हजारो गांधीवादी सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रेरणास्थान असलेल्या अत्यंत रुजू व्यक्तिमत्वाच्या प्रेमळ शोभनाताईना ४ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे देवाज्ञा झाली. त्यांच्या जाण्याने अनेक जण पोरकेपणाच्या दु:खाने व्याकूळ झाले. मी सुद्धा त्यांच्या पैकी एक आहे. आता मला कोण मार्गदर्शन करेल ? आपुलकीने, प्रेमाने कोण विचारपूस करेल ? एक मोठा आधारवड कोसळल्याची जाणीव होऊन मनाचा खूप गोंधळ उडालाय. अशा प्रसंगी शब्दही बापुडवाणे होतात !
माझा आणि शोभनाताईंचा परिचय जवळपास पंचेचाळीस वर्षांचा. सामाजिक क्षेत्रात निरनिराळ्या विषयांवर अनेक प्रसंगी अनेक उपक्रमांतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी लाभली. माझ्या आई वडिलांच्या माघारी त्यांनी मला भावनिक आधार दिला. माझ्यावर जशी आईची माया केली तशी अनेकांवर केली . आमच्या प्रत्येक भेटीत मी त्यांच्याकडून खूप काही शिकले, आणि पुढच्या भेटीपर्यंत पुरेल एव्हढा उत्साह घेऊन जात असे.
शोभनाताईंचा जन्म २६ ऑक्टोबर १९२४ रोजी रत्नागिरी येथे त्यांच्या आजोळी फडक्यांच्या घरी झाला. पालघरचे मोठ्या वतनाचे जमीनदार व सावकार असलेले दांडेकरांचे श्रीमंत घराणे. दांडेकरांची कुलदेवता दुर्गादेवी आणि घरातील ही पहिलीच मुलगी म्हणून त्यांचं नाव “दुर्गा” ठेवण्यात आलं. छोटी दुर्गा गर्भश्रीमंतीत वाढली. श्रीमंती एव्हढी की ब्रिटीश सरकारला कर्जाऊ रक्कम देण्याइतके दांडेकरांचे एश्वर्य होते. शाळकरी दुर्गेने काही मैत्रिणींबरोबर अविवाहित राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पण करण्याचा संकल्प केला होता परंतु तो संकल्प मनातल्या मनातच राहिला सत्यात उतरला नाही. त्याची खंत मनातल्या आतल्या कप्प्यात कुठेतरी राहिली.
वयाच्या १६ व्या वर्षी १९४० साली पालघरची दुर्गा दांडेकर पुण्यातील रानडे वाड्याच्या उंबरठ्यावरचं माप ओलांडून आली ती सौ शोभना रानडे होऊन. पुण्याच्या गव्हर्नमेंट इंजिनीअरिंग कॉलेज मधून सिव्हील इंजिनिअर झालेल्या अतिशय बुद्धिमान व रुबाबदार बाळासाहेब रानड्यांशी दांडेकरांच्या दुर्गेचा विवाह झाला. रानडे कुटुंब पुण्यातील गर्भश्रीमंत घराणे. मंडळी खूप हौशी आणि मेहनती. सुनेने खूप शिकावे ही कमी शिकलेल्या सासऱ्यांची तीव्र इच्छा, त्याला नणंद ताराबाई साठे (माजी खासदार) यांचा सक्रीय पाठींबा. त्यामुळे शिक्षण सुरु राहिले. शोभनाताईंना शिक्षणाची आवड आणि खूप शिकण्याची इच्छा. लग्नाआधी वधुपरिक्षेत त्यांचे सासरे काकासाहेब रानडे यांनी शोभनाताईंकडून टाईम्स ऑफ इंडिया चा अग्रलेख वाचून घेतला होता.
