“ग्रँड कॅन्यन.”
असं म्हणतात की तुम्ही अगदी जाज्वल्यपणे एखादं स्वप्न बाळगलं असेल तर कधीतरी ते प्रत्यक्षात साकार होतंच.
अॅरीझोना स्टेट अमेरिका येथील ग्रँड कॅन्यन कधीतरी पहायला मिळावंं हे माझं अगदी शाळेत असतानापासूनचे स्वप्न होते.आणि ते अगदी अलीकडेच म्हणजे २०२२ साली माझी अमेरिकास्थित लेक ज्योतिका हिच्यामुळे प्रत्यक्षात अवतरले.
आतापर्यंतच्या भ्रमंतीतली ही वेगळाच अनुभव देणारी, निसर्गाचा निराळाच अविष्कार दाखवणारी अविस्मरणीय सफर होती. माझी नात सायरा, ज्योतिका, मी आणि विलास अटलांटाहून अमेरिकन एक्सप्रेसच्या विमानाने अॅरिझोना स्टेट मध्ये फ्लॅगस्टाफ या गावात आलो.आमच्या प्रवासात डॅलसला चार तासाचा हाॅल्ट होता.
ग्रँड कॅन्यनला जाण्यासाठीचे हे पर्यटन स्थळ आहे.इथल्या स्थानिक वेळेनुसार आम्ही रात्री साडे नऊला पोहचलो. ज्योतिकाने कार रेन्ट केली. सुंदर, मोठी ऐसपैस कार.
डलासला आम्ही डिनर घेतलेच होते. एग रोल्स, फ्राईड राईस, चिकन नुडल्स वगैरे.
फ्लॅगस्टाफला हाॅलीडे इन मध्ये बुकींग होतेच. छान आरामदायी हॉटेल. लगेच झोपेच्या अधीनच झालो. प्रवासाने थकवा आलाच होता. अटलांटा आणि अॅरीझोनाच्या वेळेत तीन तासाचा फरक आहे.
दुसर्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. ज्योतिकाने दिवसभराची भटकंती योग्य पद्धतीने आखलेली होतीच.
ब्रेकफास्ट घेउन आम्ही लगेच निघालो. ज्युस,दही सीरीअल्स, ऑम्लेट वगैरे अमेरिकन ब्रेकफास्ट होता.
आजचे ध्येय होते हॉर्स शू बेन्ड हिल्स.. ड्राईव्ह अतिशय सुंदर होता. अॅरीझोना म्हणजे जगातील सर्वांत मोठे वाळवंट. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेला विस्तीर्ण ओसाड प्रदेश. मध्येमध्ये दिसणारी खुरटी पण हिरवट झुडुपे.गडद पिवळ्या रंगाची रानफुले.लालसर रंगाचे गवत.लांबच लांब पसरलेले पर्वत. अगदी निरभ्र निळे अथांग आकाश.निसर्गाचं एक अत्यंत निराळं पण देखणं रुप पाहून विस्मयीत झालो. भारतातले कच्छचे रणही आठवले. वाटेत अनेक नैसर्गिक सँड ड्युन्स दिसले. अगदी रचून ठेवलेल्या वाळूच्या ढिगार्यासारखे दिसत होते.आता आम्ही संपूर्ण डोंगरांच्या विळख्यातच होतो जणू जिथे पहाल तिथे हे लाल रंगांचे दगडी कॅन्यन.या डोंगरांमध्ये निसर्गानेच अनंत आकाराची शिल्पेच बनवली आहेत जणू! इतकी रेखीव आणि आकृतीबंध!बघणार्याच्या नजरेने त्या शिल्पांना कुठलीही नावे द्यावीत. महाल, मंदीरे, कळस, मखर, गाभारे नृत्यांगना, राजे, प्राणी,काहीही.अतिशय रेखीव आणि कोरीव आणि हे सारंं नैसर्गिक. मानवनिर्मीत शिल्पकला आतापर्यंत ठिकठिकाणी पाहिल्या. पण इथे एकमेव शिल्पकार, केवळ निसर्ग. आम्ही रस्त्यात थांबत, फोटो काढत या निसर्गाच्या अप्रूपतेच्या आठवणी साठवत होतो.
हाॅर्स शू बेन्ड हाही एक नैसर्गिक चमत्कारच आहे. एका उंच डोंगराभोवती घोड्याच्या नालेसारखी कोलॅरॅडो नदी वळसा घेत वाहते. आम्ही व्ह्यु पॉईंट वरुन हे मनोहर दृष्य डोळ्यात साचवले.हिरवीगार संथ नदी. जणू इतस्तत:विखुरलेल्या डोंगरांची सखीच.
व्ह्यु पाॅइंटपर्यंत बरेच चालावे लागले होते. रणरणतं उनही होतं. मात्र हवेत सुखद गारवा होता.वार्याच्या झुळकी आनंददायी होत्या. प्रदूषणरहित वातावरण आणि डोक्यावरचे नितांत निळे आकाश. त्यामुळे उन्हातले चालणे सुद्धा अजिबात कष्टदायी नव्हते.
मी सहज म्हटलं, भारतात अशा ठिकाणी खाद्य पेयांच्या टपर्या असतात. इथे तसे काहीच नाही. माझी नात लगेच म्हणाली”, here they dont want to ruin the nature–” किती खरे आहे हे !! इथे फक्त निसर्गाच्या सहवासात रहा. आनंद जपा, आनंद वेचा.
ग्रँड कॅन्यन रेलरोडटुर तर्फे केलेला आमच्या प्रवासाचा पुढचा टप्पाही एक वेगळाच अनुभव देणारा होता. सकाळी आठ वाजता आमच्या हाॅटेलवर ट्रॅव्हल्सची व्हॅन घ्यायला आली.व्हॅन एकदम आरामदायी होती. आम्ही दहा प्रवासी होतो. निरनिराळ्या देशातील लोक होते ते. आमचा ड्रायव्हर एकदम हसतमुख आणि भरपूर बोलका होता. संपूर्ण प्रवासात तो अनेक किस्से, भौगोलिक माहिती आम्हाला पुरवत होता.
गेट टू ग्रँड कॅन्यन या रेल्वेस्टेशनवर आम्ही एका ट्रेनमध्ये बसलो. हा ट्रेनचा प्रवास अतिशय सुंदर होता.गाडीत सर्व सुखसोयी आणि स्वच्छता होती. मधून मधून प्रवाश्यांची खबरबात घेणारा मदतनीसही होता. तो अॅरीझोना स्टेटचा इतिहासही सांगायचा.फोटोग्राफर होती. गिटारवादक होता. त्याने सुरेल संगीताने प्रवाशांचे मनोरंजन केले.पाईन ट्रीच्या जंगलातला हा आगगाडीचा संथ प्रवास अगदी अविस्मरणीय होता.
आम्ही ग्रँड कॅन्यन स्टेशनला पोहचलो. दोन तासाचा हा आगगाडीचा प्रवास कसा संपला ते कळलेच नाही.
इथे आमची व्हॅन व ड्रायव्हर हजरच होते. प्रथम लंच घेतले आणि नंतर प्रत्यक्ष ग्रॅड कॅन्यन ची सफर सुरु झाली. अतिशय सुंदर, रेखीव आखीव गाव. इथे रहाण्यासाठी बैठे बंगले असतात. पण त्यासाठी तीन वर्षे आधी बुकींग करावे लागते.

पहिल्या व्ह्यु पाॅईंटला आम्ही उतरलो आणि निसर्गाच्या त्या विस्तीर्ण,भव्यतेच्या दर्शनाने नि:शब्द झालो. अमेरिकेतल्या सात आश्चर्यांपैकी ग्रँड कॅन्यन हे एक नैसर्गिक भूगर्भीय आश्चर्य!कॅन्यन म्हणजे दरी, खिंड.आणि या दरीतली पर्वतासमान भासणारी अनेक आकारांची नैसर्गिक शिल्पे.
