Sunday, March 23, 2025
Homeलेखस्त्री सक्षमीकरण : काल आणि आज

स्त्री सक्षमीकरण : काल आणि आज

॥ यत्र नार्यस्तु पूजन्ते ॥
॥ रमन्ते तत्र देवता ॥

आपल्या भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग. जिथे स्त्रीला सन्मान दिला जातो तिथेच देवतांचा वास असतो. देवतांचा वास म्हणजेच जिथे घरातल्या स्त्रीपुरूष सर्वांना एकत्र घेऊन विचार विनिमय केला जातो, सर्व माणसे आनंदी असतात. पर्यायाने सारे कुटुंब सुखी आनंदी असते.

पण सन्मान म्हणजे काय तर दागदागिने देणे, उंची वस्त्रे देणे आणि स्त्रियांची प्रशंसा करणे असे असते का हो! तर नाही. त्यातला गर्भितार्थ असा आहे स्त्री पुरुष समानता हक्क, अधिकार, समान वागणूक असा आहे. थोडक्यात स्त्री सक्षमीकरण असले पाहिजे. आता स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय तर, स्त्रीला हतोत्साहित न करता, तिच्यावर अत्याचार किंवा तिला हीन वागणूक न देता, तिचा जीवनस्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणे. त्यासाठी पोषक वातावरण निर्मिती करणे. तसेच, लैंगिक समतेद्वारे (जेंडर इक्वॅलिटी) समाज संतुलन साधण्यासाठी विवेकी समाजाने बाळगलेला दृष्टिकोन आणि कृती यातला समन्वय म्हणजे स्त्री सक्षमीकरण करणे किंवा स्त्रीचे सबलीकरण करणे.
आता ही सक्षमीकरण प्रक्रिया पूर्वापार चालत आली आहे का याचा उहापोह करू या.

या सृष्टीमध्ये पशुपक्षी, प्राणी इत्यादी मध्ये नरच वर्चस्व गाजवताना दिसतात. परंतु मानवप्राणी त्यांच्याहून वेगळा आहे, कारण परमेश्वराने त्याला दिलेली बुद्धी ! त्यामुळे दोघांनाही समान दर्जा, हक्क, अधिकार असायला हवेत. परंतु,पुरुष आपल्या बुद्धीचा वापर कायम स्वतःचे वर्चस्व राखण्यासाठी करत आला आहे. पुरुष स्त्रीपेक्षा निसर्गतःच बलवान असल्यामुळे स्त्रीवर अधिकार गाजविण्याची, तिच्यावर वर्चस्व दाखविण्याची त्याची वृत्ती राहिली.

अश्मयुगात रानटी अवस्थेतील पुरुषांनी टोळ्या बनविणे, स्त्रियांना आपल्या दबावाखाली ठेवणे ठीक होते. परंतु, जसा जसा मानवी मेंदू उत्क्रांत होत गेला, तसा तसा बुद्धीतही सुधार होत गेला आणि मानवाला नव्या जाणिवा होऊ लागल्या. परंतु स्त्रियांचे स्थान मात्र दुय्यमच राहिले. पुरुषाने शिकार करणे व स्त्रीने अन्न शिजवणे असे वाटप झाले. पुढे उत्क्रांती होत गेली तशी, स्त्री पुरुष समाज व्यवस्था थोडीफार बदलत गेली.

हा समाजव्यवस्था बदल पाहायचा झाला, तर त्याचा पुढीलप्रमाणे कालावधी पाहावा लागेल.

१) वैदिक काल- वैदिक काळामध्ये स्त्रीची अवस्था बऱ्यापैकी उंचावलेली होती. स्त्रियांना अध्ययन करण्याचा अधिकार होता. तसेच, चर्चा वादविवाद करण्याचाही अधिकार होता. त्या अधिक ज्ञानी तशाच कर्तृत्ववानही होत्या. उदा. गार्गी, मैत्रेयी, सूर्या, जाबाला इत्यादी. एकंदरीत त्यावेळच्या वैदिक साहित्यातून असे दिसते की, स्त्रियांना वैदिक अध्ययन अधिकार होता, धार्मिक कार्यात भाग घेण्याची परवानगी होती.तसेच,सभांमध्ये चर्चा, वाद-विवाद त्या करू शकत असत. एवढेच नाहीतर त्यांना पतीनिवडीचाही अधिकार होता. एकंदरीत स्त्रियांचे जीवन आनंदी होते.

