मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव (साहित्य शाखा) व सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेल (कार्यक्षेत्र महाराष्ट्र) यांचे संयुक्त विद्यमाने निमंत्रितांच्या हास्य कविसंमेलन नुकतेच संपन्न झाले.
‘नैराश्याने ग्रासलेल्या समाजाला काही काळ निश्चितपणे दिलासा देण्याचे काम या हास्य कविता करतात, यासाठी या हास्य, व्यंग, उपहासात्मक असलेल्या कविता महत्त्वाच्या वाटतात. कवी आपल्या कवितांमधून समाजाचा आरसा आपल्यासमोर साकारतात. त्या आरशातून समाजाला दिलासा मिळण्याचे कार्य कवींनी करत राहावे, अशी अपेक्षा मी याप्रसंगी व्यक्त करते.’ असा शब्दात, या प्रास्ताविक, मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव, उपाध्यक्ष डॉ. उज्वला मेहेंदळे, साहित्य शाखा कार्यवाह श्री. अशोक बेंडखळे, शब्दवेल सचिव अश्विनी अतकरे, खजिनदार देवेंद्र इंगळकर हे उपस्थित होते. या सर्वांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कविसंमेलनामध्ये नितीन वरणकार (शेगाव-बुलढाणा), प्रा. संजय कावरे (मंगरूळपीर-वाशिम), प्रवीण सोनोने (दारव्हा-यवतमाळ), प्रा.महादेव लुले (तिवसा-अकोला), अमोल चरडे(पुणे), प्रवीण बोपुलकर (पनवेल) यांनी आपल्या कविता सादर केल्या.
या कविसंमेलनामध्ये कवींनी एकापेक्षा एक दर्जेदार हास्य कविता सादर केल्या गेल्या. संजय कावरे यांच्या ‘कारल्याच्या आपबीती’ अमोल चरडे यांच्या ‘ढीला झाला स्क्रू’ देव लुले यांच्या ‘दारू कविता’, प्रवीण सोनोने यांची ‘बो’ तर कवी नितीन वरणकार यांच्या ‘माया कोरा रायला कागद अन् सरून गेली शाई, बुड्यानं माया लग्नाची बेज्या केल्या घाई’ या कवितेने अक्षरशः हशा पिकला. अनेक कवींच्या विनोदी कविता ऐकवून, सूत्रसंचालन करणाऱ्या प्रवीण बोपुलकर यांच्या, व्हॅलेंटाईन आता साजरा मला करावा वाटत नाही, कारण एकच जुना एकही नंबर आता लागत नाही. हजलला विशेष दाद मिळाली.
याप्रसंगी ‘महाराष्ट्राचा हास्य कवी स्पर्धा २०२४’ या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम सुद्धा पार पडला. यामध्ये प्रथम श्रीराम घडे, परभणी (मेहुणीची आरती), द्वितीय क्रमांक- अजय माटे, खामगाव (गूड मॉर्निग पथक), तृतीय क्रमांक-पल्लवी चिंचोळकर, अडगाव (उद्यापासून सुरूवात करते) तर उत्तेजनार्थ क्रमांक आर. के. आठवले, छत्रपती संभाजीनगर (जांगडगुत्ता) रामदास गायधने, पनवेल (डावा डोया), चेतन सुरेश सकपाळ, विरार (खड्ड्याचे आभार), महेंद्र सूर्यवंशी, पनवेल (पडत जा तिच्या पाया), विशाल कुलट, अकोट (जुटीन काय भौ यंदा माय लगन), रुतुजा कुलकर्णी, (खिशातलं पाकीट चेक करायला हवं) ,नंदेश गावंड, अलिबाग (निराशा), अशोक मिरगे, अमरावती (माझी कोपरखळी), रविकिरण पराडकर, चेंबूर (पॉझिटिव्ह), सागर सोनवणे, बेलापूर (भाऊबीज) यांना प्राप्त झाला.
