आपल्या न्यूज स्टोरी टुडे पोर्टल वर नियमित गझल लिहिणारे, निवृत्त पोलिस अधिकारी श्री यशवंत पगारे, बदलापूर यांना छत्रपती संभाजीनगर येथील, दैनिक साहित्य तेज च्या नुकत्याच झालेल्या वर्धापन दिन व कविसंमेलनात “राज्यस्तरीय गझल सम्राट” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्री भरत सातपुते हे होते. यशवंत पगारे यांचा हा अकरावा पुरस्कार आहे.
सदर दैनिकाच्या संपादिका सुप्रिया जाधव आहेत. एक महिला असूनही त्यांनी हा मोठा कार्यक्रम यशस्वी करून दाखविला.
सदर कार्यक्रमास साहित्यिक कवी गुलाबराजा फुलमाळी, विडंबनकार संजय आहेर, सुप्रसिद्ध निवेदक बाळासाहेब गिरी देखील हजर होते. सदर कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक कलावंतांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

श्री यशवंत पगारे यांनी सादर केलेली “बरे वाटले” ही गझल पूर्ण सभागृहाने डोक्यावर घेतली होती. ही गझल पुढे देत आहे.
बरे वाटले
अनलज्वाला (८+८+८)
वय झाल्यावर कात टाकली बरे वाटले
चिंता सारी उभी जाळली बरे वाटले
जुनाट चष्मा भुतकाळाला दान दिला मी
नवीन दृष्टी अता लाभली बरे वाटले
खपल्या आता दुःखांनी बघ धरल्यावरती
जखम आतली नाही दिसली बरे वाटले
आठवणींचे ओझे इतके वाहू का मग
हिम्मत केली रद्दी विकली बरे वाटले
घर रस्त्यावर तिचे लागते त्रास व्हायचा
तीच तिची ती वाट बदलली बरे वाटले
मर्जी आहे ज्याची त्याची काय करावे
मी तर निव्वळ फुले वेचली बरे वाटले
कुणास माहित कसा एवढा उदास होतो
तरुणपणीची गझल वाचली बरे वाटले
न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे श्री यशवंत पगारे यांचे हार्दिक अभिनंदन.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
श्री यशवंत पगारे ह्यांचे हार्दिक अभिनंदन. गझल रचना खूप छान आहे. 🙏💐