जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील डावरगांवच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत सातवीचा वर्ग सुरू होऊन नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत.
आपल्या गांवात सातवीचा वर्ग पहिल्यांदाच सुरू झाल्याच्या घटनेस पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यावेळच्या सातवीच्या पहिल्या तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात शाळेत सुवर्णमहोत्सव साजरा केला.
शाळेच्या या अर्धशतकपूर्ती सोहळ्यास गांवातील अबालवृद्ध नागरिक, लोकप्रतिनिधी, तिन्ही शाळांचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.
या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्धशतकापूर्वीच्या आपल्या शाळेच्या आठवणींना उजाळा दिला. १९७४ मध्ये या शाळेतून सातवी उत्तीर्ण झालेल्या सर्व पाच शेतकरी कन्या सहकुटुंब या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
यावर्षी सातवीत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे दप्तर आणि शाळेला कपाट व कॉंम्प्युटरचा प्रिंटर भेट देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली. तसेच ५० वर्षानंतर पुन्हा विद्यार्थी बनून वर्गात बसण्याचा आनंदोत्सव साजरा केला.
डावरगांवमध्ये १९७०-७१ पर्यंत फक्त ४ थी पर्यंत एक शिक्षकी शाळा होती. पाचव्या इयत्तेपासून पुढील शिक्षणासाठी गांवापासून पाच किलोमीटर अंतरावरील दाभाडी येथील शाळेत जावे लागायचं. त्यासाठी वयाच्या दहाव्या वर्षी चिखलमातीच्या कच्च्या रस्त्याने दररोज दहा किलोमीटरची पायपीट करणे हा एक सोपा पर्याय होता. त्यावेळी बैलगाडी, सायकल वा दुचाकी व्यतिरिक्त कोणतेही वाहन या रस्त्यावर नसायचे. आणि सायकल किंवा दुचाकी वाहन कोणाही विद्यार्थ्यास परवडणारे नव्हते. मुलींचे शिक्षण या कारणांमुळे पालकांकडून थांबवले जायचे. बरीचशी मुलं देखील चौथीनंतर शिक्षण सोडून द्यायची.
अशा पार्श्वभूमीवर डावरगांव शाळेचे तत्कालीन शिक्षक कै. कचरूसिंग दौलतसिंग परदेशी, पोलिस पाटील कै. विश्वनाथ भिकाजी खरात, श्री बंडूजी पांडूजी खरात आणि सरपंच कै. उत्तमराव भगवंतराव सोनवणे यांनी व ग्रामस्थांनी प्रयत्न करून पहिल्यांदा पाचवीच्या वर्गासाठी जिल्हा परिषद, औरंगाबाद कडून मान्यता मिळवली. पुढील दोन वर्षात सहाव्या आणि सातव्या वर्गासाठी जिल्हा परिषदेने मान्यता दिली. १९७३च्या पावसाळ्यात गांवच्या शाळेत ७ वीचा वर्ग सुरू झाला. सातवीची बोर्डाची वार्षिक परीक्षा गांवापासून तेरा किलोमीटर अंतरावर सोमठाणा येथे पार पडली. या पहिल्या तुकडीत गांवाच्या इतिहासात पहिल्यांदा गांवातील पाच कृषी कन्या सातवीपर्यंत शिकल्या – १९७३-७४ मध्ये.
या स्नेहमेळाव्याची सुरूवात विद्यार्थीनींच्या सुंदर स्वागत गीताने झाली. शाळेचे मुख्याध्यापक कोळी सर यांच्या प्रास्ताविकांनतर सर्व माजी विद्यार्थी, सरपंच, गांवातील ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षक यांना स्मृतीचिन्ह, शाल- श्रीफळ व वृक्षरोपटे देऊन स्वागत करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देतांना सांगितले की पन्नास वर्षापूर्वी गांवात वीज आलेली नव्हती. सगळा अभ्यास चिमणी (रॉकेलचा दिवा) च्या प्रकाशात करावा लागायचा. अभ्यास करताना चुकुन डुलकी लागली तर पुढ्यात ठेवलेल्या चिमणीच्या ज्योतीने डोक्यावरील समोरचे केस जळायचे. मग दुसऱ्या दिवशी असे एखाद्याचे केस जळालेले दिसले की शाळेत सगळेजण त्यावर हसायचे, चिडवायचे. जमिनीवर बसून अभ्यास करावा लागायचा. रात्री घरात, ओसरीत अंधारात गोम, इंगळी, विंचू, साप व किड्यांची भिती असायची. त्यावेळी गांवच्या चावडीत शाळेचे वर्ग भरायचे. दर शनिवारी शाळेतील मुले शेण गोळा करून आणायचे, विहिरीतून पाणी आणायचे आणि मुली शेणाने शाळा सारवायच्या. दररोज आळीपाळीने विद्यार्थी झाडूने शाळा स्वच्छ करायचे; अशा अनेक आठवणींनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. आणखी पन्नास वर्षानंतर जेव्हा तुम्ही शाळेचा शतक महोत्सव साजरा कराल त्या कार्यक्रमालाही आम्ही नक्की येऊत, पण कावळे बनून ! तुम्ही स्टेजवर असाल, आम्ही येथील झाडांवर बसून तो कार्यक्रम बघूत; आम्हाला तेव्हा बसण्यासाठी तुम्ही आतापासूनच झाडे लावा असे भावनिक आवाहन शाळेच्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांनी केले.
मुख्याध्यापक कोळी सर, लाड सर, पवार सर, सौ. पठाडे मॅडम, तांबे सर, धाईडे सर, सुलाने सर, थोरात सर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. काशिनाथ खरात सर, भुजंग सर, बंडूजी खरात, प्रभाकर तांबे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. भुजंग सर, के. बी. खरात सर, डॉ. कारभारी खरात, मुकुंद खरात, सय्यद याकूब, पदमाबाई जाधव, गोपिनाथ खरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी मुकुंद खरात, उमेश खरात, कमलाकर खरात, अॕड. विलास खरात, भीमराव तांबे, रावसाहेब खरात, बाबासाहेब अनासरे, रंगनाथ खरात, माधव तांबे, सुलाने सर, गोपीनाथ खरात, सदाशिव खरात, देवराव खरात, कृष्णा खरात, रमेश खरात, संजीव खरात, ज्ञानेश्वर माऊली, माणिकराव, फुळमाळी, बहुरे, पंढरीनाथ खरात यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. सुरूची सहभोजनाने या सुवर्णमहोत्सवी मेळाव्याची सांगता करण्यात आली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
खूप छान मनाल भिडले या समारंभाचे वर्णन. त्यावेळी खेड्यातील दहा वर्षेच्या मूलांमुलींना शिक्षणासाठी किती संघर्ष करावा लागत होता याची माहिती वाचून शहारे आले. त्या सर्वांचे अभिनंदन 🙏व शुभेच्छा
Tq रवींद्र जी