आता जाऊ द्या ना गावी… वाजले की… !
काही दिवसापूर्वी माझ्या रवी जोशी नावाच्या मित्राच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे पुण्यात जमलो होतो. अर्थातच आपापल्या आठवणी स्टेजवरून सांगताना प्रत्येकालाच हुरूप येत होता. थोडासा दुरून मी ते सर्व पहात होतो आणि माझ्यासमोर पन्नास वर्षांपूर्वीचे ते रवी आणि रंजन समोर दिसायला लागले. माझे लग्न, रवीचे लग्न आणि आम्हा दोघांचा आणखी एक मित्र सुधीर सहस्रबुद्धे याचे लग्न एकापाठोपाठच होणार होते.
मुख्य म्हणजे रवीचे लग्न थोडेसे अनोखे होते. त्याला घरच्यांचा विरोध हा महत्त्वाचा वेगळेपणा होता. त्यामुळे वेळ पडली तर पळून जाऊन लग्न करणे हे त्या काळात साहसाचे होते. आणि ते करण्यासाठी इतर मित्र आणि मी मुद्दाम कानपूर होऊन भेटायला आलेलो होतो. त्यानंतर माझी लग्नाची जागा पुण्यात होती. दुसरा मित्र सुधीर याचा विवाह त्याच्या मामांच्या मिरजेच्या मंगल कार्यालयात संपन्न झाला होता. एका माझ्या सुट्टीच्या काळात एकामागे -एक थ्री इन वन- विवाह होणार होते. त्यामध्ये रवीचा जवळचा मित्र आणि हवाईदलातील असलेला म्हणून माझा वेगळेपणा होता. शिवाय काही कमी पडले तर पैशाची व्यवस्था करण्याची सुद्धा आम्हा मित्रांनी तयारी ठेवली होती. त्यात अर्थात माझाही वाटा होता. अशा पार्श्वभूमीवर सांगलीला जायच्या वाटेवर कानपूरहुन विद्या विहारला छायाला भेटायला म्हणून एक दिवस थांबलो. दुपारी जेवण झाल्यावर छायाचे वडील – अण्णा म्हणाले की माझी मुलगी आणि ही चावी… जा फिरून या…!
आता आठवतंय त्यावेळेला कुर्ल्याच्या एका टेकडीवर आम्ही हातात हात घालून बसलो. होता होता वेळ अशी आली की समोरून कोल्हापूरला जाणारी ट्रेन माझ्या डोळ्यासमोरून निघून गेली. त्यामध्ये बसून मी रवी आणि रंजन यांच्या विवाहासाठी रिझर्वेशन केले होते. मधून मी मला जायला पाहिजे… मला जाऊ दे… असे काकुळतीने म्हणून तातडी दाखवत होतो पण… हातात हात आणि रंगलेल्या गप्पा यामुळे तिने म्हटले, ‘जाऊ द्या ना… एवढं काय मित्राचं लग्न आहे ना… तर होत राहील. आपण पहिल्यांदाच भेटतोय… मला आवडतय तुझ्याशी बोलताना… भेटताना.’
ती ट्रेन का निघून गेली होती.. मी सरळ पुण्यात उतरून दोन तीन दिवसानंतर होणाऱ्या विवाह साठी बाहुल्यावर उभा राहिलो. लग्नही पार पडले. आमची लग्नाची पार्टी पुण्याहून माधवनगरला परत मी परतली. छायाला पाहायला सगळे उत्सुक होते. तर मी रवी आणखीन रंजन यांच्या लग्नाचा आढावा घेण्यासाठी उत्सुक होतो. सांगलीला रिक्षात बसून पळून जाऊन रजिस्टर मॅरेज करून ते आले होते. दोन्ही बाजूचे वातावरण अत्यंत गरम आणि चिडलेले होते. आमच्या मित्रांनी रवीचा वेगळा संसार थाटण्याची सगळी व्यवस्था केली होती पण घरच्यांचा राग शांत करणे महत्त्वाचा मुद्दा होता. त्यात छाया आणि मी आम्ही दोघांनी रंजनाच्या वडिलांची समजूत घालावी असे ठरले. शुक्रवार पेठेत असलेल्या दामल्यांच्या बंगल्यात जायला एका संध्याकाळी दरवाज्यावर टकटक केले.
‘आल्या पावली परत जा. आम्ही घरात सुद्धा घेणार नाहीये तुला. या कट कारस्थानात तू पण सामील आहे. त्याची मला खात्री आहे.’ आजही तो कडाडलेला आवाज आठवतो… थोड्या वेळाने आम्ही चहा पाणी घेतले. आणि सामोसामोपचाराने घ्यावे असे बोलून तोड पाणी करायचा प्रयत्न केला.
त्या दोन्ही कुटुंबात समिट झाला. आता ५० वर्षानंतर त्या दोघांचा संसार फुलला. मित्र रवी अर्बन बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झाला. त्याने आपली चित्रकला जोपासली. उत्साही मुलगा आणि सून यांनी तो सुवर्ण विवाह दिवस साजरा केला आणि माझ्या मित्राला आनंदी पाहून मलाही डोळ्यात अश्रू आले. सुधीर सहस्रबुद्धे हा माझा मित्र देखील असाच मोठा बँकेतील अधिकारी झाला असता परंतु त्याच्या अकाली निधनामुळे तसे झाले नाही. अत्यंत मिश्किल आणि नेहमी नवीन नवीन जोक्स सांगणारा गठ्ठ्या टोपण नावाचा मित्र आठवणीत असतो. असो.
श्रीनगर होऊन एअर फोर्स स्टेशन ठाण्याला बदली झाली. त्यानंतर चिन्मय वर्षभराचा असताना त्याला अण्णा बेहेरेंच्या घरी ठेवून ठेवून आम्ही दादरला नाटक सिनेमे पाहायला जात असू. छाया गेल्यावर सौ. अलकाने त्यांच्या घरात छायाची उणीव जाणवू दिली नाही. आजही जसा वेळ मिळेल तसा आजीला भेटायला विद्याविहार ला जातो.तर कधी आम्ही त्यांना भेटायला आवर्जून जातो.
ठाण्याला गेल्यावर माझे नाटकात भाग घेणे हा एक मोठा आवडीचा विषय होऊन गेला होता. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी दादरमध्ये कीर्ती कॉलेजात कृ. रा. सावंत सर हे नाट्य शिक्षण वर्ग घेत. त्यात मला सहभागी होता आले. ठाणे ते दादर रोजच्या लोकल प्रवासातील घुसमट, ठाण्याहून दादरला जाताना मिड डेच्या ताज्या अंकातील इंग्रजी क्रॉसवर्ड पझल सोडवण्यासाठी पेन्सिल आणि छोटीशी डिक्शनरी हातात घेऊन मी माझे मनोरंजन गर्दीत करत असे.
माझे एक आत्ते भाऊ माधव सोवनी हे ठाण्यात रहात असत. आठवतय की एका गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांनी विविध नाट्य दर्शनाच्या एका प्रयोगात आचार्य अत्रे लिखित लग्नाची बेडी मधील ब्रह्मचारी अवधूत आणि ५ लग्ने केलेल्या यांच्यामधील खटकेबाज संवाद एकपात्रीनाट्य सादर केले होते. ती घटना बऱ्याच काळानंतर मला वेगळी प्रेरणा देऊन गेली. १९८३च्या सुमारास दिल्लीत असताना कॅनॉट प्लेस भागातील महाराष्ट्र भवनातील मराठी लायब्ररीमधून अनेक जुन्या नाटकांची वाचने करून अडीच तासांचा विविध नाट्य दर्शन असा असा कार्यक्रम गणेश उत्सवात वेगवेगळ्या हवाईदलातील स्टेशनमध्ये करायला मिळाला. त्याची सुरुवात ठाण्यानंतरच्या काही पोस्टिंग नंतर झाली. असो.