‘श्रोत्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा हास्य दिसते तेव्हा तो कार्यक्रम यशस्वी झाला, असे आपण म्हणतो. आजच्या हास्य कवींनी चांगला आनंद दिला आणि साहित्य संघाला एक वेगळा कार्यक्रम केल्याचे समाधान लाभले’, असे उद्गार कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी समारोपाच्या भाषण प्रसंगी काढले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनोज वराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रतिभा विश्वास यांनी केले. याप्रसंगी साहित्य संघाचे सदस्य एकनाथ आव्हाड, नाट्यशाखेचे कार्याध्यक्ष प्रमोद पवार, संघमंदिर कार्यवाह सुभाष भागवत, साहित्यिक शिवाजी गावडे, कमलाकर राऊत, मकरंद वांगणेकर, संजय पाटील, स्वाती गावडे, परशुराम रोतेले, सुरेश नागले, सु. पु. अढाऊकर, शिल्पा चऱ्हाटे, व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांच्याबरोबर महाराष्ट्रभरातल्या अनेक भागातून आलेले कवी आणि रसिक उपस्थित होते.
एखाद्याला रडवणे खूप सोपे असते परंतु हसवणे खूप कठीण असते, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील १४२ इतक्या मोठ्या संख्येने कवींनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, ही खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे. या स्पर्धेतील विजेत्यांच्या कविता देत आहोत-
१. प्रथम पारितोषिक प्राप्त हास्य कविता –
“मेहुणीची आरती”
जय देवी जय देवी जय मेहुणीबाई
लगीन करायला थोडी केली म्या घाई ||धृ||
तू किती चांगली आन् आहेस सुंदर
माझ्या नशिबी आली भांडखोर मांजर
सतत असती ती टीव्हीच्या म्होर
हिंमत नाही बोलाया तिच्या समोर ||१||
जय देवी जय देवी जय मेहुणीबाई
लगीन करायला थोडी केली म्या घाई
शॉपिंगसाठी तिचा असतो हट्ट
नाही म्हणता पण मन करतो घट्ट
कळणा मला पगार जातोय कुठ
खाऊन पिऊन ती झालीया लठ्ठ ||२||
जय देवी जय देवी जय मेहुणीबाई
लगीन करायला थोडी केली म्या घाई
सिरीयल पाहण्यात असते बिजी
सारंच काम करतो तुझा गं दाजी
सांगते करायला मला पावभाजी
लई डेंजर आहे गं बहीण तुझी ||३||
जय देवी जय देवी जय मेहुणीबाई
लगीन करायला थोडी केली म्या घाई
तेलकट खाऊन ती पडली आजारी
जा म्हणलं तरी जात नाही माहेरी
तुला बोलावलं तिनं आमच्या गं घरी
रहा इथेच तु जाऊ नको माघारी ||४||
जय देवी जय देवी जय मेहुणीबाई
लगीन करायला थोडी केली म्या घाई
दुरच रहावं वाटतं या बायकोपासून
बरं वाटतंय जरा तु आल्यापासून
सांग तु आता गं तिला समजावून
ऐकल की गं ती तुझा मान राखून ||५||
जय देवी जय देवी जय मेहुणीबाई
लगीन करायला थोडी केली म्या घाई
नेहमी असतो तिचा माझ्यावर डोळा
बैला सारखा माझा ती करती पोळा
भांडण करून ती गांव करती गोळा
भूक लागल्यास म्हणती स्वतः घेऊन गिळा ||६||
जय देवी जय देवी जय मेहुणीबाई
लगीन करायला थोडी केली म्या घाई
तुझ्या समोर बोलती लाडी आन् गोडी
अधून मधून मात्र ती काढते खोडी
सासुकडे माझी नेहमी करते काडी
तरी अशी आहे आमची सुंदर जोडी ||७||
जय देवी जय देवी जय मेहुणीबाई
लगीन करायला थोडी केली म्या घाई
— रचना: श्रीराम घडे. परभणी
२. द्वितीय पारितोषिक प्राप्त हास्य कविता –
“गुड मॉर्निंग पथक”
झाॅंगो बुडा म्हणे,
हे कसं ईपरीत घडलं,
सरकारनं काहाले हे,
गुड मॉर्निंग पथक काढलं,
हागनदारी मुक्त गाव,
संकल्पना राबवतात,
डब्बा घिऊन दिसलं कोणी,
की त्याले पकडतात,
घरचं खाऊन म्हणे,
वागवा लागते यायचा धाक,
दंड बी करतात इचीबीन,
अन गावात कटते नाक,
गुड मॉर्निंग पथकाची,
बुड्यानं घेतली धास्ती,
दिवसा उजेडी ना जाये बुडा,
उरकून घे अंधाऱ्या राती,
नातू म्हणे आबा घरी,
संडासात काऊन ना जात,
बुडा म्हणे बिडीच्या धूपटानं,
माहा जीव कोंडते संडासात,
बिडी पेल्याबगर म्हणे,
होत नाई आपलं काम,
गरमी होते संडासात,
अन मले लय येथे घाम,
इचार करता करता बुड्याले,
कल्पना अशी काई सुचली,
बुड्याच्या डोक्यात लयच,
जालीम आयडिया घुसली,
बुडीचं लुगडं गुंडायून,
बुडा संडासले बसे,
म्हतारी बाई समजून,
कोणी लक्ष देत नसे,
पथकही बुड्याले नुसतं,
पाहात जाय दुरून,
राजरोज बुडा जाये,
बिनधोक डब्बा भरुन,
पथकातल्या सायबाले,
एक रोज संशय आला,
अन तठीच बुड्याचा,
सारा गेम फेल गेला,
दुसऱ्या दिवशी पथकात,
तपास्याले आणली एक बाई,
ते बुड्याजोळ गेली अन,
वरडली म्हणे आता माय बाई,
पथकाले म्हणे या इकडे,
पहा लुगड्यावालीले दाडी मिश्या,
घायबरला बुडा म्हणे माफ करा,
कान धरून काढतो उठबश्या,
हासत हासत पथकानं,
बुडा घरी सोडून देला,
बुड्याची वरात पाऊन,
सारा गाव जमा झाला,
तो सारा ताल पाऊन,
बुडा बेजा कानकोंडा झाला,
असा लाजला बुडा,
पुन्हा बाहीर नाई गेला,
बुड्याच्या भोवती पाहा,
हा कसा आलता वांदा,
सोडा आता वाईट सवयी,
घरीच संडास बांधा.
— रचना : अजय माटे. खामगाव, जि. बुलडाणा
३. तृतीय पारितोषिक प्राप्त हास्य कविता –
“उद्यापासून सुरुवात करते”
हृदयात टोचला काटा
ठेवता पाय, शंभरावर गेला नंबर
वजनदार संकल्प करते
कसून घेते सुटलेली कंबर
चहाला देऊन नकार
केला मी प्रेमभंग
ग्रीन टीचा कडू घोट घेऊन
जिभेने केला असंगाशी संग
इडली- डोसा- हलवा- पुरी
पाहून डोळ्यांनी केले महापाप
एकनिष्ठ हातांनी मात्र उचलले
चुपचाप टोमॅटो-काकडीचे काप
लढावे लागले अन्नयुद्ध
वेळ होता जेवणाची
घाम फुटला जिभेला
वाटी पाहून रसगुल्ल्याची
काळजावर ठेवून दगड
आईस्क्रीम चॉकलेटला केले बाय
पुन्हा समजावले मनाला
आरोग्यापेक्षा मोठे दुसरे काय
मग मोहिनी होऊन आली
चटपटी भेळ, टेस्टी पाणीपुरी
अन भस्मासुराच्या हातावर दिल्या
चाट मसाला टाकलेल्या तुरी
एका दिवसाने होते काय म्हणून
वडापाव खाल्ल्यावर कान धरते
झालं गेलं पोटाला मिळालं आता
मी उद्यापासून सुरुवात करते
— रचना : पल्लवी चिंचोळकर अनोकार.
अडगाव बु., ता. तेल्हारा, जि. अकोला
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रतिभा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली सहसचिव रामदास गायधने, संघटन प्रमुख नवनाथ माने, केंद्रिय प्रसिध्दी प्रमुख विलास पुंडले यांनी केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
काही कौटुंबिक अपरिहार्य कारणास्तव शनिवार २१ सप्टेंबर २०२४ च्या हास्य कवी संम्मेलनाचे आमंत्रण पोहचून देखील येता आले नाही.परंतु वरील कार्यक्रमाची प्रसार माध्यमावरील माहिती वाचतांना ,पारितोषिक विजेत्या कविता देखील अनपेक्षित पणे वाचायला मिळाल्या! मनापासून विजेत्यांचे अभिनंदन, कार्यक्रम आयोजकांचेही मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद!
हास्य कविसंमेलनाची समग्र बातमी. धन्यवाद