Tuesday, November 12, 2024
HomeUncategorizedहलकं फुलकं

हलकं फुलकं

साडीचं “carryत्व”😃

आज पासून आपल्या पोर्टल वर अनुजा बर्वे, विलेपार्ले, मुंबई या लेखन करणार आहेत. त्यांनी बॅंक ॲाफ बडोदा मधून स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर लेखनाचा छंद जोपासत आहेत. ललित लेख, लघु-कथा, थोडंफार काव्य असं सगळं लिहिण्याचा त्या प्रयत्न करत असतात.

भारतातले विविध दिवाळी अंक, लोकसत्ता-चतुरंग -पुरवणी, मटा- सांगा नं गोष्ट , BMM दिवाळी अंक आणि जर्मनी मधल्या मराठी मंडळातर्फे प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकातही त्यांचं लेखन प्रसिध्द झालं आहे. त्यांची “फुलबाज्या” (ललितलेख संग्रह) “कीर्तन कीचनचं” (पारंपारिक पाककृती)” म्हंज्ये काय गं आज्जी ?” (शब्द एक अर्थ अनेक ह्या संकल्पनेवर आधारित ‘आजी-नातवाचे संवाद’) ही ३ पुस्तकं प्रकाशित झाली असून तिसऱ्या पुस्तकाला दोन राज्य स्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

समाजमाध्यमांच्या “फेसबुक -व्हॅाटसॅप” ह्या २ भालदार -चोपदारांची ओळख झाल्यापासून त्यांचा लेखन- उत्साह अधिकच वाढला आहे. (रसिक वाचकांच्या तिथे मिळणारया प्रतिसादामुळे अर्थातच !☺️)
आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर ऐसी अक्षरे रसिके, चिंतन, गंमत-जंमत ह्या कार्यक्रमांमध्येही लेखन सादर करायची संधी मिळाल्यामुळे त्यांचा लेखनाचा हुरूप नक्कीच वाढला आहे.
यु-ट्युबवरही अन्य वाचकांनी त्यांच्या लेखनाचं सादरीकरण केलं आहे.

न्यूज स्टोरी टुडे परिवारात अनुजा बर्वे यांचे मनःपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

जाऊया जाऊया म्हणतांना खूप दिवसांनंतर ‘युरोप’ ट्रीपचं ठरलं आमचं एकदा (म्हंजे एकदाचं !😃)

‘साठी’ पूर्वी केलेल्या ट्रीपसाठीचा फिटनेस आणि आत्मविश्वास आता ‘गाठी’शी राहिला नसल्याने पूर्वतयारी कशी अन् कशाकशाची करावी ह्याचा जरासा गोंधळ उडत होता मनात.

गेल्याच वर्षी जाऊन आलेल्या माझ्या ‘चुलतचुलत’ मैत्रिणीला अनुभव विचारावा म्हणून फोन लावला तर, “अग्गं, ट्रीपच्या निमित्तानं रग्गड शाॅपिंग केलं. ‘Westend’ला जाऊन ट्राऊजर्स-टाॅप्स, Three fourths, टी-शर्टस्- (ही ‘टी’व- ‘टी’व किती लांबतेय 🤔 याचा मला बापडीला अंदाज येईना !)
‘in thing’ असलेल्या सग्गळ्या कपड्यांची हौस भागवून घेतली. साडी-बीडीच्या फंदात मुळी पडलेच नाही. धम्माल नुस्ती !
(साडीच्या फंदात ‘न’ पडण्यात एवss ढी धम्माल अस्ते 😳)
युरोप-भेटी’चा अनुभव एकदम मस्त होता. पण….

तुम्ही जाताय तेव्हाचा सिझन आम्ही गेलो त्यापेक्षा वेगळा असेल बहुतेक ! तू बघ बाई, अंदाज घे !!
असंही, तिथे अत्ता छान ऊन आहे असं म्हणता म्हणता पटकन पावसाची सर येते आणि वातावरण एकदम थंडगार होऊन जातं. तिथलं हवामान अगदी बेभरवशी !”