कोलोरॅडो नदीचा प्रवाह इथे पहायला मिळतो. जमीनीतून वर झेपावणारे असंख्य खडक या नदीच्या पाण्याच्या दाबाने कातरत गेले.शिवाय वाराही या खडकांना सतत कापत असतो आणि त्यातून ही असंख्य शिल्पे तयार झाली आहेत. आणि मैलौन् मैल ती पसरलेली आहेत. बघणार्याच्या नजरेला जो दिसेल तो आकार. इथे राजवाडे,मंदीर दालने,गड किल्ले ,गाभारे ,माणसे प्राणी पक्षी अगदी गणपती, नंदीबैल, गरूड पक्ष्यांसारखे आकार इथे पहायला मिळतात. एक अॉस्ट्रेलिअन माझ्या जवळ आला, आणि म्हणाला,”see over there,an indian temple of God Mahadeo” क्षणभर मलाही ते तसेच वाटले. आणि जगभरात भारतीयांचं इशप्रेम किती प्रसिद्ध आहे हे जाणवले. निसर्ग हाच किमयागार. आम्ही इथे डक अॉन द राॅक या पाॅइंटवर उतरलो.अक्षरश: एक धारधार चोचीचं बदक पंख आत गोळा करुन एका प्रचंड दगडावर बसलंय् आसाच भास होतो.
१९५० साली आयसेन हॉवरने या ठिकाणी भेट दिली होती.
त्यावेळी ते एक सामान्य नागरिक होते. त्यानंतर ते अमेरिकेचे प्रेसीडेंट बनले. अर्थात हे सर्व आकार वारा वादळ पाण्यांनी बदलू शकतात.शंभर वर्षानंतर इथे कदाचित हे आकार नसतील. ते बदललेले असतील.
ब्रह्मानंदी टाळी लागणे म्हणजे काय याचा अनुभवच इथे जणू घेता आला.एक घारीसारखा पक्षी आकाशात विहरत होता. क्षणभर मला वाटले यांच्या पंखावर बसावे आणि या भव्य दरीतली ही निसर्गाची किमया न्याहळावी. स्वर्ग म्हणजे आणखी वेगळे काय असेल ?
थोडे पुढे गेल्यावर वॉच टाॅवर पॉईंटला कोलोरॅडो नदीचा प्रवाह पहायला मिळाला. याठिकाणी मात्र तिचा प्रवाह मलीन वाटला.
नोव्होवा नावाची एक इंडीअन जमात इथे आहे. त्यांनी त्यांचं हेरीटेज जपलेलं आहे. बदलत्या जगाचा भाग त्यांना व्हायचे नाही. अॅरीझोनाचा काही भाग हा त्यांचं स्वतंत्र राष्ट्र म्हणून मानला जातो. तिथे अमेरिकन फेडरल रुल नसून नोहोव्हा जमातीचे रुल्स आहेत. त्यांचा अध्यक्षही निराळा आहे. आम्ही ग्रँड कॅन्यनहून परतताना नोवोव्हा रीझोल्युशनला भेट दिली. तिथे मास्क घालणे सक्तीचे होते. त्यांचे आर्ट आणि क्राफ्ट चे दुकान सुंदर होते. तिथे त्यांची जीवनपद्धती दाखविणार्या कलाकृती पहायला मिळाल्या.
त्यांच्या जीवनाचे एकच ध्येय या पृथ्वीचे रक्षण. निसर्गाला मूळ स्वरुपातच सांभाळणे. मनात आले, खरोखरच आज काळाची ही गरज आहे…
याच सफरीतले आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण म्हणजे. lower Antelope canyon. आम्ही अँन्टीलोप कॅन्यन व्हीजीटींग सेंटरपर्यंत फ्लॅगस्टाफहून कारने आलो. जवळ जवळ अडीच तासाचा ड्राईव्ह होता. ही जागा नोवाहा कम्युनिटीच्या राज्यात येते.
इथूनच प्रत्यक्ष टूरला सुरवात होते. ज्योतिकाने आधीच टुर बुक केली होती. सेंटरवर तिने तिचे बुकींग दाखवले. आमचे तिघांचे बुकींग होते. मात्र जी सेंटरवरची मदतनीस होती ती म्हणाली,। इथे दोघांचच बुकींग दिसतय्”. सायराचे नावच नव्हते. ज्योतिकाला इंटरनेट मिळत नव्हते. त्यामुळे तिला कंपनीशी संपर्क साधता येत नव्हता. शेवटी तिने सायराचे तिथल्या काउंटरवरच परत तिकीट काढले. आॅनलाईनपेक्षा इथले तिकीट थोडे कमीही होते. टेक्नोलाॉजीचे जसे फायदे तसे तोटेही…असो!
साधारण एक तासाची ही भूगर्भीय सफर होती.आम्हाला दुपारी सव्वा बाराची वेळ मिळाली. इथेही वेळेत एक तासाचा फरक आहे. एक तासाने हा परिसर मागे आहे.
आम्ही तिथल्या गिफ्ट शॉपमध्ये काही खरेदी करण्यात वेळ घालवला. ही सफर अवघड,साहसी असणार याची कल्पना होतीच.संपूर्ण पायी सफर होती. आमच्याबरोबर टुर गाईड होता.आम्हाला सफरपूर्वी अनेक सूचना दिल्या गेल्या. कुठल्याही सॅक्स,काठी कॅमेरा बरोबर नेता येणार नव्हत्या.मोबाईलला परवानगी होती. आमचा दहा बारा जणांचा गृप होता. काही वृद्ध ही होते.अमेरिकन,जपानी चायनीज सारेच होते. मी सर्वात ज्येष्ठ असेन. पण ही सारी मंडळी अतिशय सहकार्य देणारी होती.सर्वांच्या मनांत एकच स्वप्न होतं,या जमीनीच्या पोटात दडलंय् तरी काय? हे बघण्याचं..अक्षरश: आम्ही धरतीच्या उदरात चाललो होतो. अतिशय सरळ अशा शिड्या होत्या.सांभाळून उतरावे लागत होते.
असे सहा टप्पे आम्ही उतरलो. सातवा फारच कठिण होता. भूमिकन्या सीतेची मला आठवण झाली. धरतीने तिला जसे कुशीत घेतले तसे ती आम्हालाही घेत होती.
आता आम्ही प्रत्यक्ष कॅन्यनजवळ पोहचलो. आणि जे नजरेला दिसलं ते या दोन डोळ्यात मावणारं नव्हतंच! अरुंद, चढउताराची, वालुकामय अशी पायवाट तुडवत आम्ही त्या भूगर्भातल्या खिंडीत चालत होतो.कुंभाराने बनवलेल्या मडक्यासारखं ते अनंत आकार घेउन पसरलेलं होतं. धरतीच्या वर एका बाजूला या कॅन्यनचं उघडं द्वार होतं. तितपर्यंत आम्हाला जायचं होतं. बाहेर येण्याचा रस्ता फक्त तोच होता. आता no come back.चालायचे वळसे घेत, बघत बघत. वरुन सूर्यकिरण पाझरत होते. छाया प्रकाशाचा अत्यंत मनोरम खेळ आम्ही पहात होतो. त्या दगडांमध्ये शार्क, ईमो, सी हाॅर्सचे आकार दिसत होते. एक लेडी विथ द विंड नावाचंही शिल्प तयार झालं होतं.तिचा चेहरा आणि तिचे उडणारे केस .हे सगळं आमच्या नजरेसमोर आमचा टूर गाईड आणण्यास मदत करत होता. आणि मग “अय्या! खरंच” “ओह माय गॉड” सारखे ऊद्गार उत्स्फूर्तपणे बाहेर पडत होते. ज्या वाटेने आम्ही चाललो होतो त्या वाटेवरुन पावसाळ्यात पाण्याचा प्रचंड लोट वाहतो. सगळी वाळू वाहून जाते.तेव्हां ही सफर बंद ठेवावी लागते. इथे मन्सुन एप्रील ते जुनपर्यंत असतो आणि तसंही पावसाचा नेम नसतोच. आमचे भाग्य म्हणून आम्हाला हे पहायला मिळाले. आतमध्ये चालत असताना मधून मधून आम्हाला वाळुतला ओलसरपणा जाणवतही होता.
जवळ जवळ एक दीड तासाने आम्ही धरतीच्या उदरातून बाहेर आलो. सूर्यप्रकाशात आलो. आता आम्ही जमिनीवर होतो.डोक्यावर रणरणतं ऊन होतं. पण हवेत सुखद गारवा होता.जे पाहिलं,अनुभवलंं ते वर्णनातीत होतं. निसर्गासमोर माणूस म्हणून जगताना मी फक्त एक कण आहे असेच वाटले. मनोमन त्या किमयागाराला मनापासून वंदन केले.
