सर्वद फाउंडेशन ही एक सेवाभावी सामाजिक संस्था आहे. समाजातील विविध दुर्बल घटकांना बलशाली बनवण्यासाठी आणि त्यांची कार्यशीलता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांना सहकार्य लाभल्यास ते आपल्या स्वतःचा समाजाचा व पर्यायाने देशाचाही विकास साधतील या हेतूने दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी सर्वद फाउंडेशनची स्थापना करण्यात आली.
मराठीतील ज्ञानपीठ विजेते साहित्यिक विंदा करंदीकर म्हणतात, “देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ” समाज आपल्याला देतो त्यातूनच सारी व्यक्तिमत्व घडत जातात आणि मग वेळ येते दातृत्वाची !! हेच सर्वदचे ध्येय!!
” रखीए भरोसा स्वयंपर, क्यू ढूंढते है फरिश्ते ? पंछियों के पास कहा होते है नक्से, फिर भी ढुंढ लेते है रास्ते !!” हा विश्वास देऊन स्वतःच्या पायावर दुर्बल व आदिम मंडळींना उभे करण्यासाठी सर्वद फाउंडेशनची धडपड आहे.
रामदास स्वामी म्हणतात, “केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ” या प्रेरणेने आम्ही सामाजिक क्षेत्रात पाऊल ठेवले.
समाजात अनेक संस्था येतात, सेवाभावी वृत्तीने कार्यही करतात, तरीही समस्या काही संपत नाही. बालकांच्या, स्त्रियांच्या, वृद्ध व्यक्तींच्या, युवकांच्या समस्या अशा अनेक समस्या समाजात आहेत. ह्या सर्वांचे आधार बनून त्यांना खंबीरपणे जगण्यासाठी तयार करण्यासाठी सर्वदचे कार्य सुरू आहे.
आम्ही केलेल्या निरीक्षण आणि सर्व्हे नुसार आजही अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते किंवा अर्धशिक्षित राहावे लागते. बालकामगार म्हणून आर्थिक परिस्थितीमुळे राबवावे लागते.या व्यक्तींना आपल्याच घरात प्रेमाने राहता येत नाही. एक ना असंख्य समस्या! या समस्यांचा सर्वद फाउंडेशन ने अभ्यास केला आणि ह्या गर्तेत किती खोल जखमा आहेत याची कल्पना आली. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्यात काम सुरू केले आहे. सारणी या गावात आठवी नंतर शिक्षण थांबतं हे लक्षात आल्यावर आजूबाजूच्या शिक्षण संस्थांशी संपर्क साधून या समस्येवर तोड काढण्याचा प्रयत्न केला. इथे एक शिक्षण संस्था गरिबांच्या मुलांसाठी उभारण्याचा आमचा मानस आहे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
आदिवासी व दुर्बल घटकांचे शिक्षण थांबण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती! इथे चार महिने पिकणारी तुटपुंजी शेती सोडली तर दुसरे आर्थिक साधन नाही. चिंबावे, सारणी, ऐना या सारख्या गावातून मजूर स्थलांतरित होतात व मुलांचे शिक्षण थांबते. त्यांच्यासाठी मधुमक्षिका पालन, विविध वस्तू बनवणे, वारली पेंटिंग अशा लघु उद्योगाच्या उभारणीचे काम आम्ही करीत आहोत. वृद्धांसाठीच्या सर्व्हे नुसार त्यांना आपले घर वाटावे असे “आपले घर” उभारण्याचा सर्वदचा मानस आहे.
मनोर या आदिवासी बहुल भागात दहा दहा किलोमीटर चालून विद्यार्थी अनवाणी शाळेत येतात. पावसाळ्यात छत्री नाही. एकच वही, पायात चप्पल नाहीत पण शिक्षणाची दुर्दम्य इच्छा असणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना “सर्वदने” छत्र्या, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिली यांचे वाटप केले.
सारणी गावात विविध पाड्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना अभय इंटरनॅशनल स्कूल विक्रोळी व सर्वद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
अनाथ विद्यार्थिनी रोशनी कांबळे, दूर्धर आजाराने ग्रस्त गणेश हडकर अशा गरजू व्यक्तींना सर्वदने सर्वतोपरी मदत केली आहे.
सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातही गेल्या वर्षभरात सर्वदने स्तुत्य कार्यक्रम केले आहेत. यात स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार समारंभ, फोटोग्राफर्स आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार समारंभ, मान्यवर ज्येष्ठांसाठी जीवनगौरव पुरस्कार समारंभ अशा भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले.
नवोदित कवींसाठी “सर्वद कवी कट्टा” ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच विविध विषयांवरील निष्णात व्यक्तींच्या वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले गेले.
अनेक दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे काय करायचे हा प्रश्न पडतो. त्यासाठी दहिसरला विद्याभूषण हायस्कूल येथे आणि विक्रोळीला अभय इंटरनॅशनल स्कूल होणार करियर गायडन्स वर्कशॉप घेतले गेले.
पालघर मधील बोईसर या ठिकाणी दोन सूत्रसंचालन, निवेदन, भाषण व व्हाईस कल्चर या विषयांवर वर्कशॉप घेतले गेले. यासाठी लोकसत्ता डॉट कॉमचे मुख्य संपादक श्री. पंकज दळवी यांना निमंत्रित करण्यात आले होते.
पालघर, उनभाट, सातारा अशा शाखा उघडण्यात आल्या आहेत. पालघर जिल्हा शाखेतर्फे बोईसर व एमआयडीसी भागातील लोकांसाठी विनामूल्य भव्य मेडिकल कॅम्प घेण्यात आला. यात ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.साई ज्योत राऊत, गायनाकोलॉजिस्ट डॉ. प्रशंसा दळवी, डॉ. निमिषा राऊत या डॉक्टरांचा सक्रिय सहभाग होता.
मच्छीमार बांधवांच्या प्रचंड समस्या आहेत. त्यांच्या समस्यांवर अभ्यास व सर्व्हे सुरू आहे.
वृद्धांसाठी आपले घर बनवण्यासाठी जागा उपलब्ध झालेली नाही. त्याच्या शोधात आम्ही आहोत.
महाराष्ट्र -गुजरात सीमाभागात भव्य मराठी साहित्य संमेलन भरवून मराठीच्या पुनरुज्जीवनासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.
विविध देशात मराठीसाठी कार्य करणाऱ्या मंडळींचा सन्मान करण्यासाठी एक खास समारंभ आयोजित करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र मंत्रालयाशी आम्ही संपर्क साधला आहे. सर्वद च्या कार्याची दखल त्यांनी घेतली आहे.
या कार्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध नसूनही सर्वद फाउंडेशनने वर्षभरात ही घोडदौड केलेली आहे. आपला समाज सबल बनण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत व ते फलद्रूप होईल अशी सर्वद टीमला सार्थ आशा आहे.या बाबतीत आपण काही मदत करू शकल्यास आपले स्वागत आहे.
— लेखन : प्रा डॉ सुचिता पाटील. सर्वद फाउंडेशन, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800