नमस्कार 🙏 “ओठावरलं गाणं” या सदरात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत ! रेडिओ म्हणजे मराठी श्रोत्यांना पर्वणी ! मग त्या प्रादेशिक बातम्या किंवा क्रिकेट कॉमेंट्री असू दे नाहीतर गाणी असू दे…. विविध रेडिओ ॲप मुळे मराठी गाणी कधीही, कुठेही ऐकता येतात….आता त्यासाठी पूर्वीसारखं रेडिओला कान लावून बसावं लागत नाही.
आज आपण पहाणार आहोत कवयित्री संजीवनी मराठे यांनी लिहिलेलं एक भक्तीगीत ज्याचे शब्द आहेत –
आळविते मी तुला, विठ्ठला, आळविते मी तुला
देहमनाला व्यापूनी उरला, तव चरणांचा लळा
परमेश्वराच्या चिंतनात आयुष्यातला जेव्हढा म्हणून वेळ जाईल तेव्हढा राग, लोभ, मोह, मत्सर या रीपूंचा त्रास कमी होतो. नामस्मरण, जपजाप्य, प्रार्थना, श्लोक, अभंग अशा निरनिराळ्या पध्दतीने मी तुला साकडं घालत असते. संत तुकाराम, एकनाथ, नामदेव, जनाबाई हे सर्व मला तुझ्या जवळ येण्याचा मार्ग दाखवतात. भजन म्हणताना तसंच कीर्तन, प्रवचन ऐकताना देखील हल्ली मला घरची आठवण येत नाही. नामस्मरण करता करता देखील नामदेवांचा हट्ट पुरवण्यासाठी तू सगुण रूपात दर्शन दिलंस हे आठवून मी सुद्धा तासनतास तुझ्या चरणांपाशी बसून रहाते, इतका मलाही आता तुझा लळा लागला आहे.
रोज पहाटे नयनांपुढती
तुझीच हसरी शामल मूर्ती
मनभावांच्या निर्मळ ज्योती घेते आरतीला
पहाटेच्या शांत वेळी घरातले सर्व जण झोपलेले असतात तेंव्हा मी शुचिर्भूत होऊन तुझ्या मंदिरात येते त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर तुझीच मूर्ती असते. तुझी प्रसन्न मूर्ती नेहमी जशी गाभाऱ्यात असते तशीच मला दिसते. पण कधीकधी मात्र मला विभ्रम होतात आणि कमरेवर हात ठेवून उभ्या तुझ्या मूर्तीच्या जागी मुरलीधराची मूर्ती दिसते तर कधी लोणी चोरून लोणी खाणारा नटखट कृष्ण कन्हैया दिसतो. कधी तुला पाहून माझ्या ओठावर “सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले” हे गाणं येतं तर कधी “जय जय विठ्ठल रखुमाई” हा अभंग गावासा वाटतो. शेवटी कसाही असलास तरी तू माझा तारणहार आहेस हे लक्षात घेऊन मनातील निर्मळ भावांच्या ज्योतींच्या निरांजन घेऊनच मी तुझी आरती करते.
उपासनेची उटी लावते
शुभनामाची माळ गुंफिते
निर्मोहाचा रेखून घेते तिलक तुझ्या भाला
तुला सांगू का, तुझी मानसपूजा करताना मला गंध, चंदन, उदबत्ती, निरांजन हे काहीही लागत नाही. मी मनापासून तुझी उपासना करत असते. मग त्याच उपासनेची उटी मी तुला लावते. विठ्ठलाच्या नामाइतकं श्रेष्ठ या दुनियेत काही नाही. “विठ्ठला रे तुझे नामी रंगले मी” असं कुणीतरी म्हंटलंच आहे ना. मग त्याच शुभनामाची माळ मी तुझ्या गळ्यात घालून आणि निर्मोहाचा तिलक तुझ्या कपाळी लावून माझी मानसपूजा पूर्ण करते.
प्रेमघना रे, कधी तू येशिल
मम जीवनवन फुलवून जाशील
रात्रंदिन मी हा मधुमंगल ध्यास मनी धरीला
भगवंता, तुझ्या कृपाशिर्वादाने या मायामोहाच्या भवसागरातून माझी बऱ्यापैकी सुटका झाली आहे. कधीतरी माझं मन बंड करून उठतं, नाही असं नाही. म्हणूनच मला आता ओढ लागली आहे ती तुझ्या सगुण रूपातील दर्शनाची. मी काही नामदेव आणि तुकाराम नाही पण स्वप्नात जरी तू मला दर्शन दिलंस ना तरीही तुला भेटल्याचं समाधान मला मिळेल आणि मी कृतकृत्य होईन, कृतार्थ होईन. तुझं दर्शन झालं म्हणजे माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं होईल आणि म्हणूनच रात्रंदिवस फक्त तुझ्या सगुण रूपातील दर्शनाचा ध्यास या मनाने घेतला आहे, नव्हे आता तोच माझ्यासाठी खरा आनंद आहे.
माणिक वर्मा यांच्या गोड आवाजातील या भक्तीगीताला संगीतकार प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलं असून पूर्वी आकाशवाणीच्या मुंबई ब केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मंगलप्रभात कार्यक्रमात हे गाणं बरेच वेळा लागत असे.

– लेखन : विकास मधुसूदन भावे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.
आळविते मी तुला विठ्ठला..
भावे सर,हे गाणे मी प्रत्यक्ष कधी ऐकलेले आठवत नाही.पण तुम्ही रसग्रहण करून त्याची ओळख करून दिलीत.अशी भावपूर्ण गाणी पुढील काळात लिहिली जातील का सांगता येत नाही.मात्र तुम्ही आमच्यासाठी गाण्यांवर लिहून आम्हाला त्या गाण्यांचा स्वाद देताय हे खूप चांगले काम करताय.
धन्यवाद मेघनाताई 🙏
संगीतकार प्रभाकर जोग यांनी संगीत दिलेले संजीवनी मराठे यांचे हे गीत व माणिक वर्मा यांनी त्यांच्या सुरेल आवाजात गायलेल्या गाण्याची निवड करुन आपण आम्हाला जुन्या जमान्यात घेऊन गेलात. गाणं व आपण केलेले रसग्रहण दोन्ही उत्तम.
धन्यवाद विवेकजी 🙏