आज आमच्या ग्रँड कॅन्यन टूरचा शेवटचा टप्पा होता. आज आमाही सेडोना या जवळच्याच नगरीला भेट द्यायचे ठरवले.फ्लॅगस्टाफ ते सेडोना हा एकतासाचा ड्राईव्ह आहे. म्हणजे साधारण आमच्या हाॅटेलपासून वीस मैलाचा प्रवास. अॅरीझोना स्टेट म्हणजे जगातले एक नंबरचे वाळवंट.रुक्ष,रेताड, रखरखीत. मात्र सेडोना हे येथील अतिशय नयनरम्य, निसर्गरम्य असे हिल स्टेशन आहे.ड्राईव्ह अतिशय रमणीय होता. घाटातला ,वळणा वळणाचा रस्ता. दुतर्फा उंच सुचीपर्णी (पाईन)चे उंच वृक्ष आणि पलीकडे अजस्त्र कॅन्यन. अॅरीझोना म्हणजे पर्वतीय,भूगर्भीय आश्चर्यच. आतापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात आम्ही पर्वत राशीवर वारा, पाणी आणि खचणार्या मातीमुळे तयार झालेली ही विविध नैसर्गिक आकारांची
लाल, पांढरी, कधी पिवळी अशी असंख्य शिल्पे पाहिली आणि प्रत्येक वेळी मंत्रमुग्ध झालो. आजच्या प्रवासातही आम्ही अनेक वेळा न राहवून थांबलो. फोटो काढले.आणि निसर्गोत्सवाचा आनंद ऊपभोगला. इथेच आम्ही नवरात्री देवीची असंख्य रुपेच पाहिली जणू…
सेडोना येथील अमिताभा स्तुप आणि शांती वनाला आम्ही भेट दिली.जवळ जवळ १४एकर मध्ये वसलेलं आणि उंच उंच लाल खडकांनी वेढलेलं थंडर माउन्टनच्या पायथ्याशी असलेलं. मनाला अगाध शांती देणारं हे स्थान आहे. जेट्सुमा या न्यूयाॅर्कर लामाने ही जागा स्तुपासाठी निवडली. तिबेटीयन पद्धतीचा हा स्तुप आहे. इथे सर्वधर्मीय लोक ध्यान धारणा आणि प्रार्थने साठी येतात.नतमस्तक होतात.अखंड महागनी लाकडात कोरलेली बुद्धाची मूर्ती इथे एका खडकावर स्थित आहे.ही मूर्ती इंडोनेशियाहून या स्तुपास भेट म्हणून दिली गेली आहे.आणि जवळ जवळ ३६ फूट उंच अशी ही सुंदर मूर्ती आहे.
त्या ठिकाणी पोहचल्यावर खरोखरच माणूस हळुहळु तणावमुक्त होतो. तिथल्या वातावरणात अशी काही उर्जा आहे की सार्या चिंता,विकार झाडावरच्या पानाप्रमाणे गळून पडतात. इश्वर एक आहे, चराचरात त्याचं वास्तव्य आहे हे जाणवतं. माझ्या मनाने जो गारवा इथे अनुभवला तो शब्दातीत आहे. खरोखरच इथे मला तो भेटला.त्याच्या चरणी मी लीन झाले.अद्वैताचीच अनुभूती मला मिळाली…
सेडोना येथील चॅपल आॉफ होली क्राॉसला आम्ही भेट दिली. हे दुसरं भक्तीमय वातावरणाचं स्थान.अत्यंत शिस्तबद्ध आणि शांत.हे चॅपल कोकोनिनो नॅशनल फाॅरेस्ट लँडवर ,उंच अशा टेकडीवर अतिशय सुबक पद्धतीने बांधलेले आहे.हे बांधण्यास केवळ अठरा महिने लागले. १९५६ साली या चॅपलचे बांधकाम पूर्ण झाले. जवळजवळ ३००, ३०० युएस डाॅलर्स या बांधकामासाठी लागले.उंच गाभार्यात धातुची येशुची क्रुसावरची मूर्ती आहे.
