गेल्या वर्षीच्या कृषी दिनाच्या दिवशी ;एक जुलैला आमचा पुणे ते श्रीनगर विमान प्रवास अगदी वेळेत पार पडला.त्याच दिवशी सायंकाळी सवड मिळाल्याने आल्हाददायक वातावरणात दल लेक व नजीकचा झिरो ब्रीज पाहून लॉजला परतलो. कारण सकाळी सहा वाजता कारगिलकडे आम्हाला कूच करायची होती.
श्रीनगर पासून अमरनाथ यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी जागोजागी मिलीटरी तैनात होती. रस्त्याच्या एका बाजूस उंच हिरवेगार डोंगर तर दुसऱ्या बाजूस दरीतील स्वच्छ खळाळते पाणी वाहात होते. बालताल पासून डाव्या बाजूच्या द्रास-कारगिल रस्त्याला आम्ही लागलो.घाट चढाई सुरु होताच उजव्या बाजूस नदीपात्राच्या तीरावर अमरनाथ यात्रेकरुंचा बेस कॅम्प आणि अमरनाथ कडे जाणारी डोंगरवाट दृष्टीस पडली. आम्ही चालत्या गाडीतूनच श्री.अमरनाथ डोंगरास मनोमन नमन केले. द्रासच्या अलीकडे ११,५७१ फूट उंच झोजीला पास च्या दिशेने प्रवास सुरु झाला. सगळीकडे हिरवळ विरहित चिटपाखरुही नजरेस न पडणारा उजाड डोंगरघाट दिसत होता.येथूनच हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते.डोंगरावर केवळ दगड व मुरमाड माती दिसते. टोकाला सूर्यप्रकाशात चकाकणारा बर्फ दिसतो. कडक सूर्यप्रकाश असला तरी माथ्यावरील बर्फ वितळत कसा नाही याचे आश्चर्य वाटत होते.

कारगिल वॉर मेमोरियल :
सलग घाट माथा सर करत आमची कारगिल कडे वाटचाल सूरु होती.सन १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे व्यक्तिशः पाकिस्तानात जाऊन शांती मार्गाने पाक व्याप्त काश्मीर बाबत वाटाघाटी करीत होते. पण पाकिस्तानच्या दगाबाज जनरल परवेज मुशर्रफ याने वेगळीच चाल आखली होती. त्याने इकडे कारगिल व इतर दोन हिलवर पाक प्रशिक्षित कमांडो व सैनिक धाडून चढाई सुरू केली होती. मुशर्रफचा उद्देश स्पष्ट होता. इकडे राजकर्त्यानां चर्चेत गुंतवून विश्वासघात करत कारगिल गिळंकृत करीत लडाख कब्जात घेण्याचा त्याचा डाव होता.

पाकिस्तानच्या या वर्तनाने शांत प्रवृत्तीचे व शेजार देशाच्या सदभावनेवर विश्वास ठेवणारे अटलजी कठोर बनत म्हणाले, “हम पडौशी देशसे शांती चाहते हैं ये दुनियाने देखा, लेकींन अब दुनिया ये भी देखेगी की, शांतीके लिये हम शक्ती का प्रयोगभी कर सकते हैं I”. यानुसार केवळ वल्गना करत न थांबता ३ मे ते २६ जुलै १९९९ मधील सैनिकांच्या दमदार लढाईने भारताने पाकिस्तानवर दैदिप्यमान विजय मिळवला. मात्र याकामी आपले पाचशेवर सैनिक व लष्करी अधिकारी धारातीर्थी पडले. या त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत ही कारगिल विजय वीर भूमी उभी आहे. रस्त्यालगत ताब्यात ठेवलेल्या टायगर हिल पायथ्याशी ही वीर भूमी धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या पराक्रमाची साक्ष देत त्यांना अभिवादन करत उभी आहे. सैनिकांच्या दैदिप्यमान कर्तृत्वाची बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजात बनवलेली चित्रफित पहाताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे रहातात.
बात्रा हिल :
कारगिल युध्द प्रसंगी मेजर बात्रा यांनी टायगर हिल ताब्यात घेताच स्वेच्छेने मंकी हिल सर करण्यास देखील मला पाठवा अशी विनंती केली. मेजर बात्रांचे साहस व देश भक्ती विचारात घेऊन वरिष्ठांनी त्यांना अनुमती दिली. बात्रांनी तेथेही जीवाची बाजी लावून विजय संपादन केला.

पण दुर्दैवाने स्वतः मात्र देशाकरीता शहीद झाले. म्हणूनच त्या काबीज केलेल्या हिलला ‘बात्रा हिल’ असे संबोधित केले जाते. हा परिसर पाहून सर्वांची गर्वाने छाती भरून येते. वीरभूमीतुन बाहेर पडताना कमानीवर लिहिलेले, When you go home tell them of us & say, “For your tomorrow, we gave our today”. हे वाक्य आपल्या भावी पिढीला आंतर्मुख करणारे आहे. वीरभूमीनंतर इंडस नदी किनाऱ्यावर वसलेल्या कारगिल शहरात आम्ही दुसरा मुक्काम केला.
क्रमशः
— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800