शोभनाताई घरचं सगळं सांभाळून, सुनेच्या- पत्नीच्या-आईच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून कॉलेजला जात. १९४४ साली शिक्षकाची सनद घेऊन त्या राष्ट्राभाषा कोविद झाल्या. १९४७ साली मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात बी.ए. झाल्या. आणि वीस वर्षानंतर १९६८ मध्ये पुणे विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात एम.ए. झाल्या कारण शिक्षण हे जीवनाचे सर्वस्व त्यांनी मानले होते.
लग्नानंतर १९४८ पासून जवळपास २०२० पर्यंत म्हणजेच जवळजवळ ७० वर्षांहून अधिक काळ शोभनाताईंनी सामाजिक क्षेत्रात निरनिराळ्या अनेक जबाबदाऱ्या निभावल्या. सुरुवातीला Montessori बाईंशी झालेली त्यांची भेट हा शोभनाताईंच्या जीवनातील कार्याची दिशा ठरविणारा क्षण, Turning Point होता. Madame Maria Montessori यांचेबरोबर राहण्याचे भाग्य त्यांना मिळाले. शोभनाताईंनी Montessori ट्रेनिंग कोर्स केला तेंव्हा Montessori बाईंनी त्यांच्या कडून बालकांच्या सेवेचे आणि बाल शिक्षणाचे वचन घेतले होते आणि त्यामुळे शोभनाताई बालग्राम चळवळीशी जोडल्या गेल्या.
दुसऱ्या महायुद्धानंतर अनाथ झालेल्या बालकांचे अश्रू पुसण्यासाठी जणू परमेश्वराचा अवतार घेतलेले श्री हरमन मायनर यांच्या कार्याने प्रभावित होऊन शोभनाताईंनी महाराष्ट्रात बालग्राम चळवळीला सुरुवात केली आणि अक्षरशः तन-मन-धन अर्पण केले. आचार्य विनोबा भावेंच्या जन्मगावी त्यांच्याच घरात गागोद्याला शोभनाताईंनी अनाथ, निराधार मुलांसाठी बालग्राम बालसदन सुरु केले. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात बालग्राम चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. गागोद्याचे बालसदन त्यांनी अनेक वर्ष जिद्दीने चालवले. तसेच कोरोची, सासवड, धारणी, पनवेल येथेही आदिवासी आणि निराधार मुलांसाठी बालसदने सुरु केली बालवाडी, शाळा, दवाखाना सुरु करून मोठे प्रकल्प नावारूपास आणले. निराधार स्त्रियांसाठी त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण वर्ग चालवले.परंतु आदिवासी भागात कुपोषण ही मोठी समस्या आहे हे लक्षात येताच कुपोषणाविरुद्ध मोहीमच हाती घेतली आणि अभिनव शिक्षण पद्धती राबवून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. आज बालग्रामच्या देशात अनेक शाखा आहेत. तेंव्हाच पुणे बालग्रामची राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कारासाठी निवड झाली, हा त्यांच्या समर्पित बाल कल्याण कार्याचा गौरवच होता.
बाळासाहेब रानडेंच्या नोकरीनिमित्ताने शोभानाताईंचे आसाम मध्ये दीर्घकाळ वास्तव्य झाले. तेथेही त्यांची समाजकार्याची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना. त्या केवळ आसामी भाषा शिकल्या नाहीत तर त्या भाषेत प्राविण्य मिळवून National Book Trust of India साठी अनुवादकाचे कामही केले. आसामी भाषेतील कादंबर्यांचे मराठी अनुवादही केले. आसाममध्ये श्रीमती अमलप्रभा दास यांच्या बरोबरीने शोभनाताईंनी कस्तुरबा न्यास आणि विनोबांच्या भूदान-ग्रामदान चळवळीत मोलाचे कार्य केले. विनोबांच्या आसाम मधील पदयात्रेचे संयोजन त्यांनी केले. विनोबाजी तेंव्हा शोभनाताईंच्याच घरी मुक्कामाला होते, हा त्यांच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण होता. आणि तेंव्हापासून त्या विनोबांच्या शिष्याच बनल्या, सहवासात राहिल्या. शेवटपर्यंत “भूदान-ग्रामदान-नशाबंदी- आणि स्त्रीशक्ती जागरण“ या विनोबांच्या चतु:सुत्रीवर कार्यरत राहिल्या. पवनारच्या विश्व महिला संमेलनाने त्यांच्या कार्याला एक नवी दिशा दिली. विनोबांच्या प्रेरणेने जगभरातून आलेल्या महिलांनी स्त्रीशक्ती जागरण आंदोलनाला सुरुवात केली. विनोबांनी चळवळीची संपूर्ण जबाबदारी शोभनाताईंवर टाकली. १९५८ साली त्यांनी विनोबांबरोबर गोहाटी ते दिग्बोई अशी ३५० मैलांची पदयात्रा केली. त्यांच्या कामाचा उरक आणि त्यांची आसाम मधील लोकप्रियता यांनी प्रभावित होऊन दिब्रुगड कॉंग्रेस कमिटीने आसाम विधानसभेवर त्यांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांनी विनोबांचा सल्ला शिरोधार्य मानून या सुवर्ण संधीला नम्रपणे नकार दिला कारण त्यांना विनोबांच्या रचनात्मक कार्याचे आकर्षण होते.
