Tuesday, July 23, 2024
Homeपर्यटनमेरा जूता हैं जपानी… : ७

मेरा जूता हैं जपानी… : ७

कियोमिझु मंदिर

खरं म्हणजे थंडर ट्रेन ने टोकियोहून ओसाका ला येत असतानाच आम्हाला क्योटो रेल्वे स्टेशन लागले होते. पण सारखा सारखा एकेक दिवसाचा मुक्काम नको म्हणून आम्ही सलग तीन दिवस, तीन रात्री ओसाका या मुख्य ठिकाणी मुक्काम ठोकून आजूबाजूची ठिकाणे पहायचे ठरविले होते.

ओसाकापासून क्योटो रस्तामार्गे एक सव्वा तासाच्या अंतरावर आहे. मोठ्या बस उभे करण्यात अडचणी येतात म्हणून आम्ही दोन छोट्या मिनी बसेस केल्या होत्या. पण त्यामुळे नकळत क्रिकेट च्या “दोन टिम्स” तयार झाल्या जणू एकमेकांशी स्पर्धा लागली ! असो.

दोन बसेस नी आम्ही जपान मधील प्रसिध्द कियोमिझु मंदिर पहायला आलो. तिथे जाऊन आम्ही पहातो तर काय, हे प्रचंड गर्दी ! चालायला जागा नाही, अशी परिस्थिती. प्राचीन मंदिर असल्यामुळे रस्ते अतिशय अरुंद. शुक्रवार हा येथील विशेष दिवस असतो की, काही आणखी विशेष होते म्हणून इतकी गर्दी आहे, याची चौकशी केली असता कळाले की, इथे नेहमीच अशी गर्दी असते.

कियोमिझु हे मुख्य मंदिर आणि आजूबाजूची मंदिरं ही विशिष्ट जपानी, पॅगोडा शैलित बांधली आहेत. सर्व काही जपानी भाषेत लिहिले असल्यामुळे तेथील इतिहास, माहात्म्य काही कळू शकले नाही. पण खुपशे जपानी भाविक, विशेषत: मुली आणि महिला त्यांच्या पारंपरिक जपानी किमोनो वेशभूषेत आलेले होते आणि सर्वच खुप उल्हसित दिसत होते. विशेष म्हणजे ट्रीप असल्यामुळे शाळकरी मुले, मुली त्यांच्या शाळांच्या गणवेशात मोठ्या संख्येने आलेले होते.

इथे यात्रेच्या ठिकाणी असतात, तशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला खाद्य पदार्थ आणि विविध वस्तूंची, स्मृति चिन्हांची दुकानं लागलेली होती. ज्यावेळी मुख्य देवीचे आम्ही दर्शन घेतले, त्यावेळी लक्षात आले, अरे ! ज्याला आपण हॅप्पी मॅन म्हणतो, तोच हा आपला अत्यंत आवडता ! मग तर मला अधिकच आनंद झाला. साहजिकच आठवण म्हणून मी एक छोटी, रबरी मूर्ती घेतली.

आता पर्यंत गेले पाच दिवस सुरळीत सुरू असलेल्या आमच्या पर्यटनाला पहिल्यांदाच नजर लागली. चांगलाच मोठा झटका बसला. कारण ग्रुप मधील ४ महिला या गर्दीत हरवल्या. भाषेची अडचण, मोबाईल मध्ये नेट वर्क घेतलेले नाही, त्यामुळे संपर्क होता होईना. दुपारी साडेबारा वाजता पार्किंग च्या ठिकाणी भेटायचे ठरवलेले असताना दोन वाजले तरी गाठभेट होईना. आमचे दोन तीन सह प्रवासी तीनचार चकरा मारून आले, तरी त्या कुठे दिसेना. शेवटी हरवलेल्यांपैकी एकीने डोके चालवून, एका नेपाळी माणसाचा हॉट स्पॉट घेऊन स्वतःच्या मोबाईल वरून ग्रुप चा नंबर शोधून त्या कुठे आहेत ? याचे तीन चार फोटो टाकले तेव्हा कुठे त्यांचा ठावठिकाणा लागला. सर्वांना एक तर इतकी चढ उतार केल्याने भुका लागलेल्या त्यात ही आफत. पण करणार काय ? बसल्याजागी चरफडण्याशिवाय इलाज नव्हता. पण नशीब दोन तास उशिराने का होईना, आम्ही जेवणाच्या ठिकाणी एकत्र पोहोचलो. तेथील पाणी पुरी, मिसळ पाव पाहून मात्र सर्वांचा वैताग कुठच्या कुठे पळाला.

या निमित्ताने माझे आपल्याला सांगणे आहे की, परदेशात जाताना आपण इतका खर्च करतो पण मोबाईल नेटवर्क चा दोन तीन हजार रुपयांचा प्लॅन घेण्यात मात्र खूप मोठी काटकसर केली, असे समजतो ! मग हरवणारी व्यक्ती तर वैतागतेच पण इतर ही सह प्रवासी वैतागतात. एक तर अशा ग्रुप मध्ये बहुधा सर्वच ज्येष्ठ (आणि स्वतःला श्रेष्ठ समजणारे) नागरिक असतात. बऱ्याच जणांना जेवणापूर्वी आणि नंतर औषधाच्या गोळ्या घ्याव्या लागतात. भूक, तहान सहन होत नाही. त्यामुळे स्वतःची आणि इतरही सह प्रवासी यांची गोची होऊ नये म्हणून आपल्या मोबाईल ला नेटवर्क असू द्या. ग्रुप मधील सर्वांचे नंबर त्यात असू द्या. स्थानिक चलन, पासपोर्ट, औषधाचे प्रिस्क्रिपशन, इतर काही महत्वाची कागदपत्रे स्वतः बरोबर बाळगत चला. आणि मुख्य म्हणजे मुळातच आपण ग्रुप बरोबर आहोत की नाही ? याची सारखी खातरजमा करीत चला. जेणेकरून तुमचे आणि इतरांचे ही पर्यटन जीवघेणे न ठरता, आनंददायी ठरेल. असो.

वर उल्लेख केल्याप्रमाणे वेळ, शक्ती, मूड असे बरेचसे वाया गेल्याने पुढील जे मंदिर पहायचे होते, ते राहून गेले. अर्थात त्याला काही एव्हढेच कारण नव्हते म्हणा, तिथे वर जायला १२०० पायऱ्या चढून जायचे होते. त्यामुळे तीनचार जणांचा अपवाद करता सर्वांनी गाडीतच बसून राहण्यात धन्यता मानली. त्यात मी ही होतोच म्हणा !
क्रमशः

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. प्रवासवर्णन अप्रतिम.
    एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे.जपान ह्या देशातील संस्कृतीचा घेतलेला नेटका आढावा.

  2. अप्रतिम वर्णन… प्रवासात येणारे अनुभव व घ्यावयाची काळजी याबद्दलच्या सूचना उपयुक्त… असाच अनुभव मला वैष्णोदेवीच्या पर्यटनाच्या वेळी आला होता. हमखास चुकामूक होणं आणि नेट नसताना आणखी पेच निर्माण होणं आठवलं…

  3. अप्रतिम मंदिरासाठी,भरपूर जिने चढून आजूबाजूला रंगबेरंगी दुकानं, शाळकरी मुलांची भरपूर गर्दी, त्यात किमोनो वेशेतल्या सुदंर नटलेल्या गटागटाने मुली व काही जोडीदाराबरोबर फोटो
    काढण्यात मश्गुल अश्या जपानी गुडीया.असे सर्व आकर्षित जणू आपल्याकडची भरलेली जत्राच (पण हटके) आपण अनुभवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८
डाॅ.सतीश शिरसाठ on कलियुगातील कर्ण
अरुण पुराणिक , पुणे on माझी जडणघडण भाग – ८
गणेश साळवी. इंदापूर रायगड on कलियुगातील कर्ण
Vilas kulkarni on व्यथा
डाॅ.सतीश शिरसाठ on तस्मै श्री गुरुवै नमः