२) परंतु, नंतरच्या वैदिक काळात स्त्रीचे स्थान व त्यांची मुक्तता यामध्ये मतमतांतरे,भेदाभेद होऊ लागला. विविध राज्यांमधले राज्यकर्ते, राजे अधिक सत्तालोलुप होऊ लागले. त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे वर्णव्यवस्था जाऊन जातीव्यवस्था येऊ लागली. नव्हे ती, हळूहळू गतिमान होऊ लागली आणि त्यातूनच स्त्रियांनी फक्त ‘चूल व मूल’ सांभाळावे, त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही, धार्मिक कार्य करण्याची परवानगी नाही. त्यांनी फक्त आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवावे. अशा प्रकारचे नियम लादले गेले. एवढेच नाही तर कित्येक राजांच्या उद्दामपणामुळे स्त्री ही एक उपभोग्य वस्तू ठरली.

३) पौराणिक काळात एखाद्या राजाला एखादी स्त्री आवडली तर तो हक्काने तिचा उपभोग घेत असे. अगदी ती विवाहित असली तरी ! घरी आलेल्या अतिथीने जर स्त्रीभोगाची मागणी केली तरी यजमान ती पुरवित असे. स्त्रीला काय वाटत असेल, तिच्या मनाची अवस्था कशी असेल याचा विचार न करता! तेव्हा श्वेतकेतुला मात्र हे काही आवडले नाही आणि पटलेही नाही. त्याने एक नियम केला की, विवाहित स्त्री फक्त तिच्या पतीचीच पत्नी राहील. मुद्गल पुराणात याचा उल्लेख असून स्त्री सक्षमतेच्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल होते.

४) रामायण आणि महाभारत कालात स्त्रिया तशा सुखी होत्या. परंतु, त्यांचे अधिकार सीमित होते. रामायणात सीता राणी असूनही तिला स्वतंत्र अधिकार नव्हता. त्यामुळे तिचा काही दोष नसताना, केवळ दुसऱ्याच्या सांगण्यावरून तिला झालेला नाहक वनवास याचेच उदाहरण आहे. महाभारतातही द्रौपदीला पाच पांडवांची पत्नी व्हावे लागले. नरकासुराने तुरुंगात डांबलेल्या १६००० स्त्रियांना श्रीकृष्णाने सोडविले तरी, त्यांचा कोणीही स्वीकार करायला तयार नव्हते. त्यावेळी श्रीकृष्णाने घेतलेली त्यांची जबाबदारी हे सक्षमीकरणाचे थोडं पुढचं पाऊल!

५) पुढे ब्राह्मणक कालावधीमध्ये ब्राह्मणांना मनुस्मृति, इतर ग्रंथातून बेसुमार अधिकार मिळाल्यामुळे स्त्रियांचे अधिकार, हक्क यांचे आकुंचन होत राहिले. मालमत्ताहक्क, शिक्षणाधिकार तर काढूनच घेतले गेले. स्त्रियांच्या मानहानीची, खच्चीकरणाची ही परंपरा वेगवेगळ्या राजवटीतही चालूच राहिली. एवढेच नाही तर, स्त्री म्हणजे फक्त पुरुषांच्या सुखोप भोगाचे एक साधन झाली. उच्चनीचते मुळे नीच जातीच्या स्त्रियांचे जिणे मुश्कील झाले.त्यांना सर्वच हक्क नाकारले गेले.

६) मुघलकालीन राजवट तर या साऱ्या गोष्टींचा अतिउच्च परिपाक होता. एवढ्या घनघोर दुरावस्थेच्या तिमिरात स्त्री सबलीकरणाची एक ज्योत लावली ती, छत्रपती शिवाजी महाराजांनी ! स्त्रीला सन्मानपूर्वक, आदराची वागणूक दिलीच पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. त्यानुसारच त्यांची स्वतःची वर्तणूक होती. स्त्रीवर अत्याचार/बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचा चौरंगा केला जात असे. तसेच जबरदस्तीने धर्मांतरित झालेल्या स्त्रियांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांचा आदर केला जात असे.त्यांच्या राज्यात स्त्री निर्भयपणे कोठेही जाऊ शकत असे. स्त्री सशक्तीकरणासाठी करण्यात आलेल्या सुधारणा, नियम सारे काही तत्कालीन इतिहासकारांनी/बखरकारांनी नमूद केलेले आहे. स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे सुद्धा पुढचे पाऊलच होते.