भिंतींवर ,येशूला ज्या खिळ्यांनी क्रुसावर ठोकले त्यांची प्रतिकात्मक म्युरल्स आहेत. शांत मेणबत्यांच्या प्रकाशात त्या मूर्तीकडे पाहताना नकळतच आपल्या कानात शब्द ओतले जातात,” हे!प्रभु!यांना क्षमा कर.कारण त्यांना कळत नाही ते काय करत आहेत..!” मन अंतर्मुख होते. समोरच्या ऊंच लाल खडकात हातात लहानग्या येशुला घेतलेली मदर मेरी दिसते. प्रार्थनेसाठी उंचावलेले भक्तीमय करांचे दर्शन होते…
सारेच अलौकिक. कल्पनेच्या पलीकडचं. सूक्ष्मतेतून
विशालतेकडे नेणारं.. द्वैतातून अद्वैताकडे जाणारं..
परमात्म्याची वाट दाखवणारं.
सेडोना मधल्या लाकीपाकी या आर्ट्स आणि क्राफ्ट विलेजला आम्ही भेट दिली. हे एक कलाकार आणि त्यांची कलाकारी प्रस्तुत करणारं, ओक क्रीकच्या किनारी वसलेलं असं देखणं गाव. सुंदर पायवाटा, कारंजी,विवीध रंगांची फुलझाडे,कलात्मक रितीने रंगवलेल्या भिंती पाहताना खूपच मजा वाटत होती. इथे पन्नास पेक्षा अधिक दुकाने आहेत. विविध कलात्मक वस्तुंचे सुंदर प्रदर्शनच म्हणा ना. अनेक क्युझीनची रेस्टारंट्स इथे आहेत. आम्ही एका मेक्सीकन रेस्टाॅरंट मध्ये दुपारचे जेवण घेतले…किती पाहशील तू.. किती घेशील तू अशीच आमची स्थिती झाली. पाय दुखत होते. मन भरत नव्हतं. खिसाही रिकामा होत होता. अखेर नाईलाजानेच बाहेर पडलो त्या सौंदर्य नगरीतून..
आमच्या या ग्रँड कॅन्यन सफरीतला अत्यंत आकर्षक आणि एक्सायटींग कार्यक्रम म्हणजे फ्लॅगस्टाफ शहरातील वेधशाळेची भेट. फ्लॅगस्टाफ हे खगोल शास्त्रज्ञांचे प्राचीन संशोधन पीठ आहे. १८९४ मध्येही लाॅवेल वेधशाळा स्थापित झाली. १९१२ साली ब्रह्मांडात होणारे बदल आणि विस्तार यांचा विस्तृत अभ्यास संशोधकांनी या वेधशाळेत केला. १९३० साली इथे प्लुटो या ग्रहाचा शोध लागला.
सूर्यमाला,ग्रह तारे, आकाशगंगा, आणि अंतराळ या विषयीचे संशोधन इथे सातत्याने होत असते.तीन ते चार मीटर उंच असलेले LDT आणि DCT हे जगातील अत्यंत कार्यक्षम असे टेलीस्कोप इथे आहेत.
जगातील सर्व खगोलप्रेमी लोक इथे भेट देउन ग्रहतार्यांच्या राज्यातला आनंद भोगतात. आज आम्हीही त्यापैकी एक
होतो हे अहोभाग्यम्.!! लहानपणी माझे वडील आम्हाला पहाटे किंवा रात्री खुल्या मैदानावर केवळ तारे पहायला घेऊन जात.आज जगप्रसिद्ध टेलीस्कोपमधून हे ब्रह्मांडपाहताना कोण आनंद होत होता हे कसे सांगू?
रिंग असलेला तो डौलदार शनी आणि त्याचे ८२ चंद्र तसेच केवळ वायुरुपी भला मोठा गुरु हा ग्रह आणि चार चंद्र इतक्या जवळून डोळ्यात साठवताना देवाने दृष्टी दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले….
बघावं तितकं थोडं..लिहावं तितकं थोडं.. तर अशीही अमेरिकेतल्या अॅरोझोना राज्यातील आमची मनमौजी सफर साठा उत्तरी सफल संपूर्ण झाली.
अद्भुत या शब्दांचा खरा अर्थच या सफरीत मी अनुभवला असे म्हणायला हरकत नाही.
क्रमशः

— लेखन : राधिका भांडारकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
