थोर जर्मन चित्रपट दिग्दर्शक विम वेंडर्स यांचे १६ चित्रपट मुंबईतील ऐतिहासिक रिगल चित्रपट गृहात दाखविण्यास काल पासून सुरुवात झाली आहे. हे चित्रपट ९ फेब्रुवारी पर्यंत दाखविण्यात येणार आहेत.
कालचा पहिलाच Wings of Desire हा चित्रपट संपल्यानंतर विम वेंडर्स यांनी प्रेक्षकांशी दिलखुलास संवाद साधला. काही वेळा त्यांनी अतिशय मिश्कीलपणे उत्तरे दिल्यामुळे चित्रपट गृहात हास्याचे फवारे उडत होते.

हे संवाद सत्र संपल्यानंतर मी पुढे होऊन विम वेंडर्स यांना माझी ओळख करून दिली. तसेच मी संपादन करीत असलेल्या
www.newsstorytoday.com या पोर्टलवर “जर्मन विश्व” ही लेखमाला पुणे येथील जर्मन अभ्यासक तथा प्रा. आशी नाईक या लिहीत असून,

आजच्या पाचव्या भागात, या चित्रपट महोत्सवाचे औचित्य साधून त्यांच्यावर आणि त्यांच्या चित्रपटांवर सविस्तरपणे लिहिल्याचे सांगून, मोबाईल उघडुन त्यांचा लेख त्यांना दाखविला. आता पोर्टल मराठी भाषेत असल्याने त्यांना ते वाचता येण्याची शक्यता नव्हतीच. पण इतका थोर दिग्दर्शक चित्राची भाषा समजू शकणार नाही, असे होईल का ? त्यामुळे त्यांची काही छायाचित्रे आणि त्यांच्या चित्रपटांची काही छायाचित्रे पाहून ते एकदम चकित होऊन खुश झाले आणि त्यांनी मला एकदम जवळ घेऊन फोटो काढा, असे सुचविले. मी ही तत्परतेने लगेच समोर उभ्या असलेल्या एका चित्रपट रसिकाच्या हातात मोबाईल देऊन फोटो काढून घेतले.

विम वेंडर्स यांच्यावर लिहिलेला लेख आपण पुढील लिंक वर क्लिक करून अवश्य वाचा.
https://newsstorytoday.com/जर्मन-विश्व-५/
विम वेंडर्स यांच्याशी सर्व प्रथम बोलण्याचे माझे धाडस पाहून आणि तेही देत असलेली आपुलकीची वागणूक पाहून मग ईतर रसिकांनी त्यांना गराडाच घातला. कुणी सह्या घेऊ लागले तर कुणी सेल्फी घेऊ लागले. ते ही छान हसत खेळत सहकार्य करत होते. इतका जग प्रसिद्ध, थोर दिग्दर्शक असूनही त्यांच्या बोलण्यातील सहज, साधेपणा, मिश्किल टीका टिप्पणी यामुळे त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली.
या थोर दिग्दर्शकाकडून आपल्याला अधिकाधिक कसदार चित्रपट पहायला मिळोत, या हार्दिक शुभेच्छा.

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800