शोभनाताईंच्या आसाम वास्तव्यात १९६१-६२ च्या चीनी आक्रमणाचा त्यांनी जवळून अनुभव घेतला. त्या काळात अनेक लष्करी अधिकाऱ्यांशी त्यांच्या ओळखी झाल्या. युद्ध काळात सैनिकांच्या व अधिकाऱ्यांच्या निराशाग्रस्त मनाला व थकलेल्या शरीरांना विरंगुळा मिळावा म्हणून त्या परोपरीने प्रयत्नपूर्वक कार्यक्रम ठरवीत. त्यांचं घर लष्करी अधिकाऱ्यांचं विश्रांतीस्थानच बनले होते. तेंव्हा भाषा, जात-पात, धर्म या सर्व भिंती कोलमडून पडतात आणि शिल्लक राहतो तो फक्त देशाभिमान ! दरम्यान मोरारजीभाई देसाईंच्या सूचनेवरून आदिमजाती सेवक संघाची चिटणीस म्हणूनही शोभनाताईंनी काम केले. संपूर्ण ‘नेफा’ अभ्यासला. पीस मिशनची जबाबदारी स्वीकारली. तसेच आसाम साहित्य सभेची कार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळत असतांना अनेक परप्रांतीय स्नेहबंधने जोडली. अशा प्रकारे आसाम मधील वास्तव्यात सामाजिक जीवनात विविध क्षेत्रातून त्यांनी मनसोक्त प्रवास केला.
बाळासाहेब रानडे यांच्या सेवानिवृत्ती नंतर शोभनाताई पुण्याला परत येऊन तेथेच स्थायिक झाल्या. शोभनाताईंना पारिवारिक जबाबदारी मधून मोकळीक मिळाली आणि त्यांचे समाज कार्य अधिक जोमाने, वेगाने व वेगळ्याच स्वरूपात पुन्हा सुरु झाले. त्यांनी Mahatma Gandhi National Memorial Society,(आगाखान प्रासाद) Kasturba Gandhi National Memorial Trust महाराष्ट्र, खादी ग्रामोद्योग आयोग, महाराष्ट्र नशाबंदी परिषद, या सर्व संस्थांच्या रचनात्मक कार्याची जबाबदारी स्वखुशीने स्वीकारली आणि समर्थपणे पेलली सुद्धा. त्यांचे नशाबंदीचे कार्य पुणेकरांना चांगलेच परिचयाचे आहे. शोभनाताईंच्याच शब्दात सांगायचे तर “ दारूबंदीचा खरं शत्रू दारुडा नाही, तर मद्यपानाला प्रतिष्ठा मिळवून देणारेच खरे शत्रू आहेत “ या साठीच पुण्याच्या एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या बंगल्यावर मद्यपानाच्या पार्टीला विरोध करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह घडवून आणला होता. त्यावेळी सत्याग्रह होऊ नये म्हणून त्या उद्योगपतीने नशाबंदी परिषदेच्या कार्यासाठी मोठी देणगी देण्याची तयारी दाखवली परंतु अशा दांभिक दानशूरांची तमा शोभनाताईंनी कधीच बाळगली नाही. दिल्ली स्थित अखिल भारतीय नशाबंदी परिषदेच्या त्या उपाध्यक्ष होत्या.