एकंदरीत तिच्या अनुभवाचा मला काहीच उपयोग नाही ह्याचा ‘अनुभव’ घेऊन चुकले मी. नाही म्हणायला (म्हणायचं तर आहे, मग हे ‘नाही’ का बरं म्हणावं😲) तिथलं हवामान आणि माझं physical status मिळतं-जुळतं (म्हंजे बेभरवशी) असल्याचं मात्र लक्षात आलं माझ्या. त्यामुळे खरं तर चिंता वाढलीच जराशी.😔

‘A friend in need…’ म्हणतात तसं ह्यावेळी “WhatsApp” धावून आलं मदतीला ! महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून बुकींग झाल्याने युरोप ट्रीपच्या लीडरने सहप्रवाशांचा ‘WhatsApp’ ग्रुप बनवून सगळ्यांना ‘टुगेदर’ आणण्याचं “गेट” उघडून दिलं.😊 मुली आणि बायकांनी तर एक पाऊल पुढे टाकून (तसं आजच्या काळाला धरूनच आहे म्हणा हे !) ‘लेडिज स्पेशल ग्रुपही’ बनवला आणि मला ’चिंतामुक्तीची’ वाट गवसल्यासारखं वाटलं. ग्रुपवर सचित्र मेसेजेसचा वर्षाव सुरू झाला.

“युके-व्हिसाच्या तुलनेत, शेंझेन व्हिसाचं काम पटकन झालं.

मी त्याच दिवशी कुरतीज् , प्लाजो वगैरेचं शाॅपिंग करून टाकलं.”- एक मध्यम वयीन मेसेज.

“अय्या मी सुध्दा असंच जमलं तेवढं शाॅपिंग सेम डे ला केलं ! बर्फात गेम्स खेळायला थ्रीफोर्थ सुध्दा घेऊन टाकलं. ”अजून एक मिडफिफ्टीज दुजोरा.

हे ट्रॅव्हलवाले ग्रुपलिस्ट बनवून circulate करतांना ‘वयाचा मुलाहिजा’ ठेवत नाहीत 😜 (म्हंजे females चं ही खरं वय छापून टाकतात)

“सुरभि, मला ‘ऑफ शोल्डर आणि शाॅर्टस् मिळालेत. पण प्रॅक्टिकल्स n extra lectures मुळे, कोल्ड शोल्डर, जीन्स n all purchase करायला टाईमच नाही, यू नो😔”
एक लेट टीनेज (म्हंजे around नाईन्टीन यू नो) मेसेज.

“Yeah, but chil-pil yarr ! वो तो तू online शाॅप कर सकती है !”

हे अस्से मेसेज longwith फोटोस (हल्ली लिहितांना अधलंमधलं/सुरूवातीचं एखादं अक्षर ‘न’ लिहिण्याची फॅशन आलीय म्हणे ! आता alongwith मधला हा ‘a’ गाळल्याने तो कितीसा ‘कमी long’ होणारे 🤔) या सगळ्याला मी आपली दाद देत होते, ‘oh wow’, ‘Gr8’ म्हणून आणि 👌, 👍वगैरे दाखवून !

मनात मात्र थोडी धास्तावले होते कारण ह्यातल्या कशालाच मी यूजटू नसल्याने प्रत्यक्षात ह्या कपड्यानाच मी अंगठा दाखवला होता.🙃

“अनुजा काकू, तुमच्या शाॅपिंगचं काय ? मस्त ‘फंकी’ आऊट फिटस् घेऊन या.” सुरभि चा मेसेज.

“Hmm ! शाॅपेनच मी लवकर !!”

असा मोघम रिप्लाय दिला खरा पण ‘फंकी आऊटफिटस्’ या शब्दांनी विचारात पाडले मला.

खरंतर, अंगाला चिकटलेल्या प्रापंचिक जबाबदारयांमधून इतक्या वर्षांनंतर नुक्तीच मोकळीक मिळाल्याने, अंगाला चिकटणारी जीन्सही मला नकोशी वाटत होती.☺️ ‘कोल्ड शोल्डर’ वापरल्याने जर ‘फ्रोझन शोल्डर’नं उचल खाल्ली तर ट्रीपची मजा ‘हातातून’ निसटायची धास्ती होती 😃 विचारांच्या गुरफटण्यात मनात विचार आला,
अर्रे ! नक्की काssय आहे हे ? ‘फंकी’ म्हणजे ज्यामुळे ‘फन key’ हातात पडते असे आऊटफिटस् 🤔 की वेगळंच काही ? ’फन’ किंवा ‘धम्माल’ ने हल्ली हेss कपडे पांघरलेयत ? की ट्रीपला जाणार यांनी (पारंपरिक कपडे नियमबाह्य ठरवून) ‘फॅशनकोड’ पांघरलाय डोळ्यावर ? या ‘आऊटफिटस्’च्या विचारांनी डोकं ‘आऊट’ व्हायची वेळ आली 😏

“सगी नाचली म्हणून बगी नाचली” असं होऊ नये म्हणून मी शेवटी “ऐकावे जनाचे करावे मनाचे” ही खूणगाठ बांधली.

