नमस्कार मंडळी.
गणेश चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
आज आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवारात इंग्लंड मधील श्री श्रीकांत पट्टलवार हे सहभागी झाले आहेत. श्री पट्टलवार हे मूळचे नागपूर येथील असून गेल्या २४ वर्षांपासून इंग्लंड मधे रहात आहेत. ते व्यवसायाने क्रायोजनिक (CRYOGENIC) इंजीनिअर/शास्त्रज्ञ असून UKRI (UK Research and Innovation) या शासकीय संस्थेत कार्यरत आहे. त्यांना नाट्यसंगीतात विशेष रूची असून अधूनमधून लहानमोठ्या कार्यक्रमांतून ते भाग घेत असतात. आज त्यांचा पहिला लेख आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.
– संपादक
श्रावणातला शेवटचा सोमवार होता. साबुदाण्याची खिचडी, रताळ्याचा कीस, शिंगाडे, पिठाचा साजुक तुपातला शिरा, असा खास उपवासाचा नैवेद्य तृप्त मनाने स्वीकारून बाप्पा निवांतपणे आपल्या सिंहासनावर लोडाला टेकून विश्रांती घेत होते.
उपवासाचा दिवस असल्याने यजमानांनी बाप्पांच्या हातावर मोदकाऐवजी स्मार्टफोन ठेवला होता. त्यावरून गणेशोत्सवाची तयारी जगभरातील आपले भक्तगण कशी काय करतात याचा बाप्पा मागोसा घेत होते.
नैवेद्यातील आपला वाटा फस्त करून मूषकराजही बाप्पांच्या पायाशी पहुडले होते. बाप्पांच्या कृपेने आपल्या फोनवर “गुगल टनेल” ची प्रीमियम-App फ्री मिळाल्यामुळे मूषक महाशय एकदम खुश होते. वेगवेगळे गणेशोत्सव कुठल्या बिळांतून कमीत कमी वेळात गाठून जास्तीत जास्त प्रसाद भक्षण कसं करता येईल याच प्लॅनिंग करणं त्यांना या App मुळे खूप सोपं होणार होतं.
सर्फिंग करता करता मूषकराज अचानक चिंकाळले – “बाप्पा बाप्पा, तुम्ही हे पाहिलंत का ?”
बाप्पा म्हणाले, “अरे चिंकाळ्याला काय झालं ? आत्ताच तर तुला नवीन App घेऊन दिली ! लगेचच काय विघ्न आलं तुझ्या समोर ?”
मूषक – “बाप्पा, तुम्हाला कळलं नाही का, मंडळानं यंदा ‘मोदक मेकिंग कॉम्पीटीशन’ ठेवली आहे.”
बाप्पा – “मग तुला तर खूप आनंद व्हायला हवा !”
मूषक – “आनंद नाही, आनंदी-आनंद म्हणा बाप्पा !”
बाप्पा – म्हणजे काय ?
मूषक – “बाप्पा, एक विचारू ? तुम्ही आपल्या भक्तांमध्ये कधी भेदभाव करता का ? त्यांच्यात कधी स्पर्धा ठेवता का ? त्यांनी मनोभावे अर्पण केलेल्या मोदकांची हा पहिला, तो दुसरा अशी वर्गवारी करता का ?”
बाप्पा म्हणाले, “मी असं कसं करणार ? मला सर्व भक्त सारखे. मी फक्त त्यांच्यातला भक्तीभाव पाहतो. पण तू म्हणतो तशी स्पर्धा असेल तर गंमतच आहे म्हणायची ?”
मूषक : बाप्पा, खरं म्हणजे भक्तांनी आणलेल्या मोदकांवर पहिला हक्क आपला. म्हणजे पहिला तुमचा आणि नंतर माझा. मग तुमच्याच उत्सवात, तुमच्याच डोळ्यासमोर तुमचा आवडता मोदक कोणता हे मंडळानी मोदक स्पर्धेतून ठरवावं ही कुठली गंमत ? तुम्ही काहीही म्हणा बाप्पा, पण अलीकडे आपल्या विद्यादानात काहीतरी गडबड होऊ लागली असं मला वाटू लागलय.”
बाप्पा : “अगदी बरोबर आहे तुझं ! आजकाल ग-गणपतीचा राहिला नसून, ग-गूगलचा झालाय. कुठलीही पूजा आर्चा, नैवेद्य वगैरे न दाखवता पाहिजे ते ज्ञान गूगल क्षणार्धात याचकासमोर ठेवतो. त्यामुळे बहुतांश भक्तमंडळी फक्त उत्सवापुरतेच, खरं तर त्याचाही फक्त इव्हेंट करण्याकरता माझ्याकडे फिरकतात !”
मूषक : “अहो बाप्पा, सर्वांनी एकत्र यावं, काहीतरी भरीव आणि समाजोपयोगी कार्य करावं म्हणून लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला. त्यांच्यात स्पर्धा लावून एकमेकात भेदभाव करण्यासाठी नाही आणि मोदकांत कुठली आली स्पर्धा ?
प्रत्येक आईला जसं आपला बाळ जगातलं सर्वात सुंदर बाळ वाटतं तसच प्रत्येक भक्ताला आपला मोदक श्री. गजाननाला नक्कीच आवडेल याची खात्री असते.”
बाप्पा म्हणतात, “प्रश्नच नाही. भक्तीभावाने दिलेला प्रत्येक मोदक मला खूप आवडतो.“
“मग तुमचा आवडता मोदक कोणता हे इतर मंडळी कसे ठरवू शकतात ?.” इति मूषक.
बाप्पा म्हणाले, “अरे तू म्हणतो ते सगळं खरं आहे, पण भक्तांना सुद्धा एकमेकांना मोदक दाखवायचे असतात, प्रसाद म्हणून वाटायचे असतात.”
मूषक : “ते तर दाखवायलाच हवे, पण त्याकरता स्पर्धा कशाला हवी ?”
बाप्पा : “मग करावं काय करावं त्यांनी ?”
मूषक : “बाप्पा, आपण सकल कलांची देवता. चित्रकला, शिल्पकला, हस्तकला, पाककला, नृत्य, संगीत अशा विविध कला मानवाला आपणच दिलेल्या दैवी देणग्या आहेत. सर्व कलांचा नेहमी आदर करावा. त्यांत स्पर्धा लावून कलाकारांची वर्गवारी करू नये. त्याऐवजी सवाई गंधर्व सारखे लहान-मोठे मोदक महोत्सव किंवा प्रदर्शनं भरावावीत.
मोदक करताना डोळ्यासमोर श्रीगणेशाच कुठलं रूप होतं ? ओठांवर कुठली भक्तीगीतं होती ? कुटुंबियांनी एकत्र येऊन नैवेद्यावर अथर्वशीर्षाचे मंत्रसंस्कार कसे केलेत ? अशा विविध विषयांवर चर्चा परिसंवाद आयोजित करावे म्हणजे प्रत्येकालाच श्री गजानन प्रसन्न झाल्याचा आनंद मिळून आपला पहिला नंबर आल्यासारखे वाटेल. त्याचबरोबर कलेचा आणि कलाकारांचाही आदर होईल.”
बाप्पा म्हणाले – “पण तू का इतका खोल विचार करू लागलास ? पोटभर मोदक मिळाले की झालं तुझ काम !”
मूषक – “बाप्पा लहान तोंडी मोठा घास घेतोय म्हणून मी आपली क्षमा मागणार होतो. पण या स्पर्धेमुळे मलाच काय, आपल्याला तरी मोदकाचा घास मिळेल की नाही अशी शंका येते.”
बाप्पा : “आता ही काय नवीन भानगड आहे ?”
मूषक : “बाप्पा, प्रत्येक स्पर्धकाला फक्त पाचच मोदक आणण्याची अनुमती आहे.
महाकाय कढईत हजारो किलोंचा शिरा, पाच पाच फुटाचे महा-पराठे बनवण्याचा जागतिक विक्रम करणारे महाशेफ श्री. विष्णूजी मनोहर या स्पर्धेचे परीक्षक आहेत. योग्य परीक्षण करायला पाच मोदक त्यांना तरी पुरतील का ? आपण तर दूरच राहिलो !
बाप्पा म्हणाले, “म्हणजे यंदा ई-मोदकावरच समाधान मानव लागणार की काय ?
मूषक : “बाप्पा, मला आठवतं, पन्नास वर्षांपूर्वी मंडळाची स्थापना झाली तेव्हा सर्वांनी मिळून १०८ मोदकांचा नैवेद्य आपल्याला दाखवला होता. दहा वर्षात तो आकडा हळूहळू २१ वर आला. त्याचवेळी अष्टविनायक नावाचा सिनेमा खूप लोकप्रिय झाल्यावर विनायक फक्त आठच असताना एकवीस मोदक कशाला ? आठ पुरे, असा पुणेरी मुद्दाही उपस्थित झाला होता. आणि आता तर NHS च्या Five-a-day या घोषवाक्यावरून फक्त पाचच मोदकांची मर्यादा ठेवली आहे.”
बाप्पा म्हणाले : “अरेरे पण मंडळात सर्वांसाठी प्रसादाचे वेगळे मोदक आणतीलच ना त्यातले तुलाही मिळतीलच.”
मूषक – “ते सगळे ठप्प्याचे मोदक. पेढ्याला मोदकाची सर थोडीच येणार ! विघ्नहर्ता बाप्पा, आता काहीही करून तुम्हीच हे विघ्न दूर करा. कसंही करून मोदकांची सोय करा” .
बाप्पा म्हणाले : “बरं एक सांग. तुला नागपूरकडचे तळलेले मोदक चालतील का ?”
मूषक : “म्हणजे काय, ते तर माझे फेवरेट आहेत.”
बाप्पा : “आपल्या डिंगूचे आजी-आजोबा, दोघं मिळून दरवर्षी मला १०८ मोदकांचा नैवेद्य दाखवतात.”
मूषक : “दोघं मिळून ?”
बाप्पा, “ म्हणजे, आजी मोदक तळतात आणि आजोबा मला आवडणारी गाणी म्हणून त्यात भक्ती रस मिसळतात. त्यांच निमंत्रणही आलं आहे आणि आपल्या स्वागताची तयारी पण जोरात सुरू आहे. जायच कां त्यांच्याकडे ?”
मूषक : “ म्हणजे काय ? बाप्पा आपण खरंच विघ्नहर्ता आहात. केंव्हा निघायच सांगा ? लगेच तयारीला लागतो. नमन तुला मोरया.”
— लेखन : श्रीकांत पट्टलवार. रुणकर्ण – इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान, सुंदर, अप्रतिम
खुपच छान, नर्म विनोदी, खुसखुशीत, सहज, सुलभ भाषेतला लेख. मूषकराजाची नवीन App, ग गुगलचा, मोदकांच्या संख्येत घट होण्याची कारणे, सगळे मजेशीर. वाचतांना मजा आली. सद्य परिस्थितीला साजेसे वर्णन. शेवटी डिंगूच्या आजींनी तळलेले मोदक व आजोबांनी भक्तिभावाने गायलेली भक्तिगीते “बाप्पाला” मिळतात. खुपच मस्त. 👌👌
छान लेख. एक चांगला विचार मांडला आहे.
मोदक कुणाचा? हा गणेशोत्सवानिमित्त लिहिलेला खुसखुशीत लेख.
,👌👌👌👌 छान लिखाण, वाचताना मजा आली, अप्रतिम,👌