आचार्य विनोबाजींच्या सांगण्यावरून शोभनाताईंनी पुण्याचे गांधी स्मारक आगा खान प्रासादाची जबाबदारी स्विकारली. याच प्रासादाच्या आवारात कस्तुरबा गांधींचे अंत्यसंस्कार महात्मा गांधींनी केले होते. गांधीजींच्या इच्छेनुसार तिथे महिला विकास केंद्र बनले पाहिजे असा विनोबाजींचा आग्रह होता. त्या दृष्टीने शोभनाताईंनी नियोजन बद्ध असे काम सुरु केले. अनेक वर्षे त्यांचे कार्यालय प्रासादातच होते. तेथे गांधी दर्शन प्रदर्शनी, कस्तुरबा खादी विद्यालय, महिला प्रशिक्षण केंद्र, महिला वसतिगृह, उद्यान प्रशिक्षण केंद्र, गांधी विचार केंद्र, प्रिंटींग प्रेस अशा अत्यंत लोकोपयोगी योजना सुरु केल्या, या योजना प्रभावी पणे राबवल्या, हा प्रासाद हे गांधीवादी कार्यकर्त्यांचे तीर्थस्थानच बनले होते. अनेक तळागळातील तसेच पिडीत आणि गरजू महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यात शोभनाताईंचा सिंहाचा वाटा आहे. या कार्यात शोभनाताईंना श्रीमती लक्ष्मी मेनन (माजी केंद्रीय मंत्री)
डॉ. सुशीला नायर (महात्मा गांधींच्या कारावासातील डॉक्टर) तसेच श्री नवलमल फिरोदिया (उद्योगपती) या गांधीवादी देशभक्तांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या वास्तूमध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चा सत्रे, व्याख्याने, बा-बापू पुरस्कार सोहोळे, आंतर महाविद्यालयीन स्पर्धा, विविध प्रदर्शने, असे समाज प्रबोधनाचे असंख्य अगणित कार्यक्रम संपन्न झाले. देश विदेशातून अनेक लोकांनी या वास्तूचे वैभव अनुभवले. परंतू पुढे भारत सरकारने या संपूर्ण परीसराचा राष्ट्रीय स्मारक म्हणून ताबा घेतला आणि या तीर्थक्षेत्राची रयाच गेली. कार्यकर्ते योजनां अभावी दुरावले आणि सामान्य जनाचा वावर बंद झाला. जणू प्रासादाचा आत्माच निघून गेला. या पार्श्वभूमीवर शोभनाताई अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आल्या. या संस्थेला शतकाचा इतिहास आहे. नवी दिल्लीत परिषदेचे मोठे कार्यालय आहे. पहिल्या महाराष्ट्रीयन मराठी महिला अध्यक्षा होण्याचा मान शोभनाताईंनी मिळवला होता. आयुष्यात प्रथमच निवडणूक लढल्या आणि जिंकल्याही. महिला विकासाचे हे फार मोठे अखिल भारतीय स्वरूपाचे कार्यक्षेत्र होते. शोभनाताईंचा जागतिक जनसंपर्क वाढला. त्यांच्या प्रगल्भ अनुभवांचा परिषदेला खूपच लाभ झाला. जगभर अनेक सभा संमेलनात भारताचे प्रतिनिधित्व करतांना शोभनाताईंनी महात्मा गांधींच्या विश्वबंधुत्वाचा, सत्य-अहिंसेचा, मानवतेचा संदेश देशोदेशी पोचला. विनोबांची स्त्री-पुरुष अभेदाची भूमिका जगाला समजावून सांगितली. परिषदेचे ६० वे आणि ७५ वे वर्षाचे अधिवेशनाचे इतिहासातील मैलाचे दगड ठरतील असे भव्य तसेच अविस्मरणीय कार्यक्रम शोभनाताईंनी पुण्यात स्वतःच्या नेत्तृत्वाखाली आयोजित केले.
संपूर्ण जीवनाच्या सामाजिक वाटचालीत शोभनाताईंनी अनेक कार्यकर्ते तयार केले, त्यांना कार्यप्रेरीत केले, आणि त्यांच्याकडून मोठे कार्य करून घेतले. ग्रामीण तसेच आदिवासी भागातील अल्पशिक्षित महिलांना शिक्षित करणे, प्रशिक्षण देऊन तयार करणे, नवनवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी उद्युक्त करणे, मार्गदर्शन करणे, चांगल्या कामाचे कौतुक करणे. या आणि अश्या अनेक गुणांमुळे त्यांचे व्यक्तिमत्व अद्भुत वाटे. त्यांचे संघटन कौशल्य विलक्षण होते. ज्या ज्या संस्थांचा कारभार शोभनाताईंनी हाती घेतला त्यांच्या कारभारात लक्षणीय सुधारणा करून प्रगती केली.
शोभनाताईंचे जीवनकार्य होते अनाथ मुलांना व निरक्षर-निराधार महिलांना आसरा आणि हक्काचे घर मिळवून देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे. त्यांच्या जीवन विषयक तत्वज्ञानावर आणि जीवनमुल्यांवर गांधीजी आणि विनोबांच्या शिकवणुकीचा खोल ठसा उमटला होता. शोभनाताई निष्ठावान गांधीभक्त व कृतीशील गांधीवादी कार्यकर्त्या होत्या. साधी राहाणी, नीटनेटकेपणा, रेखीवता, योजकता, तत्वनिष्ठ विचारसरणी, तडजोड न करता कार्य करीत राहण्याची निष्ठा, उच्च अभिरुची आणि जीवनमूल्ये यांचा शोभनाताईंच्या व्यक्तिमत्वामध्ये अनोखा संगम होता.
शोभनाताईंनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांना व संमेलनांना संबोधित केले. त्यांनी लिहिलेली आणि प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांमध्ये लोकयात्रा, स्त्रीशक्ती, डॉ.हरमन मायनर, श्रीमती लक्ष्मी मेनन, यांचा समावेश तर होतोच परंतु वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी डॉ.सुशीला नायर यांनी हिंदी भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आणि ते पुस्तक
“ बापूंच्या कारावासाची कहाणी “ कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक संस्थेने प्रकाशित केले.
शोभनाताईंच्या अनमोल सेवा कार्याची दखल उशिरा कां होईना भारत सरकारने घेतली. २०११ साली त्याना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या शिवाय जमनालाल बजाज पुरस्कार, रवीन्द्रनाथ टागोर पुरस्कार, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार, राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार, कलकत्त्याचा नेहरू फेलो पुरस्कार व गांधी सेवा पुरस्कार, कांची कामकोटी आदि शंकराचार्य सामाजिक सेवा पुरस्कार, तसेच महाराष्ट्र शासनाचे अहिल्याबाई होळकर राज्य पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार, महिला विकास कार्य पुरस्कार अश्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या शोभनाताई ही इहलोकाची यात्रा संपवून अनंताच्या प्रवासाला लागल्या आहेत.
आम्हा कार्यकर्त्यांना खंत इतकीच वाटते की इतकं महान राष्ट्रकार्य केलेल्या शोभनाताईंच्या निधनाची दखल ना प्रसिद्धी माध्यमांनी नीट घेतली ना शासनाने त्यांचा मान राखला.
— लेखन : आशा कुलकर्णी. विलेपार्ले, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869454800
शोभनाताई रानडे यांचे सामाजिक कार्य मी पुण्यात पाहिले आहे.ते नक्कीच दीपस्तंभासारखे आहे.