अंबिका सरकार
स्त्री जीवनाच्या सुख-दु:खांचा वेध घेणाऱ्या ज्येष्ठ लेखिका म्हणजे अंबिका रमेशचंद्र सरकार होत. स्त्री भावनांची अभिव्यक्ती कथालेखिका, अनुवादक पूर्वाश्रमीच्या अंबिका नारायण भिडे असलेल्या अंबिका रमेशचंद्र सरकार यांचा जन्म २९ जानेवारी १९३२ रोजी मुंबई येथे झाला. गिरगावातील शारदा सदनमध्ये त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण झाल्यावर विल्सन महाविद्यालयातून त्या बी. ए. झाल्या. तसेच त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एम. ए. पदवी संपादन केली.. १९५५ ते १९६० पर्यंत एल्फिन्स्टन महाविद्यालयात आणि नंतर निवृत्त होईपर्यंत त्या सिडन्हॅम कॉलेज येथे अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या.गूढशास्त्र आणि बौद्धधर्म हे त्यांच्या आवडीचे विषय होते.
अंबिका सरकार यांच्यावर लहानपणापासून विविधांगी वाचनाचे संस्कार झाले. त्यातून त्या लेखनाकडे वळल्या. तर दुसरीकडे त्यांनी भोवतालचे भावविश्व कथा-कादंबऱ्यांमध्ये रेखाटले.. त्यांनी १९५२-५३ मध्ये एका मागोमाग एक अशा सात-आठ कथा लिहिल्या त्यांतील एका कथेला स्पर्धेत पारितोषिक मिळाले. त्यांच्या कथा ‘सत्यकथा’, ‘दीपावली’, ‘हंस’ यांसारख्या मासिकांतून प्रसिद्ध झाल्या. स्वातंत्र्यानंतरच्या काळात प्रगतीची चाहूल लागलेली असताना आधुनिकतेची कास धरू पाहणाऱ्या सुशिक्षित व सुसंस्कृत तसेच स्वत:च्या भविष्याबाबत सजग असलेल्या नायिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी अनेक कथा लिहिल्या.

चाहूल’,‘ “प्रतीक्षा’, ‘एका श्वासाचं अंतर’,‘ “शांतवन’ आणि ‘अंत ना आरंभही’ अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध… मोजक्या शब्दांमध्ये अधिकाधिक आशय मांडण्याचा कथालेखनाचा आकृतिबंध त्यांनी आत्मसात केला होता. त्यांच्या पुस्तकांमध्ये मुख्यत्वे स्त्रीप्रधान कथानके आढळतात. त्याबरोबरच स्त्री-पुरूष नातेसंबंधातील वेगवेगळे पैलू ही त्यांनी मांडले. मानवी नात्यांच्या पारंपरिक प्रतिमांना छेद देत जगण्याचा प्रयत्न करण्याची त्यांची नायिका वाचकांनाही भावली. इतकच नाही
तर त्यांनी स्वतंत्र लेखना बरोबरच अनेक भाषांमधील पुस्तकांचे अनुवादही केलेत.
भिक्खू संघ रक्षित यांच्या ‘हिस्टरी ऑफ माय गोइंग फॉर रेफ्यूज’ या पुस्तकाचा ‘माझ्या शरण गमनाचा इतिहास’ आणि ‘द बोधिसत्त्व आयडिअल’ या पुस्तकाचा ‘बोधिसत्त्व आदर्श’ हा अनुवाद ही त्यांनी केला.
त्यांच मोजकच पण अत्यंत वाचनीय असं साहित्य, स्त्रीचे स्वत्व, आचार- विचाराचे स्वातंत्र्य, परंपरागत मूल्ये बाजूला ठेवून स्वतः केलेला मूल्यामूल्य विवेक यांतून त्यांनी स्त्री-जीवनाच्या सुख-दुःखांचा वेध त्यांनी कथांतून घेतला आहे… मानवी भावनांना नेमक्या शब्दांत अभिव्यक्त करणारी भावपूर्ण व संयत शैली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य…
ज्येष्ठ कथालेखिका आणि अनुवादक अंबिका सरकार यांच्या निधनामुळे स्त्रियांच्या भावभावनांना शब्दरूप देणाऱ्या लेखिका काळाच्या पडद्याआड गेल्या. स्वातंत्र्योत्तर काळात महिलांमध्ये जागृत होऊ पाहणारी स्वातंत्र्याची आकांक्षा त्यांनी संयमाने शब्दबद्ध करणा-या अंबिका सरकार यांना विनम्र अभिवादन.

— लेखन : संगीता कुलकर्णी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800