आपल्याला लहानपणी वाचलेली, सांगितल्या गेलेली हत्ती अन् सात आंधळे ही गोष्ट माहिती आहे.या गोष्टीत प्रत्येक आंधळ्याला हत्ती वेगळा भासतो. म्हणजे तो ज्या अवयवाला हात लावतो, त्या प्रमाणे तो हत्तीची कल्पना करतो.प्रत्यक्षात मात्र हत्ती (म्हणजे पूर्ण सत्य) वेगळाच असतो.
आज या गोष्टीचा प्रत्यय आपल्याला व्यवहारात रोज जाणवतो.एकच घटना असते. पण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसतात. इतिहासातील एकाच महापुरुषाच्या आयुष्यातील एकाच प्रसंगाचे,किंवा ग्रंथात असलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातात.धर्मात सांगितलेल्या आचार विचारांच्या बाबतीत देखील हेच घडते. मग त्यातून वाद निर्माण होतात.मूळ सत्य,मूळ विधान बाजूलाच राहते. आपल्या गैर समजुतीतून विषयाला वेगवेगळे फाटे फुटत जातात.
एखादा मृत्यू हा खून आहे की आत्महत्या यावर वर्षानुवर्षे खटले चालतात.कायद्याचा काथाकुट केला जातो.आरोप प्रत्यारोप होतात.वकिली युक्तिवाद चालतात. पण शेवटी सत्य उलगडतेच असे नाही. किंबहुना सगळेच प्रकरण अधिकाधिक गुंतागुंतीचे होत जाते.गेल्या काही वर्षात घडलेल्या घटना याची साक्ष देतात. अशी प्रकरणे जाती धर्माशी संबंधित असतील तर त्याला राजकारणाचा वेगळाच रंग लागतो. अनेक गोष्टी दाबल्या, लपवल्या जातात.
एका न्यायाधीशाच्या घरच्या आऊट हाऊस मध्ये लागलेली आग, त्यात सापडलेल्या (किती करोड माहिती नाही) जळलेल्या नोटा,त्यातून उठलेले न्यायिक, सामाजिक प्रश्न हे तर अगदीच ताजे उदाहरण आहे. हे सगळे कुटुंबात घडते, समाजात घडते, दोन राज्यात, देशात देखील घडते.कोण नेमके कशासाठी भांडतो हेच कळत नाही. मुळात भांडणाची, वाद वाढविण्याची गरज होती का हेच कळत नाही. पण या एकाच घटनेचे अनेक पडसाद समाजात प्रचंड त्सुनामी उलथापालथ घडवित असतात एवढे मात्र खरे.
आता आपण याकडे गणिती विद्यान किंवा तांत्रिक दृष्टिकोनातून देखील बघू शकतो. हजारो वर्षापूर्वी आपल्या पंडितांनी याकडे अनेकांतवाद म्हणून पाहिले. कोठल्याही गोष्टीकडे, घटनेकडे, इतिहासाकडे, तथ्याकडे केवळ एकाकी दृष्टिकोनातून न बघता ३६० अंशातून बघणे हा तो अनेकांतवाद..आज त्याची पुन्हा नितांत गरज निर्माण झाली आहे. पूर्वी असे बहू अंगाने विश्लेषण करण्यात मानवी बुद्धीच्या,क्षमतेच्या अडचणी होत्या. आता कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्राने अशा मर्यादा राहिलेल्या नाहीत. एकाच घटनेचे, तथ्याचे, वेगवेगळ्या अंगातून विश्लेषण सहज शक्य आहे. पूर्वी आपण अशा बाबतीत निर्णयावर येण्यासाठी केवळ आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहिती वर, नॉलेज वर अवलंबून होतो. आता गुगल, इंटरनेट, तंत्राने जगातील अशा घटनेचे, वक्तव्याचे, तथ्याचे वेगवेगळ्या अंगाने, भूमिकेने केलेले विश्लेषण, अभ्यास पूर्ण चिंतन आपल्याला कमी वेळात उपलब्ध होते. न्याय व्यवस्था म्हणा, तपास यंत्रणा म्हणा, सरकार म्हणा.. कुणीही खोलात जाऊन सर्वांगाने चिंतन मनन करू शकतो. अर्थात सत्याच्या मुळाशी जाण्याची, त तथ्याचातळ गाठण्याची तीव्र इच्छा असली तरच.
महा कुंभ विषयीच्या बातम्या, दिशा सुशांत मृत्यू प्रकरण, बीड प्रकरण,ताजे दिल्लीतील न्यायमूर्ती संबंधित नोटा जाळण्याचे, सापडल्याचे प्रकरण या ताजा अनुत्तरित घटना या दृष्टीने बोलक्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेन रशिया युद्ध, इस्रायल, हमास, इराण येथील भीषण नरसंहार किंवा आपल्याकडील वाढत चाललेली धार्मिक, जातीय तेढ..अशा अनेक समस्यांकडे आपण हत्ती अन् सात आंधळे या गोष्टीतल्या सारखे एकांगी न बघता, सर्वांगाने तथाकथित प्रश्नांचे पृथक्करण केले तर काहीतरी चांगले, सर्व मान्य तोडगे निघण्याची दाट शक्यता आहे. समाजातील संघर्ष, गांभीर्य कमी होण्याची शक्यता आहे.यासाठी समाजातील सर्व विषयाच्या अभ्यासकांना, विद्वानाना एकत्र यावे लागेल. आता आपापल्या हस्तिदंती मनोऱ्यात रमणे, आपला अहंभाव जपणे बंद झाले पाहिजे. आतापर्यंत आपण फक्त पोलादी भिंती बांधत गेलो. त्यातच प्रत्येकाने धन्यता मानली. मुळात आतापर्यंतची मानवाची प्रगती ही सहकारी तत्वावर झाली आहे. आपण आज जिथे आहोत तिथे पोहोचण्या साठी जगाच्या काना कोपऱ्यातले लाखो, करोडो हात कारणीभूत आहेत. त्यामुळे आता पोलादी भिंती ऐवजी आपल्याला सहकाराचे पूल बांधावे लागतील वर उल्लेखिलेल्या प्रश्नाकडे सामंजस्याने बघण्यासाठी डॉक्टर, संगणक इंजिनिअर, गणिती, समाज शास्त्रज्ञ, कायद्याचे अभ्यासक, राजकारणी, शासक, प्रशासक अशा सर्वांना एकत्र यावे लागेल. सुदैवाने आता तुम्हाला स्वतःला डोके खाजवण्याची, गुंतागुंतीच्या समस्येची भीती बाळगण्याची गरज नाही. कारण महाकाय हत्तीकडे (गुंतागुंतीच्या समस्येकडे) बघणारे आता सात आंधळे राहिले नाहीत. त्यांची जागा लाखो डोळस ए आय तंत्रज्ञांनी, अभ्यासकांनी घेतली आहे. अडचण फक्त एवढीच आहे की, आपल्याला समस्या खरेच सोडवायच्या आहेत, की प्रश्न असेच चिघळत ठेवण्यात रस आहे ?

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800