‘गुगल’ करून हवामानाचा अंदाज घेतला, (कर्त्याप्रमाणे ‘क्रियापद’ चालणे ह्याला ‘कर्तरी -प्रयोग’ म्हणतात असं काहीसं शिकवलं होतं आम्हाला पण आताशा ‘गुगलोपयोगामुळे’ कशाचंही क्रियापद होऊ शकतं, खुद्द ‘गुगल’चंही😊)

आईटीनरीचा अभ्यास करून साड्या आणि साध्या सैलसर ड्रेसेसची संख्या ठरवली नी माझी बॅग पॅक करून टाकली.

ट्रीपची सुरूवात लंडन पासून झाली. ‘Trafalgar Square’ इथले पुतळे पाहण्यात मी गर्क होते. बाजूला मिश्र वयोगटातल्या ३/४ जणींचं ‘सेल्फी’ काढणं चालू होतं. (त्यांच्या गोऱ्या रंगावरून अन् लुक्सवरून स्थानिक असाव्यात असं वाटलं) त्यांची फोटोग्राफी झाल्यावर अचानक माझ्याजवळ येऊन त्यांनी कुतुहलाने विचारलं, “Your attire is different n pretty ! What is it called as ? And why did you put that sticker on your fore head ?”

‘मी म्हणजे ग्रुपमध्ये एकदम odd woman out दिसणारे’ -ही भीती बाळगलेल्या माझ्यासाठी हे “Saree appreciation” खूप आश्चर्यकारक होतं.😳 त्यांचं शंकानिरसन करतांना थोडंसं सुखावल्यागत झालं खरं !😊

ग्रुपमध्येही कळलं ह्या प्रसंगाबद्दल तेव्हा, “अनुजाकाकू, खर्रच तुम्ही साडी खूप छान कॅरी करता”
वगैरे ‘टीनेज काॅम्प्लिमेंटस्’ही आले पाठोपाठ !!😃

“अगं, काय काय ‘कॅरी’ करावं लागतं बाई, त्यात साडीचं काय एवढं मोठ्ठं“ असं काही न म्हणता हसून साजरी केली वेळ !!

ट्रीपच्या सातव्या दिवशी, “Swarovski” मध्ये जायच्या आधी असंच झालं. आवारात एका मध्यमवयीन जोडप्याच्या, ”would you please click ?” ला मान देऊन मी त्यांचा फोटो काढला.
Thanks देताना प्रश्न आला,

“Are you from India ? Your saree n necklace are amazing !! But why there are so many black beeds ?

प्रश्नांची यथायोग्य उत्तरं दिली खरी पण नंतर, “अरेच्चा, साडी हा प्रकार आवडतोय की, अन् लक्षवेधकही आहे, मग इतका अप्रिय का होत चाललाय ?” असा माझा मलाच प्रश्न पडला.🤔

हां, हां म्हणता ग्रुपमधल्या सगळ्यांची ओळख होऊन सूर जुळायला लागतायत तोवर परतीचा दिवस उजाडला.😔

‘Air India’ च्या विमानात प्रवेश करणारयांच्या लाईनीत उभी होते.
दरवाजाजवळ ‘हवाई-सुंदर’ सुहास्य मुद्रेनं स्वागतासाठी सज्ज होता. ‘हाय, हॅलो’ ऐवजी,
“नमस्तेजी, ”म्हणत मी प्रवेश करू लागताच, हवाई-सुंदर वदला,
“नमश्कार, साडी बढियाॅं है ! देखने अच्छी लगती हैं !” 😍
“जी, शुक्रिया !” असं म्हणत ‘seat’ च्या दिशेनं मोर्चा वळवला.

फॅशनबरोबर ‘carried away’ न होता साडी कॅरी करायच्या निर्णयाने साडीचं ‘carryत्वं’, नव्हे महत्त्व असं अधोरेखित होईल याची मला ट्रीपला निघताना कल्पना नव्हती. ह्या अनुभवानंदातच मी विमानात स्थानापन्न झाले.😊

— लेखन : अनुजा बर्वे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. अनुजा बर्वे ह्यांचे लेखन नेहमीच खुसखुशीत, हलकं फुलकं आणि तरीही दर्जेदार असते. “साडीचे Carryत्व” वाचताना मन रंगून गेले, मनापासून आनंद मिळाला. लेखिकेचे कौतुक आणि असे सुंदर हलके फुलके सदर चालविल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन 🙏💐

  2. खूप सुंदर लेख 👌👌👌वाचताना पिकनिकला जाऊन आल्याचा आनंद मिळाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments