Monday, September 9, 2024
Homeलेखहलकं फुलकं

हलकं फुलकं

“आधुनिक कथुली”

आज श्रावणातला पहिला सोमवार ! म्हणजे ‘शिवामूठीचं व्रत’🙏
व्रत म्हटलं की # कहाणी हवीच !☺️
तर……..
श्रावण महिन्यातल्या ह्या कहाण्या
ऐकणं ही पर्वणी असे माझ्या लहानपणी !😍
तशा ढंगात आधुनिक कथुली लिहिण्याचा हा 👇एक प्रयत्न. 😊

वसा ई-साक्षरतेचा 🤓

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट !
(२१व्या शतकात आठेक वर्षापूर्वीची म्हणजे फार फार्रच ! राईट ?)

आटपाट सहनिवासात एक कुटुंब रहात असे. त्यातले राजा – राणी नि दोन राजपुत्र आधी अगदी आनंदाने रहात. जसजसे राजपुत्र राजाच्या पावलावर पाऊल टाकून शिक्षणात यशस्वी होत गेले तसतसे ते राजाच्या मर्जीत राहू लागले आणि…

ई-युगात राणी मात्र हळुहळु मागे पडत गेली (खरंतर मागासलेली ठरली) नि त्या त्रिकुटाची नावडती झाली.

यथावकाश, शिक्षणाच्या मोहिमेसाठी राज मान्यतेने दोन्ही राजपुत्रांनी देशांतर केलं.
राजा नि राजपुत्रांचं त्रिकुट ई-संवादा ने आणखी घट्ट जोडलं गेलं.

राणी मात्र नावडतेपणाने दुरावत गेली.

राजपुत्र मोहिमेवर गेल्यानंतरच्या पहिल्या श्रावणात तिनं पुत्रांच्या क्षेम-कल्याणा साठी व्रतंवैकल्यं करायचं योजलं.
त्यातल्या देवांच्या कहाण्यां मधून राणीला प्रेरणा मिळाली नि तिनं वसा घेतला- स्वत:साठीही !🤓

सर्वप्रथम राणीने आपल्या खाजगी ठेवी तून वशासाठी लागणारं एकमेव साहित्य, (अगदी पारंपरिक कहाण्यातल्या एक मूठ साहित्या सारखं😀) म्हणजेच स्मार्ट फोन खरेदी केला.

देवांच्या कहाण्यांनी प्रेरित झालेल्या राणीला पतिदेव सहाय्य करतील असा भरवसा नव्हताच मुळी !😔

त्यामुळे—
सहनिवासात राहणाऱ्या नि रोज सायं वॅाक घेणारया एका नवयौवना उमे शी जवळीक साधली. उमेनंही राणीला सखी म्हणून स्विकारलं.☺️

नंतर श्रावणातल्या दर सोमवारी सहनिवासाच्या कट्ट्यावर ह्या सखी-पार्वती च्या जोडीनं चौसोम (४ सोमवारची😀) योजना आखली.

राणीनं, ई-तंत्र-संथा घ्यायचं निश्चित केलं.🤓

पहिल्या सोमवारी काय घ्यावं ?-
मुठीतल्या मोबाईलला मनोभावे नमस्कार करून राणीने संपूर्ण
मोबाईल-कार्य नि ई-जोडणी आत्मसात करून घेतली, उमे कडून !😊

मग दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या सोमवारी उमेच्या समक्ष सहाय्याने, ई-मेल, व्हाॅटसॅप, फेसबुक मध्ये लक्ष वाहिलं राणीने !!🤓

उतणार नाही मातणार नाही
घेतला वसा टाकणार नाही
हे ब्रीद वाक्य ठेवून राणीने उपासना सुरूच ठेवली.🙏

राजपुत्रांना पहिल्यांदा ‘मेल’ करून ई-धक्का देत देत हळुहळु राणी ई-स्मार्ट तर झालीच पण…

आत्तापर्यंत ‘राजपुत्र’ हीच दुनिया असलेल्या राणीच्या कक्षा रूंदावल्या नि ती संपूर्ण जगाशी जोडली गेली.

वसा फळाला आला 😌

राजा आणि राजपुत्रांची कमालीची आवडती झाली राणी !😍

नेट चे निर्मळ मळे, गुगलचे तळे, फेसबुकचा वृक्ष,
व्हॅाटसॅप-इन्स्टाग्रॅमची देवळे रावळे.
मुठीतला मोबाईल मनी वसावा.
संपूर्ण ई-साक्षर व्हाव. संपूर्णाला काय करावं ?
ॲानलाईन अल्पदान करावं.

ही बोटाच्या टोकावर उत्तरं असणारी कहाणी सुफळ संपूर्ण🙏🙏

(हा वसा कुणी घ्यावा ?🤔
काळाबरोबर राहू इच्छिणारया कुणीही घ्यावा
नि घेतला वसा टाकू नये😛)

— लेखन : अनुजा बर्वे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अनुजा ताई, आटपाट नगरातील आधुनिक कहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण झाली आणि आज तुमच्याआमच्या सारख्या अनेक उमा व त्यांच्या सख्या “घेतला वसा टाकू नये, उतू नये, मातू नये” ह्या नेमाने स्वतःची प्रगती साधत आहेत. त्यांना मोबाईल रुपी शंकराचे वरदान निरंतर लाभत राहू देत, हीच सदिच्छा!🙏💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments