“अशी झाली गम्मत”
स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या सेवेतून मी एप्रिल २००६ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून म्हणजेच मागील सतरा अठरा वर्षांपेक्षा जास्त काळापासून माझा चहा मी स्वतःच करून घेतो. चहा पिऊन झाल्यावर माझी कपबशी धुवून जागच्या जागी ठेवून देतो. माझी सौ. कधीच चहा घेत नसल्यामुळे मी तिला माझ्यासाठी चहा करण्याचा किंवा माझी कपबशी धुण्याचा त्रास देत नाही. अर्थात माझे अनुकरण इतर सेवानिवृत्तानी केले पाहिजे असे माझे म्हणणे नाही. असो.
मी चहाचा शौकीन असल्यामुळे मला वेगवेगळ्या ब्रँडची चहापूड तसेच निरनिराळे चहाचे मसाले माझ्या चहामध्ये वापरायला आवडतात. तर एकदा काय झालं, घराजवळच असलेल्या दुकानामधून अनेक वस्तूंसोबत नामांकित कंपनीच्या चहाच्या मसाल्याचे एक पॅकेट आणि सौ. च्या सांगण्यावरून त्याच कंपनीचे सांबार मसाल्याचे एक पॅकेट विकत घेतले. चहाच्या मसाल्याचे पॅकेट निळ्या रंगाचे तर सांबार मसाल्याचे पॅकेट जांभळ्या रंगाचे होते. प्रत्येक पॅकेट पन्नास ग्रामचे होते. घरी आल्यावर सर्व वस्तू योग्य जागी ठेवून ही दोन्ही पॅकेट्स किचनमध्ये रॅकवर पटकन नजरेस पडतील अशा ठिकाणी ठेवून दिली.
त्याच दिवशी नेहमीप्रमाणे दुपारी बरोबर चार वाजता माझा दुपारचा चहा करण्यासाठी मी किचनमध्ये आलो. सौ. सुद्धा सहज गप्पा मारण्यासाठी तिथे येऊन बसली. मी चहाच्या पातेल्यात कपभर दूध टाकून त्यात साखर आणि चहाची पूड टाकली आणि पातेले गॅसवर ठेवले. पहिला चहाचा मसाला संपलेला होता म्हणून मी नवीन पॅक फोडला. आवश्यक तेवढा चहाचा मसाला हातावर घेतला. तर लगेच सौ. म्हणाली, “आज या चहाच्या मसाल्याचा रंग लाल का बर दिसतो ? नेहमी तर रंग वेगळा असतो.” तर मी तिला म्हणालो, “प्रत्येक कंपनी आपल्या मालाचा खप वाढावा म्हणून आपल्या उत्पादनात वेळोवेळी सुधारणा करीत असते. हा त्यांचा धोरणात्मक निर्णय असतो. त्यामुळेच आज चहाच्या मसाल्याचा रंग बदललेला दिसतोय.. त्यात काय एवढे ?”
तर ती म्हणाली, “तेही खरंच आहे.”
चहाचा मसाला चहामध्ये टाकल्यावर आणि चहा उकळल्यावर मी कपावर गाळणी ठेवून चहा कपात ओतला. कपातून थोडा चहा बशीत ओतल्यावर त्या चहाचा रंग थोडा लालसर वाटला; बशी तोंडाला लावली आणि एक घोट घेतला तर चहाला चक्क सांबारची चव आली होती. मी तोंड कसनुसे केले.
मग मी किचनमधील रॅककडे पाहिले तर चहाच्या मसाल्याचे पॅकेट तिथेच होते आणि मी हातात घेतले ते सांबारचे पॅकेट होते, हे माझ्या लक्षात आले आणि सौ. च्या सुद्धा लक्षात आलेले दिसले. मी सौ. कडे बघितले तर ती गालातल्या गालात हसत मला म्हणाली, “तुम्ही नेहमीच चहाचे निरनिराळे मसाले वापरता ना! मग आज हा सांबार चहा प्या !!”
तर अशी झाली माझ्या चहाची गम्मत.
— लेखन : उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
😁😁 खूपच मजेशीर होता किस्सा,वाचायला मजा आली
उध्दवजी दादासाहेब व्वा भन्नाट अनुभव कथन केला आपण ….
गोविंद पाटील सर जळगाव