याच कालावधीत संत मांदियाळीतील ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, जनाबाई, मुक्ताबाई इत्यादी संतांनी समानता, जातीभेद न करणे यावर कित्येक अभंगांद्वारे शिकवण दिली आहे. समर्थ रामदास स्वामीनी बहूसंततीबाबत ‘लेकुरे उदंड जाली, तव ते लक्ष्मी निघोनी गेली’ हे लिहून सांगितलेच आहे. एकनाथ महाराजांनी भारुडांद्वारेही छान शिकवण दिली. या साऱ्यांतूनही स्त्री सक्षमीकरण होत राहिले.

परंतु त्यानंतर इंग्रज राजवटीत शिक्षण सुधारणेचे थोडे वारे आले. परंतु जातीव्यवस्था एवढी घट्ट झाली होती की, हे सारे हक्क पददलित तसेच खालच्या जातीतील स्त्रिया, शोषित वर्गातील स्त्रिया यांना डावलले गेले. त्याही काळात स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने काम करणाऱ्या काही दृष्ट्या व्यक्ती होत्या. त्यांनी स्त्री सबलीकरणाचे प्रयत्न सुरू केले होते. त्यात प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, धोंडो केशव कर्वे, र.धों. कर्वे इत्यादी होते. महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्रियांच्या गुलामगिरी व जातीव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले. स्त्री शिकली तरच, कुटुंबाची आणि देशाची प्रगती निश्चित होईल हे त्यांनी जाणले होते आणि या सत्कर्माची सुरुवात आपल्या घरापासूनच करावी या विचाराने त्यानी स्वतःची पत्नी सावित्रीबाई हिला शिक्षण देण्यास सुरुवात केली, एवढेच नाही तर अशिक्षित स्त्रियांना शिकविण्यासाठी त्यांना उद्युक्त केले.

सावित्रीबाईंनीही मोठ्या निष्ठेने आणि धारिष्ट्याने प्रतिगामी लोकांनी मारलेले शेणगोळे सहन करून शिकविण्याचे व्रत शेवटपर्यंत आचरले. फार गदारोळ उठला होता त्यांच्याविरुद्ध ! पण त्या अविचल राहिल्या. म.फुलेंच्या साहित्यातून स्त्रीचे सशक्तीकरण करण्याबद्दलचे लेखन दिसून येते. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांच्या पुनरुत्थानासाठी आग्रह धरला होता. विधवा विवाहासाठी ते आग्रही होते, एवढेच नाही तर त्यांनी स्वतः विधवेशी विवाह केला होता. स्त्रियांनी शिक्षण घेतलेच पाहिजे या विचाराने पुण्यातील हिंगणे येथे स्त्रियांसाठी शाळा सुरु केली. स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने प्रत्यक्ष आणि साहित्यातून अशी अनेक पावले पुढे पडत राहिली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र रघुनाथ धोंडो कर्वे यांनी त्या वेळची स्त्रियांची ‘चूल आणि मूल’ ही स्थिती पाहिली, तसेच त्यांची वारंवार होणारी बाळंतपणे, त्यामुळे क्षीण होणारी प्रकृती, कधीकधी तर मृत्यूसुद्धा होताना पाहिले. जास्त संततीमुळे दैन्य, दारिद्र्य व स्त्रीची शारीरिक आबाळ व हेळसांड होते हे त्यांचे पक्के मत असल्यामुळे त्यांनी संतती नियमनाची मोहीम सुरू केली. त्यासाठी त्यांना खूप टीका सहन करावी लागली. स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने हे आणखी एक पाऊल होते. त्यांनी यावर एक पुस्तकही लिहिले. लोकहितवादींचे ‘शतपत्रे’, न्यायमूर्ती रानडे यांचे लेखन, राममोहन राॅय यांची सतीच्या चालीविरोधातील चळवळ स्त्री सक्षमीकरणाची नांदी होती.

म फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, सावित्रीबाई फुले, र.धों.कर्वे, लोकहितवादी यांच्यामुळे आता थोडी थोडी का होईना स्त्री जागृती होऊ लागली होती. शिक्षणाचे महत्त्व कळू लागल्यामुळे सुस्थितीतील कुटुंबांमधील स्त्रिया शिकू लागल्या. त्यांना नवनव्या जाणिवांचे पंख फुटू लागले. त्या लेखनातून व्यक्त होऊ लागल्या. समकालीन बऱ्याच स्त्रियांनी स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार, त्यांना दिली जाणारी हीन वागणूक, घुसमट इ. वर विपूल लेखन करून स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली. उदा.लक्ष्मीबाई टिळक यांचे ‘स्मृतीचित्रे’ रमाबाई पंडित यांचे लिखाण. यामध्ये मालतीबाई बेडेकर या प्रमुख लेखिका होत्या. त्यांनी त्यांच्या लिखाणातून हुंडाबळी, स्त्रीअत्याचार, त्यांची मनोवस्था यावर प्रकाश टाकलाच, तसेच स्वतंत्र अस्तित्वासाठी लढणारी स्त्री यावरही प्रकाश टाकला. त्यांचा ‘कळ्यांचे निश्वास’ हा प्रसिद्ध कथासंग्रह उत्तम उदाहरण आहे. त्या एक विचारवंत तसेच सामाजिक ऋण मानून काम करणाऱ्या बंडखोर लेखिका म्हणून प्रसिद्ध होत्या.

स्वातंत्र्यानंतर स्त्री सक्षमीकरणाचे जास्तीत जास्त काम कोणी केले असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ! अत्यंत द्रष्टा माणूस ! आपल्या संविधान घटनेचा शिल्पकार !! महिला सशक्तीकरणाबाबत त्यांची विचारधारा अतिशय समर्पक आहे. ‘शिका व संघटित व्हा’ हा त्यांचा मूलमंत्र होता. त्यांनी स्त्री विकासाला फार महत्त्व दिले होते. ‘देशाची प्रगती पाहायची असेल तर तेथील स्त्रियांची प्रगती पाहावी. स्त्री पुढारलेली असेल तर समाज पुढारलेला आणि समाज पुढारलेला असेल तर राष्ट्र पुढारलेले असते’ हे त्यांचे मत अतिशय योग्य व समर्पक आहे त्यासाठी ‘मुलामुलींना शिक्षण दिले पाहिजे. त्यांच्यातला न्यूनगंड काढून त्यांना महत्त्वकांक्षी केले पाहिजे. सर्व सुविधा असतील तरच लग्न करावे. विवाहित स्त्रियांनी स्वतःला पतीची दासी न समजता मैत्रिण समजावे’ अशी त्यांची सुधारित मते होती.

हिंदू कोड बिल लिहून महिलांना अधिकार, बरोबरीचे हक्क, वेगवेगळ्या तरतुदी यांची प्रस्थापना केली. तसेच त्यांना पक्ष संघटनेतही बरोबरी दिली. भेदभावाच्या जागा, पुरुषी वर्चस्व, उच्चनीच वर्ग, आर्थिक विषमता, जातीव्यवस्था, बहुसंख्यांक /अल्पसंख्यांक यातला भेद, स्त्रीपुरुष समता, समाजव्यवस्थेची चिकित्सा, आंतरजातीय विवाह इत्यादींवर खूप सविस्तर लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या घटनेतील नियमांमुळे अनेक स्त्रिया उच्चशिक्षित झाल्या. विविध क्षेत्रांत उच्च पदांवर काम करु लागल्या. रोजंदारीवर काम करणाऱ्या स्त्रियांचाही त्यांनी बारकाईने विचार केला होता. कलम 395 अन्वये स्त्री-पुरुषांना ‘समान काम समान वेतन’ असा कायदा केला. स्त्री सक्षमीकरणासाठी असे अनेक सर्वंकष मुद्दे त्यांनी विचारात घेतले आणि घटनेमध्ये उद्धृत केले. अशा रीतीने घटने द्वारे स्त्रीला तिच्या स्वतःच्या जीवनावर अधिकार व नियंत्रण मिळवणे सुकर झाले.

सक्षमीकरणाची वर्गवारी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय आणि मानसिक अशी करता येते. तसेच लिंग समानता म्हणजे स्त्री-पुरुषांच्या जीवनात समानतेची पातळी दर्शवली जाऊन त्यात भिन्न आवडीनिवडी व गरजा अंतर्भूत होतात.