माझा चुलत भाऊ चंद्रशेखर ओक, त्याच काळात ठाण्यापासून जवळ सँडोज बाग या कोलशेतच्या भागातील हवाईदलाच्या स्टेशनमधे आमच्या घरात राहायला येत असे. कारण त्याच्या नोकरीत काहीना काही कारणाने संप आणि टाळेबंदी घडत असल्यामुळे बरेचदा त्याला आमच्या घरी येऊन रहाणे खूप आनंदाचे वाटे. तो आणि मी मराठी शब्दकोडी सोडवण्याचा नाद लागून प्रत्येक क्लू बद्दल विचार करत ती पटापट सोडवत असू. लोकांनी बनवलेली कोडी आपण सोडवण्यापेक्षा आपणच का बनवू नयेत असे वाटून मी एक सँपल कोडे तयार केले आणि एके दिवशी मरीन ड्राइवरच्या एक्सप्रेस टॉवर मधील लोकप्रभेच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलो. आता नावे आठवत नाहीत परंतु नंतर बरेचसे जे पत्रकार पुढे मोठे झाले ते त्या वेळेला भेटले. माझ्या युनिफॉर्मकडे पाहून व कोडे पाहून ते म्हणाले की अशी कोडी बनवण्यासाठी तुम्हाला वेळ मिळतो? आणि आपण जे कोडे बनवलेले आहे त्यात फक्त उभे आणि आडवे याशिवाय तिरके उलटे असे क्लू देऊन सोडवण्याची मोठी पंचायत करून ठेवली आहे. असे कोडे प्रथमच पाहतोय. शब्दकोडे ही एक कुस्ती असते. त्यात सोडवणारा हा नेहमी जिंकलाच पाहिजे. तुमचे कोडे फारच विचित्र आणि किचकट आहे म्हणून आम्हाला ते घेता येणार नाही. त्यानंतर माझी फरीदाबादला बदली झाली असताना रॅपिडेक्सचे प्रकाशक गुप्ताजींनी पुस्तक महलतर्फे हिंदी भाषेत शब्दकोड्याची दोन पुस्तके १९९४च्या सुमारास प्रकाशित केली होती.
अशा मजा मजा ठाण्यातील सहवासात घडत गेल्या. नंतर माझे कोडी बनवण्याचे वेड वाढत गेले आणि नंतर कोईमतूर मध्ये असताना १९९० सालात तयार केलेली कोडी एका मुंबईच्या भेटीत महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यालयात असलेल्या एका संपादकांना दाखवल्यावर त्यांनी ती कोडी दर शनिवारी प्रकाशित करायचे मान्य केले आणि तशी पुढचे २५ शनिवार ती कोडी येत राहिली. त्याच काळात साप्ताहिक सह्याद्रीमध्ये माझी कोडी जवळजवळ दीड वर्ष येत राहील राहिली. नंतर एकदा अरुण ताम्हणकर तिथले संपादक झाल्यावर माझ्या पहिल्या भेटीत ते म्हणाले. अहो ही असली कोडीबिडी सारखी किरकोळ गोष्ट बनवण्यात वेळ व्यर्थ न घालता काहीतरी हवाई दलाच्या पार्श्वभूमीवरील थरारक घटना लिहीत जा ना. ते लिहून आणा व मी ते ताबडतोब छापलं म्हणूनच समजा. अशी माझी पहिल्या भेटीतच त्यांनी जी कान उघाडणी केली त्यावर मी त्यांना नाडी भविष्यावरील माझा अनुभव बोलून दाखवला. ते म्हणाले, मला हेच लिहून पाठवा मी छापतो.
माझा पहिला लेख त्यांनी छापला. काही कारणांनी त्यांचे आकस्मित निधन झाले आणि पुढील लेख बंद पडले. पण तेव्हा मला माहित नव्हते की तो लेख वाचून मला जवळजवळ २०० पेक्षा जास्त लोकांची पत्रे आली. आणि नंतर मी मराठीत लेख लिहीत राहिलो.नंतर ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले. त्याचा संदर्भ नंतरच्या माझ्या हवाईदलातील तांबरम मधील घटनांच्या साखळीत जास्त मोठ्या प्रमाणात येईल.
