Thursday, May 30, 2024
Homeलेखसमता सैनिक दल : आश्वासक चेहरा

समता सैनिक दल : आश्वासक चेहरा

एखादे स्वयंसेवी संघटन किंवा स्वयंसेवी सैनिक हे तत्कालीन काळात महत्त्वाचे ठरतात परंतु काही स्वयंसेवी सैनिक हे आपल्या प्रिय नेत्याच्या प्रेरणेने सदासर्वकाळ भारावून भक्त होण्याऐवजी खरे अनुयायी बनण्याचा प्रयत्न करतात. असेच एक स्वयंसेवी सैनिक संघटन आहे, ते म्हणजे समता सैनिक दल.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1919 पासून साऊथबरो समितीपुढे साक्ष देऊन सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. समाजातील बहुसंख्य वर्ग अशिक्षित आणि शूद्रातिशूद्राचे जीवन जगत होता. त्याला ते जिणे हवे होते असे नाही, पण तत्कालीन समाज व्यवस्थेने असे जगण्यासाठी त्यांना बाध्य केले होते. या अशा हीन जीवनातून बाहेर निघण्याचा कधीतरी त्यांच्या मनात आले असेलच, परंतु त्यासाठी एका समर्थ नेतृत्वाची गरज होती. असे समर्थ नेतृत्व बाबासाहेबांच्या रूपाने या समुदायाला लाभले.

बाबासाहेबांनी सांगितलेले विचार त्यांच्या कानावर पडणे आणि त्यांना ते समजणे व त्याप्रमाणे वागणे हे मोठे आश्चर्यकारक असेल त्या काळात. परंतु आपला उद्धार कर्ता जे सांगत आहे त्यात तथ्य आहे, हे समजून हा अनुयायी वर्ग त्यांच्यासोबत उभा राहिला. बाबासाहेबांनी या अनुयायी वर्गाला प्रशिक्षण देण्याचे ठरविले आणि एक स्वयंसेवक सैनिक संघटन उभे करण्याचे ठरवले. याचे नाव आहे “समता सैनिक दल”.

समता सैनिक दलातील पुरुष, महिला यांना पोलीस दलासारखे प्रशिक्षण देण्यात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या विविध चळवळीत आंदोलनात सुरक्षात्मक जबाबदारी या समता सैनिक दलाने अतिशय समर्थपणे पार पाडली.
यामध्ये महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह आणि 14 ऑक्टोबर 1956 ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली होती, त्यावेळी समता सैनिक दलाची खूप मोठी भूमिका होती. यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणच्या वेळी उसळलेला जनसागर सांभाळण्याचे कामही समता सैनिक दलाने पोलीस दलाच्या खांद्याला खांदा लावून केले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणानंतरही समता सैनिक दलाचे अविरत काम सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि कुठे कुठे बुद्ध पौर्णिमेच्या वेळीही समता सैनिक दलाचे सैनिक शिस्तबद्ध पद्धतीने आपले काम करतात. जिथे कुठे आंबेडकरी समुदायाचे कार्यक्रम होतात त्यावेळी कोणतीही अप्रिय घटना घडू नये तसेच गर्दीचे व्यवस्थित नियोजन व्हावे यासाठी सदैव तत्पर असतो.

1925 पासून समता सैनिक दलाने आपले काम सुरू केले. आज या दलाला 99 वर्षे पूर्ण होऊन शताब्दी वर्षात या दलाचेही पदार्पण झाले आहे. आंबेडकरी समाजाने सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटविलेला आहे. त्याप्रमाणे समता सैनिक दलाने समाजात एक आश्वासक चेहरा निर्माण केला आहे. हे सैनिक दल जिथे कुठे असेल तिथे महिला, पुरुष, लहान लेकरं सुरक्षित राहतील याची हमी असते. ती हमी आंबेडकरी जनतेलाच नाही, तर कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या प्रशासनाला पण असते. स्पष्टपणे बोलणे जरी टाळले जात असेल तरी प्रशासनामध्ये समता सैनिक दलाची कामगिरी ही कुणालाही बघितल्यानंतर सुरक्षित आणि आश्वासक वाटेल, अशीच आहे.

अंजु कांबळे

— लेखन : अंजु कांबळे निमसरकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments