Thursday, December 5, 2024
Homeसाहित्यसुवर्णधन : संग्राह्य दिवाळी अंक

सुवर्णधन : संग्राह्य दिवाळी अंक

‘सुवर्णधन-2024’ हा दिवाळी अंक ‘मराठीची स्थिती गती’ या विषयावर आहे. हा अंक प्रो.डॉ. सुवर्णा गुंड- चव्हाण यांनी संपादित केलेला आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळाला, ही प्रत्येक मराठी माणसाच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. मराठी सारस्वतांनी शासन दरबारी अनेक वर्षे लावून धरलेली मागणी अखेर मान्य झाली. आज मराठी भाषेची स्थिती व गती कशी आहे, हे या अंकातून आपणास वाचायला मिळते. अनेक मान्यवर अभ्यासकांनी मराठी भाषेच्या स्थिती व गतीविषयी आपली मते व्यक्त केलेली आहेत.

संपादक प्रा डॉ सुवर्णा गुंड – चव्हाण

प्रो.डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण यांनी आपल्या पहिल्याच लेखात मराठी भाषा संस्कृतीची सद्यस्थिती आणि गती विषद केली आहे. मराठी ही बोली, भाषा, ही समकालीन संस्कृतीचा आविष्कार करणारी आहे. रोजगाराची भाषा इंग्रजी ही सर्व बाजूंनी मूळ धरून मराठी भाषेच्या वापरावरच घाला घालत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे. यासाठी मराठी भाषकांनी मराठी भाषा चळवळ, साहित्य प्रवाहातून रूढ होण्यासाठी हेतुपुरस्सर प्रयत्नशील राहाण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. डॉ. चंद्रकांत शहासने यांनी ‘शाश्‍वत पर्यावरण आणि ‘अ’ ची बाराखडी’ या लेखात मराठी भाषा, उच्चार, स्वर, व्यंजने यांची रचना ब्रह्मांडाच्या शाश्‍वत रचनेशी पुर्णत: सुसंगत आहे. भाषा आणि लिपी हे विषय ब्रह्मांड आणि शरीरशास्त्र या विषयांशी कशा प्रकारे एकरूपता साधतात, याचेही चिंतन केले आहे. प्रो. डॉ. प्रकाश सपकाळे यांनी ‘महाराष्ट्र शासन व मराठी भाषाविषयक धोरण’ या लेखात शिक्षणाचे माध्यम मातृभाषेतच चांगले असते. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, परंतु शासनाचे धोरण इंग्रजीधार्जिणे आहे. इंग्रजी विनाअनुदानित शाळांना उत्तेजन मिळत आहे. खेड्यापाड्यांतही इंग्रजी शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जणू इंग्रजी शिक्षणाची दुकानेच निर्माण होत असल्याची खंत व्यक्त केलेली आहे. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी ‘मराठी भाषा वृद्धीस शासकीय आधार’ या लेखात शासन मराठी माध्यमांच्या शाळांना ना परवानगी देते, ना त्यांना अनुदानित करते. उलट पटसंख्येचे कारण पुढे करून 14 हजार मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून त्यांचे समूह शाळाकरण, शाळांचे दत्तकीकरण, खसगीकरण करत शिक्षणाचा धंदा करणार्‍यांच्या हाती शिक्षण सोपवून सरकार मोकळे होऊ पाहात असल्याचे म्हटले आहे. डॉ. प्रदीप औजेकर यांनी ‘माय मराठीचे शिलेदार’ या लेखात मराठी भाषेला प्रदीर्घ लढाईनंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मुळात मराठी भाषा अभिजात आहे, हे समजावून देण्यासाठी केंद्र शासनाला बारा वर्षे लागली, ही खर्‍या अर्थाने मराठी भाषेचे दुर्देव आहे, असे म्हटले आहे. प्रा. विकास बा. पाटील यांनी आपल्या ‘मराठी भाषेतील साहित्य संशोधन आणि बौद्धिक स्वामित्व हक्क: एक व्यापक दृष्टिकोन’ या लेखात साहित्य संशोधनाची आवश्यकता, बौद्धिक स्वामित्व हक्क म्हणजे काय? पेटंट म्हणजे काय? मराठी भाषिक संशोधक आणि पेटंट प्रक्रिया, पेटंट अर्जाची प्रक्रिया, साहित्य संशोधनातील स्वामित्व हक्क इ. मुद्यांवर सविस्तर व मुद्देसूद माहिती दिली आहे. मराठी भाषा, साहित्य संशोधन आणि पेटंट प्रमाली हे एकत्रितपणे विकासाची प्रक्रिया आहेत. मराठी संशोधक आणि साहित्यिकांनी जागतिक पातळीवर काम करण्यासाठी बौद्धिक स्वामित्व हक्कांचे पालन करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. अ‍ॅड. बाबासाहेब जाधव यांनी ‘मराठी भाषा, कायदे आणि न्यायालये’ या लेखात वकिलांनी जास्तीत जास्त मराठीचा वापर आणि अशील म्हणून मराठीचा आग्रह धरावा. जरी न्यायालयामध्ये मराठीचा वापर अवघड असला तरी आपण सर्वांनी मिळून तो सोपा व सुखकर केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली पाहिजे.

अ‍ॅड. नंदिनी शहासने यांनी ‘इमोजीचा कायदा’ या लेखात आजच्या समाज माध्यमांच्या काळात इमोजीचा वापर प्रत्येकाने विचारपूर्वक करावा. न्यायालयाच्या दृष्टीने इमोजींचे काय व कसे अर्थ निघतात याचे सविस्तर विवेचन केले आहे.

डॉ. सुनील विभुते यांनी ‘मराठी ज्ञानभाषा होईल का?’ या लेखात मराठीचे बौद्धिक जग फार छोटे आहे आणि जे आहे तेही अक्रसलेले आहे. समाजातील बुद्धिमान लोक मराठीचा ज्ञानभाषा म्हणून सक्षमीकरण करण्याऐवजी इंग्रजीला कवटाळतात व स्वत:ची प्रगती करून घेण्यात धन्यता मान असल्याचे म्हटले आहे.

श्री राजेंद्र भोसले यांनी ‘मराठी भाषा आणि परभाषिक शब्द’ या लेखात संस्कृत, इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुुगू, फारशी, फ्रेंच, आदी भाषांतील शब्द मराठीत स्थिर झाले व ते मराठी भाषेने स्वीकारले, याचे सविस्तर विवेचन केले आहे. मराठी भाषा ही प्रवाही असल्याने असे शब्द स्वीकारणे अपरिहार्य आहे. त्यामुळे मराठी भाषेची लवचिकता टिकून राहाते. परभाषेतून मराठीत स्थिर झालेले काही शब्द त्यांनी दिलेले आहेत.

डॉ. अशोक तवर यांनी ‘अभिजात भाषा व मराठीची सद्यस्थिती’ या लेखात अभिजात भाषा म्हणजे काय? अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी निकष, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे होणारे फायदे, मराठी अभिजात भाषा दर्जा: सद्यस्थिती या मुद्यांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. प्रो. डॉ. जयद्रथ जाधव यांनी ‘कला शाखा:एमपीएससी परीक्षा व मराठी भाषा’ या लेखात महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांमध्ये मराठी भाषेचे कसे महत्त्व आहे. आयोगाच्या परीक्षेचे स्वरूप लक्षात घेता परीक्षार्थ्यांला मराठी भाषा सखोलपणे अवगत असणे आवश्यक आहे. आयोगाने नेमलेला मराठी विषयाचा अभ्यासक्रम विद्यार्थ्याने नीटपणे समजून घेतला पाहिजे. या परीक्षांमध्ये मराठी भाषेचे स्थान हे अनन्यसाधारण असल्याचे म्हटले आहे. प्रो. डॉ. संजयकुमार कदंरीकर यांनी ‘बृहन्महाराष्ट्र: मराठी भाषा आणि अध्ययन, अध्यापनाचे स्वरूप’ या लेखात मराठी भाषेचा प्राचीन इतिहास कथन केला आहे. गुजरात राज्यात मराठी भाषेची स्थिती कशी आहे हे सांगितले आहे. मराठी भाषेच्या भवितव्याचा नव्याने विचार करणे क्रमप्राप्त आहे. सर्वसाधारण जनतेचा आणि राज्यकर्त्यांचा प्रादेशिक भाषांबद्दलचा संकुचित दृष्टीकोन शेवटी ह्या भाषांना आणि पर्यायाने या देशातील संस्कृतीला घातक ठरणार असल्याचे म्हटले आहे. प्रा. डॉ. मनीषा नेसरकर यांनी ‘बेळगाव परिसरातील मराठीची स्थिती गती’ या लेखात महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर असलेल्या बेळगाव परिसरात मराठीची स्थिती काय आहे, हे विषद केले आहे. बेळगाव परिसरात मराठी भाषेबद्दल आस्था आहे. तेथील माणसास मराठी भाषेचा प्रचंड अभिमान आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, साहित्य संमेलने, गायन आदी कार्यक्रम मराठी भाषेत आनंदाने व उत्साहाने साजरे केले जातात, असे म्हटले आहे.

डॉ. एन.जी. काळे यांनी ‘मध्य प्रदेशातील मराठी भाषा-दशा आणि दिशा’ या लेखात स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्रोत्तर मराठीची स्थितीचे वर्णन केली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मध्य प्रदेशातील मराठी माणूस जिकरीने प्रयत्न करत आहे. मराठी भाषेसाठी अनेक मंडळे व समित्या स्थापन झाल्या असून त्या मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी जोमाने प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

प्रा. अशोक आलगोंडी यांनी ‘कर्नाटकातील मराठीची स्थिती गती’ या लेखात बेळगावी बोलीचे रूप, मराठीचे खच्चीकरण, मराठी शाळांची अवस्था, मराठी ग्रंथालये, सीमाभागातील मराठी साहित्य संमेलने या बाबींवर प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कर्नाटकातील 865 गावांतील तरुणांना शासकीय आदेश काढून नोकरीसाठी पात्र ठरवले आहे. तसेच कर्नाटकातील हद्दीत अनेक गावे आहेत की जिथे 30 ते 50 टक्के लोक मराठी बोलतात. यांना या शासकीय आदेशाचा लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

प्रो.डॉ. विठ्ठलराव टी. गायकवाड यांच्या ‘कर्नाटकात मराठे आणि मराठीचे स्थान’ या लेखात प्राचीन अर्वाचीन काळात मराठीची अवस्था चित्रित केलेली आहे. कर्नाटकवासीय मराठी लोक मराठी संस्कृतीत असलेले सण साजरे करतात. महाराष्ट्रातल्या अनेक देवतांची भक्ती करतात. मराठी भाषेच्या संस्कृतीचा पगडा हा महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर आहे. तसेच त्यांनी या लेखात कर्नाटकात असलेले मराठे व त्यांचा इतिहासही कथन केलेला आहे. हा लेख लेखक कन्नड भाषिक असल्याने त्यांच्या भाषेत असल्याने त्यांच्या मराठी भाषेला कन्नड भाषेचा हेल प्राप्त झालेला आहे. त्यामुळे कर्नाटकात मराठी भाषा कशी बोलली जाते, याची कल्पना येते.

डॉ. विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचे ‘फिरत्या परप्रांतीयाच्या लेखणीतून’ या शिर्षकांतर्गत ‘परप्रांतातून फिरताना लेखनाचे सातत्य ठेवणारा लेखक’, ‘भाषेची लवचिकता’ व ‘पाट्या बदलून नेमके काय साधणार ?’ हे तीन लेख या अंकात समाविष्ट केलेले आहेत. पहिल्या लेखात लेखकाचा साहित्यप्रवास आहे. दुसर्‍या लेखात- भाषा बोलताना त्या भाषेचे मूळ पावित्र्य, सौंदर्य राखले जावे ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे. तिसर्‍या लेखात फक्त पाट्या बदलून काही साध्य होणार नाही. त्यापेक्षा मातृभाषेत बोलण्यात, लिहिण्यात, व्यक्त होण्यात आत्मविश्‍वास व अभिमान असला पाहिजेे, असे म्हटले आहे.

सौ. उमा शिंदे-वांगीकर यांचा ‘वाचन संस्कृतीचे ऊर्जा स्रोत:देशातील पहिले पुस्तकाचे गाव-भिलार’ या लेखात ‘पुस्तकाचे गाव- भिलार’ गावाविषयी लिहिले आहे. विविध ग्रंथांनी सजलेले हे गाव भिलारची ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून महाराष्ट्रात, देशात व जगात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शासनाच्या प्रयत्नांबरोबरच भिलारवासीयांनीही आपल्या जागा ग्रंथांसाठी मोफत दिल्या, ही उल्लेखनीय बाब आहे. या गावामुळे वाचकांची, अभ्यासकांची चांगली सोय झाली. विविध वाङ्मयप्रकारांतील ग्रंथ येथे वाचनासाठी उपलब्ध असतात.

या अंकातील कविता विभागामुळे अंकाला बहारदारपणा आलेला आहे. बद्दीऊज्जमा बिराजदार यांची ‘मी मराठीच्या कृपेने…’, प्रो.डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण यांची ‘दिप उजळूनी मराठी तेज:पुंजती’, सौ. वंदना कुलकर्णी यांची ‘मराठीची गाऊ थोरवी’, सौ. रुपाली महेश रामशेट्टी यांची ‘मातृभाषेचे शल्य’, राजेंद्र भोसले यांची ‘माझी मराठी’, विमलताई माळी यांची ‘माय मराठी’ या कविता मराठी भाषेची महती व थोरवी गाणार्‍या आहेत.

अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांची मुलाखत प्रो.डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण यांनी घेतली असून मराठी भाषेबद्दलची चिन्मयी सुमीत यांची मते जाणून घेतली आहेत. हे या अंकाचे प्रमुख आकर्षण आहे. दोघींच्या गप्पांत मराठी भाषेचे अनेक पैलू वाचकांसमोर आलेले आहेत.

विठ्ठल बरसमवाड यांनी ‘माध्यमिक स्तरावर मराठी भाषेची सद्यस्थिती’ या लेखात माध्यमिक शालेय स्तरावर मराठी भाषेची सद्यस्थिती विषद केली आहे.

डॉ. दीपक पाटील यांनी ‘संतसाहित्यातील आयुर्वेद’ या लेखात आयुर्वेदाची व्याख्या व संतसाहित्यातील आयुर्वेदाचे महत्त्व हा विषय मांडला आहे.

तेजारी शहासने यांच्या ‘प्रसारमाध्यमे आणि मराठीची स्थिती गती’ या लेखात प्रसारमाध्यमांतून मराठी भाषेचा कसा वापर केला जातो, हे सांगितले आहे.

डॉ. चिन्मय घैसास यांनी ‘विकिपीडिया-मराठी भाषा आणि मराठीची सद्यस्थिती’ या लेखात समाजमाध्यमांवरील मराठी भाषेचा आढावा घेतला आहे.

श्री देवेंद्र भुजबळ यांनी ‘पेार्टल-मराठीची स्थिती गती’ या लेखात समाज माध्यमांवरील पोर्टल या प्रकारात मराठीचा कसा उपयोग केला जातो, हे सांगितले आहे.

श्री रमेश साळुंखे व दत्तात्रय पाष्टे यांनी प्रकाशन व्यवसाय, वितरण, विक्री याबद्दल माहिती दिली आहे.

या अंकाच्या सुरूवातीलाच अ‍ॅड. चित्रकार महारुद्र जाधव यांनी रेखाटलेले व्यंगचित्र खूपच बोलके झालेले आहे. मराठी भाषा इतर भाषांपेक्षा कशी श्रेष्ठ आहे, हे हे व्यंगचित्र पाहिल्यानंतर वाचकांच्या लक्षात येते.

प्रो. डॉ. सुवर्णा-गुंड यांनी संपादकिय आपल्या संपादकीय विभागात मराठी भाषेच्या सद्यस्थितीविषयी विस्ताराने खुलासा केलेला आहे.

या अंकातील सर्वच लेख मराठी भाषेच्या बाबतीत अभ्यासपूर्ण आहेत.त्यामुळे हा अंक अभ्यासकांना, समीक्षकांना, वाचकांना संग्राह्य असा झाला आहे. मराठी रसिक वाचक या अंकाचे नक्कीच स्वागत करतील, यात शंका नाही.
(पूर्व प्रसिद्धी: दै.सुराज्य, सोलापूर)

राजेंद्र भोसले.

— परीक्षण : राजेंद्र भोसले. सोलापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !