आज बैलपोळा हा सण आहे. या सणाचे महत्त्व सांगणारा हा विशेष लेख…
– संपादक
बैलपोळा हा शेतकऱ्यांची अहोरात्र सेवा करणार्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे. महाराष्ट्रभर हा सण अत्यंत श्रध्देने साजरा होतो.
व्रत वैकल्पांचा श्रावण मास संपत आलेला असतो. शेवटल्या दिवशी अमावस्येला कोकणात पिठोरीचे आगमन धुमधडाक्यात होते. तिची समस्त माता, भगिनींकडून मनोभावे पूजा अर्चना केली जाते. हा दिवस मातृदिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. काही दिवसा नंतर येणाऱ्या लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारी उत्साहात सुरू झालेली असते. हे दिवस भारावलेले असतात. मुंबईत किंवा अन्यत्र वास्तव्य करणारे आबालवृद्ध, आहेत तरुण वर्ग आपआपल्या परीने या गौरी गणपतीच्या सणासाठी आपल्या गावी जाण्याचा आटापीटा करून पोहचत असतात.
याच दरम्यान खान्देशात, ज्या मध्ये धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक या जिल्ह्य़ाचा समावेश होतो. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात बैलपोळा हा कृषिप्रधान संस्कृतीचे दर्शन घडविणारा सण आपला बळीराजा कृतज्ञतापूर्वक उत्साहाने, आनंदाने साजरा करीत असतो.
त्या शेतकरी बांधवांची आपल्या गोठ्यातील बैलांना पशु न समजता आपल्याच घरातील घटक समजून कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत जगात कोठेही आढळून येत नाही
वर्षभर आपल्या धन्याच्या इच्छेनुसार काम करणार्या मग ते गाडी ओढण्याचे असो अथवा काळ्या आईच्या नांगरणीचे काम असो कि मोटेवरील पाणी खेचून तप्त बागमळ्यातील भाजीपाळ्यास तृप्त करायचे असो ते इमाने इतबारे थंडी, पाऊस, वारा, गर्मी काहीही असो ती शेतकऱ्यांची सर्जा आणि राजाची जोडी सेवेत सदैव तत्पर असते.
त्यांना शेतकऱ्यांचा नजरेचा इशारा समजतो. त्यांच्या पाठीवरून थोपटलेल्या भावना आणि प्रेमाने मारलेल्या थापेतील प्रेमभावना तंतोतंत कळतात. इतकेच काय त्यांच्याजवळ रेंगाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या लेकरांना चुकूनही धक्का लागू देत नाहीत. फक्त त्यांना बोलता येत नाही पण त्यावाचून काहीच अडचण येत नाही. इतकी समरसता क्वचितच दिसते.
या बैलपोळाच्या दिवशी त्यांना सचैल पाण्यानी न्हावू घातले जाते. खास त्यांच्यासाठी आणलेल्या झुली घातल्यावर शिंगांची सजावट गोंडे घालून, रंग लावून आणि गळ्यात घुगंराच्या माळा घालून त्यांना प्रेक्षणीय करण्यात येते. आपल्या दारात उभे करून त्यांची विधीवत पूजाअर्चा करून शेतकरी नतमस्तक होऊन त्यांच्यावरील कृतज्ञता व्यक्त करतो.
त्यांना पुरणपोळी प्रेमाने भरवितो. काही ठिकाणी या सर्जा, राजाच्या जोडीची मिरवणूक काढण्यात येते. काही ठिकाणी घरोघरी नेण्यात येते. खऱ्या अर्थाने तो दिवस या वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा, राजाचा असतो.
आता शहरात राहणारे बैलजोडीच्या मूर्ती आणून तितक्याच श्रध्देने उत्साहात हा बैलपोळ्याचा सण भक्तिभावाने साजरा करून कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होतात.
अशी आहे आपल्या कृषिप्रधान देशाची मुक्या जीवांना केवळ पशुपक्षी न समजता आपल्या घरातील सदस्य समजून त्यांच्यावर अलोट प्रेम करणारी भारतीय संस्कृती. मला त्याचा सार्थ अभिमान आहे.
— लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर.
निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
बैलपोळा हा सण पुरण पोळी व बैलजोडी सोबत धन्याची पुजा करण्याची प्रथा चारपाच जिल्ह्यात आहे ह्या सणाचे वैशिष्ट्य पुर्ण लेखन डॉ. भास्कर धाटावकर सरांनी उतम केले आहे.
धन्यवाद सर