पण हे सारे अमलात आले का! तर नाही असेच चित्र आहे. देशाच्या सामाजिक आरोग्याची गुणवत्ता त्या देशात स्त्रियांना मिळणाऱ्या वागणुकीतून ठरते. आर्थिक बाबतीत तरी स्त्रिया सक्षम आहेत का! तर नकारात्मकताच दिसते. नोकरी करायची पण पगार घरच्यांच्या हातात. स्त्रीचे स्वतंत्र खाते/ गुंतवणूक नाही. त्याची खंतही तिला वाटत नाही हे विशेष ! त्यांना आर्थिक व्यवहार शिकवले जात नाहीत किंवा मुद्दाम कळू दिले जात नाहीत. सशक्तीकरण/सबलीकरण याचा अर्थच मुळी महिलांना आपले हित चांगले समजते. फक्त शासनाचे उपक्रम, योजना त्यांना हातभार लावणाऱ्या असल्या पाहिजेत. त्याबाबत नियोजन कर्त्याचा दृष्टिकोन हा असा असावा की, महिलांना पुढे येऊन स्वतःच्या परिस्थितीची छाननी करून समाजाला योग्य दिशा किंवा आकार देता येईल. यामध्ये शासनाची भूमिका सुलभीकरणाची व सबलीकरणाची असली पाहिजे.

यासाठी महाराष्ट्र शासनाने महिला आर्थिक विकास मंडळाची स्थापना केली असून त्याद्वारे महिला संघटन, बचत गट स्थापन केले गेले आहेत. बचत गटांतून पापड लोणची इत्यादी पासून आयआरसीटीसी (रेल्वे) मध्ये भोजन कंत्राट घेणे इथपर्यंत महिलांनी मजल मारली आहे.

स्त्री मुक्ती चळवळ, स्त्रीवादी लेखक लेखिकांनी सुद्धा आपल्या लेखनातून स्त्री अन्यायावर घणाघाती प्रहार केले आहेत. पुरुषप्रधानतेला विरोध करून स्त्रीचे माणूस म्हणून चित्रण करणे म्हणजेच स्त्रीवाद. स्त्रीवादी पुरुष किंवा स्त्री असू शकते. दीपा नारायण यांनी जवळजवळ ६०० स्त्रियांच्या मुलाखती घेऊन ‘चूप’ हे पुस्तक लिहिले आहे. निवेदिता मेनन, ईस्मत चुगताई यांनीही स्त्री अन्यायावर पुस्तके लिहून स्त्री सक्षमीकरणावर आपला ठसा उमटविला आहे. लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी तर स्वतःच्या जीवनावर पुस्तक लिहून तृतीयपंथीयांचे दुःख, त्यांचे प्रश्न यावर प्रकाश टाकला आहे. कमला भसीन यांनी आपल्या लिखाणातून पितृसत्तेवर ताशेरे ओढले आहेत, तर कमला दास या लेखिकेने स्त्रीला सुद्धा प्रेमाच्या उत्कट कल्पना असू शकतात यावर लिखाण केले आहे.

थोडक्यात हळूहळू स्त्री सशक्तीकरण /सक्षमीकरणाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. स्त्रिया आता बोलू लागल्या आहेत. हक्क, अधिकार, स्वातंत्र्य याबाबत सजग झाल्या आहेत. राजकारणातही महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण करण्यात आले आहे. सक्षमीकरणाच्या दृष्टीने सजगता नक्कीच आली आहे पण किती ! एवढ्या प्रचंड जनसंख्येत हाताच्या बोटांवर मोजण्याएवढीच !

अजूनही स्त्री सक्षमीकरण अपुरेच आहे. वैद्यकीय सुविधा, मालमत्ता हक्क, लैंगिक आरोग्य, तांत्रिक प्रशिक्षण यामध्ये स्त्रियांना गौण स्थान आहे. स्त्रियांना स्वतःला जोपर्यंत आपले हक्क अधिकार सुरक्षा शिक्षणाधिकार इत्यादी बाबत जाणीव होत नाही तोपर्यंत महिला सक्षमीकरण अपुरेच राहणार यात काही वाद नाही.

— लेखन : श्रद्धा जोशी. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments