवत्या आणि अतिशय सुरेख लिहिलेल्या आहेत.
कादंबरी कुठेही कंटाळवाणी न होता, किंवा न भरकटता उत्कंठावर्धक पध्दतीने ओघवती वळणे घेत पुढे काय होते हे जाणून घेण्याची उत्सुकता वाचकाला उद्युक्त करते हे कादंबरीकार मोहना कारखानीस यांच्या शैलीदार लेखणीचे फार मोठे यश लक्षात येते.

निखळ मैत्रीला सीमा, देश, भाषा यांची आडकाठी येत नाही. प्रगती करायची असली की कितीही अडचणी आल्या तरी ती करता येते. आळशी, पळपुटा माणूस मग ती स्त्री असो की पुरुष हे नेहमीच कसले तरी ‘निमित्त’ पुढे करतात, असे सूतोवाच या कादंबरीतून मोहनाजींनी केलेले दिसते.
याबरोबरच व्हाइट, ब्लॅक, ग्रे, या शेड्स यांनीच माणूस बनलेला असतो. कोणताही समाज पूर्ण चांगला किंवा वाईट नसतो असेही त्या न कळत सांगून गेल्या आहेत. शेवटी ही कादंबरी कोणताही देश असो स्त्रीला अडचणींचा डोंगर तिलाच पार पाडावा लागतो असे स्त्री जीवनाचे क्लिष्ट चढ उतार मोहनाजींनी उत्तम रीतीने “एका”त दाखविले आहेत. हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
रूढी, परंपरा यांच्या चाकोरीतून बाहेर पडत, स्वतःचा शोध घेणा-या सामान्य तरी वेगळ्या मुलीचा “एका”चा जीवन प्रवास हा आपल्या लेकींना समाजात आपले नेमके काय स्थान आहे याची आणि कटू वास्तवतेची जाणीव करणारी आणि लेकींना अंतर्मुख विचार करावयास प्रवृत्त करणारी ही कादंबरी निश्चितच प्रेरणादायी ठरेल यात तीळमात्र शंका नाही.
या निमित्ताने आणखी एक बाब म्हणून लेखिका मोहना यांना सुचवितो की जमलं तर आमचे स्नेही सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल यांच्याकडे दौंड,पुणे येथे ही ‘एका’ कादंबरी पाठविली तर ते यावर एक अतिशय उत्तम चित्रपट निर्माण करू शकतील किंवा देवैंद्र भुजबळ यांचा चित्रपट क्षेत्रातील ब-याच मंडळींशी जवळून परिचय आहे. तेंव्हा देवैद्रजींच्या सहकार्याने चित्रपट माध्यमातील अन्य मंडळींना सांगू तरी शकतील. ही कादंबरी तर चित्रपटाची एक उत्तम चित्रपटकथा स्वरुपातच लेखनबध्द झाली आहे असे मला तरी शेवटी म्हणावेसे वाटते. इतकेच !

— परीक्षण : सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
ताई मनापासून धन्यवाद 🙏कादंबरी ज़रूर वाचा.
मोहना, आपले हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉
आपली कादंबरी वाचण्याविषयीची उत्सुकता हे परिक्षण वाचून अधिकच वाढली आहे.
श्री. तोरणे यांनी सुचवले आहे तसेच घडावे, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.