१९८० मधे माझ्या वडिलांची तब्येत बिघडलेली आहे ही बातमी मला सांगलीच्या लता उर्फ जयश्री रानडे, बहिणीकडून कळाली. मी पोचलो तोपर्यंत वडिलांना हार्ट अटॅक आल्यामुळे मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. मी आलेले पाहताच ते म्हणाले, आलास का तू पण, मी ठीक आहे. पण काही दिवसातच त्यांचे निधन झाले. त्यावेळेला ते ६६ वर्षाचे होते. अनेक कागदपत्रांची तपासणी करत असताना मला त्यांनी त्यांच्या तरुणपणी पाहिलेले एक भविष्य कथनाचे बाड हातात लागले. त्यात त्यांचा आयुष्यपट वयाच्या ६६ वयापर्यंतचा होता अशी नोंद केलेली होती. माझे वडील स्वर्गीय जनार्दन चिंतामण ओक हे अध्यात्म शास्त्रात ध्यानधारणेच्या मार्गाने जाऊन बऱ्याच वरच्या टप्प्यावर पोहोचले होते. प्रज्ञानानंद सरस्वती या संन्याशी स्वामींकडून त्यांनी घेतली होती. अनेक व्यवसाय करत करत शेवटी त्यांनी माधवनगरला कॉटन मिलच्या आश्रयाने धोती विकण्याचे घाऊक-दुकान उघडले होते. त्या काळात म्हणजे साधारण सन५६ ते ७६ पर्यंत तो व्यवसाय चांगला चालला . परंतु नंतरच्या काळात कामगारांच्या विविध समस्या आणि भारत सरकारचे कॉटन इंडस्ट्री बद्दलचे कायदे बदलल्यामुळे त्या व्यवसायातून ते निवृत्त झाले. आणि मी हवाईदलात गेल्यामुळे तो व्यवसाय त्यांनी नंतर बंद केला.
माझ्या आईने मधल्या काळात सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार असा नावलौकिक मिळवला. गोव्यापासून ते पार मुंबई पर्यंत मंगला ओक हे नाव त्या काळातील स्त्रियांच्या माहितीचे झाले होते. २००९ साली माझी आई सांगली सोडून पुण्यात आमच्याकडे राहायला आली. त्याला कारण झाले एक छोटासा एक्सीडेंट. त्यानंतर ती खराडीच्या बेहेरे वृद्धाश्रमात राहायला असे. त्याच वेळी तिथे तिची धाकटी बहीण म्हणजे माझी बेबी मावशी, माधुरी आठवले ही तिथे होती. त्या दोन्ही एकत्र राहत. मी आईला आग्रह करीत असे की तुझ्या पश्चात सखोल अभ्यास करून रामायण आणि महाभारतावरील प्रवचनामधून हजारो लोकांना मार्गदर्शन केलेस, त्याचा लाभ मी हवाईदलात असल्यामुळे आणि बहीण सुनीता उर्फ नंदा करमरकर विवाहनंतर दूर असल्यामुळे तू तुझ्या आवडीच्या विषयावर बोल ते आपण रेकॉर्ड करू. त्या प्रमाणे आईने महाभारतातील युद्ध झाल्यानंतरच्या शांती पर्वामधील अनेक गोष्टींना गुंफून जवळजवळ २२ तास इतके रेकॉर्डिंग केले आहे. ते रेकॉर्डिंग आता मी आणि बहिणीने एकत्र येऊन दोन ब्लॉगवर सादर केलेले आहे. मातेच्या कलागुणांना यामधून भविष्यकाळातील ज्ञानी लोकांसाठी ते एक भांडार आहे. कै मंगला ओक यांच्या नोट्सच्या आधारे सौ. अंजली फडके आपल्या कीर्तन आणि प्रवचनात वापर करत असतात. २२ ऑगस्ट २०१४ साली माझ्या आईचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. त्याच सुमारास बेबी मावशीचेही निधन झाले. खूप वर्षापूर्वी म्हणजे साधारण १९६१-६२ च्या सुमारास ती आमच्या माधवनगरच्या घरी हवा पालटाला म्हणून आली होती. त्यावेळी तिच्या संदर्भात घडलेल्या चित्रविचित्र घटनांमुळे आमचे घर अस्वस्थ आणि बेचैनीने ढवळून उठले होते. भूतयोनी असते का या विषयावर आधारित अंधारछाया नावाची कादंबरी माझ्या हातून लिहिली गेली. ती सध्या ईबुक रूपात उपलब्ध आहे. त्याचा संदर्भ जनकपुर येथील माझ्या वास्तव्यात येईल.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800