Home लेख आठवणीतील विद्यार्थी – 2

आठवणीतील विद्यार्थी – 2

0

नाकापेक्षा मोती जड !

“आठवणीतील विद्यार्थी” या लेखमालेत आज आपण वाचू या आय आय टी तून बी टेक, एम टेक, पीएच.डी झालेले, अनेक ठिकाणी अध्यापन केलेले, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ विजय पांढरीपांडे सरांचे एका अनोख्या विद्यार्थ्याविषयीचे हृद अनुभव. आज जगाला असे शिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे !

— संपादक

शिक्षकाला सर्वात जास्त समाधान केव्हा लाभते ? जेव्हा त्याचाच विद्यार्थी त्याच्यापेक्षा उंच होत नेत्रदीपक कामगिरी करत शिक्षकाला च मागे टाकतो.. अन् खूप पुढे निघून जातो तेव्हा ! अशाच विद्यार्थ्याबद्दल मला आज लिहायचे आहे.

माझी इच्छा त्याने माझ्यासारखे आय आय टी त जावे, ही होती. पण त्याला मात्र आय आय टी त मुळीच जायचे नव्हते. तर माझ्याच डिपार्टमेंट मध्ये, माझ्याच विद्यापीठात शिकायचे होते. इथेही प्रवेश सोपा नव्हता. प्रवेश परीक्षेत सहा लाख विद्यार्थ्यांत पहिल्या दीडदोनशे मध्ये रँक आली तरच आमच्या इलेक्ट्रॉनिक विभागात खुल्या वर्गात प्रवेश मिळू शकत होता. त्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त धाकधूक मला होती, कारण त्याने दुसरी कुठलीही प्रवेश परीक्षा दिली नव्हती. इतका त्याला आत्मविश्वास होता ! सुदैवाने तो सार्थ झाला. उत्तम रँक मिळाली. तो माझा नात्यातला माझा विद्यार्थी झाला..

मी त्याला पहिल्या वर्षी प्रवेश घेताच म्हटले..” माझी एक इच्छा आहे. आमच्या विभागाचे संस्थापक विभागप्रमुख यांच्या नावे एक सुवर्ण पदक असते पहिला येणाऱ्यासाठी. ते तुला मिळावे. त्याने क्षणाचा विचार न करता मलाच प्रश्न केला, ”मी बुद्धिमान व्हावे असे तुम्हाला वाटते की पहिला येऊन सुवर्ण पदक मिळवावे असे वाटते ?” मी पहिला ऑप्शन निवडला.. सुवर्ण पदकांचा नाद सोडला. तो खरेच बुद्धिमान झाला.

तो विद्यार्थी नात्यात असला तरी त्याला शिकवणे भाग होते. मी चार वर्षात त्याला दोन विषय, एक प्रॅक्टिकल असे तीन विषय शिकवले.पण त्याचे मूल्यमापन मी केले नाही. ते दुसऱ्या प्राध्यापकांकडून करवून घेतले.

एकदा दुसऱ्या प्राध्यापकाने त्याला युनिट टेस्ट मध्ये पैकीच्या पैकी गुण दिले.मी उत्तर पत्रिका बघितली.एक लहानशी चूक होती. मी त्या प्राध्यापकाला त्या बद्दल विचारले. तो माझाच विद्यार्थी.. म्हणाला, ”सर,फक्त एक चिन्ह चुकीचे लिहिले आहे. ते अनावधानाने घडले हे सहज कळते.त्यात गुण कापण्यासारखे काही नाही.” असे कसे ? चूक ही चूकच असते. अनावधानाने झालीअसली तरी !” मी त्याचे दोन गुण कमी केले ! नातेवाईक असूनही !

तो असेपर्यंत मी कुठलेही परीक्षेचे काम केले नाही. परीक्षा विभागात चार वर्षे पाऊलच ठेवले नाही कारण नियमच असा आहे की नातेवाईक ज्या परीक्षेला असेल त्या परीक्षेपासून तुम्ही दूर,अलिप्त राहायचे. मी चारही वर्षे तो नियम कसोशीने पाळला. कुठल्याही शिक्षकाला आमच्यातले नाते सांगितले नाही. अनेकाना तर हे नाते त्याची पदवी पूर्ण झाल्यावर कळले. त्याचे त्यांना अप्रूप वाटले.

फायनल इयरच्या प्रोजेक्ट साठी त्याने ज्या प्रोफेसरची निवड केली ते अतिशय कडक शिस्तीचे होते. मी अनेकदा त्यांच्याशी शैक्षणिक वाद देखील घालत असे. म्हणून मी त्याला सावध केले.म्हटले..त्यांनी तुझा प्रबंध रोखला तर मी मध्ये पडणार नाही..”
तो म्हणाला, ”तुम्ही काळजी करू नका.माझे मी पाहून घेईन”.
त्याने त्यांच्या मार्गदर्शनात उत्तम काम केले. तो त्यांचा लाडका विद्यार्थी झाला.इतका की अमेरिकेतील ज्या विद्यापीठात त्यांनी पी एच डी केली, शिकवले.. त्याच विद्यापीठात याने ही प्रवेश मिळवला. भरपूर शिष्यवृत्ती सह.बी ई नंतर डायरेक्ट पीएचडी ला प्रवेश !!

मी त्याला शिकवत असताना एकदा एक प्रॉब्लेम पुस्तकात होते तसे, त्या पद्धतीने शिकवले. तो वर्गात काही बोलला नाही. नंतर त्याने मला एकट्या त सांगितले..” किती लांब लचक पद्धत वापरली तुम्ही वर्गात ? हे बघा तेच प्रॉब्लेम मी तीन स्टेप्स मध्ये सोडवले.!”. मी त्याची पद्धत तपासली.एक प्रमेय वापरून त्याने तीन स्टेप्स मध्ये उत्तर गाठले होते. ”जिनियस” मी मनात म्हटले. नंतर शिकवताना मी त्याचीच सोपी पद्धत वापरली. कधी कधी विद्यार्थी देखील शिक्षकांना छान धडा शिकवतात !

परीक्षेत तो कधीही तीन तास बसत नसे. जेव्हढे येते तेव्हढे लिहून महाशय दोन तासात परीक्षा हॉल बाहेर ! मलाच त्याच्या निकालाची काळजी वाटायची. त्याने चौथा पाचवा नंबर कधी सोडला नाही. पहिल्या तीन मुली होत्या.हे नेहमीचेच. आमच्या विभागात मुलांपेक्षा मुलीच वरचढ !
बहुतेक सुवर्ण पदके त्यांच्याच नावावर..पण पुढे त्यांचे काय होते हा विषय वेगळा.

त्याचे गणितावर फार प्रभुत्व होते. परदेशात जाण्यासाठी टोफेल वगैरेच्या तयारी साठी त्याने भरपूर इंग्रजी वाचन केले होते. त्याने पूर्ण शेक्सपियर वाचला आहे हे मला नंतर फार उशिरा कळले.!

पदवी नंतर त्याने अमेरिकेत एका प्रसिद्ध प्रोफेसर बरोबर संशोधन केले. त्यानेही याला अक्षरशः पिळून काढले. अर्थातच चांगल्या अर्थाने. बरेच कोर्स वर्क केले. चार वर्षात त्याने डबल एम एस, सह पी एच डी अशा तीन पदव्या मिळवल्या ! त्याने आपले कोर्स वर्क चे ग्रेड कार्ड पाठवले.मी ते पाहून त्याला लिहिले. ”अरे नावाला, औषधाला एखादी तरी बी ग्रेड मिळवायची ! सगळ्याच ए किंवा ए प्लस ग्रेड्स म्हणजे टू मच..”!!

त्याने प्रबंधावर आधारित दोन तीन पेपर्स प्रसिद्ध नामांकित जर्नल मध्ये प्रकाशित केले. पेटंट देखील मिळवले संशोधनाचे..

एकदा तिकडे गेल्यावर मग प्रगतीबद्दल विचारायलाच नको. त्याने मूलभूत संशोधनावरच आपले लक्ष केंद्रित केले.जिथे तो राहायचा तिथले तापमान उणे दहा पंधरा. काळजी इकडे नातेवाईकांना. तिकडे तो अभ्यासात, संशोधनात मग्न. शिक्षण संपल्यावर पोस्ट डॉक्टरेट, सॅमसंग सारख्या कंपनीत संशोधन. मग फिलिप्स सारख्या जग प्रसिद्ध कंपनीत बढती. असा चढता आलेख. सगळे संशोधन अतिशय गुंतागुंतीचे. मी त्याचा शिक्षक असूनही, त्याच विषयातला असूनही माझ्या डोक्यावरून जाणारे, समाजोपयोगी विद्यान, तंत्रद्न्यान पुढे नेणारे. समाजाच्या भल्याचे असेच काहीतरी. सोबतीने जग प्रसिद्ध आय ट्रिपल इ या संस्थेच्या अनेक जर्नल्स चे संपादन, परिषदेत जबाबदारीची पदे, विद्यापीठात व्याख्याने.

आज या माझ्या विद्यार्थ्याच्या नावावर दोनशे च्या वर आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहेत.. (माझ्या नावे एकही नाही!) अनेक एम एस, पी एच डी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. त्याच्या संशोधन पेपर च्या लेखकाची नावे पाहिली तर आश्चर्य वाटते.हे महाशय नेदरलॅंड युरोप मधले. तर कुणी जर्मनीचे, कुणी सिंगापूर, कोरियाचे, कुणी अमेरिकेतील विद्यापीठाचे..वेगवेगळ्या ठिकाणी स्थित ही मंडळी एकत्र दर्जेदार संशोधन कसे करतात याचे आश्चर्य वाटते. जग किती पुढे चाललेय, हातात हात घालून किती उत्तम संशोधन करताहेत हे कळते.आपल्या कडील क्षुद्र कोत्या मनाची विद्वान, प्राध्यापक मंडळी पाहिली की तिकडचे हे वेगळेपण एकदम नजरेत भरते.खूप भव्य दिव्य वाटते.

गेल्या वर्षी त्याला आमच्याच विभागाने खास निमंत्रित केले होते.आमच्या संस्थापक विभाग प्रमुखाच्या नावाचे सुवर्ण पदक त्याला मिळाले नसले तरी त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी होणाऱ्या खास व्याख्यान देण्याचा विशेष बहुमान मात्र मिळाला. कुलगुरू उपस्थित होते. त्यांनी त्याचा सत्कार केला.त्याचा शिक्षक या नात्याने माझीच मान उंचावली.आय ट्रिपल इ या अमेरिकेतील संस्थेने घोषित केलेल्या जगातील उत्कृष्ट संशोधकाच्या यादीत त्याचा क्रमांक पहिल्या दोन टक्के संशोधकात आहे हे घोषित होताच टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. अभिमानाने शिक्षकाचा ऊर भरून आला. शिक्षकाला याहून अधिक वेगळे काय हवे असते ?

इतके सगळे लिहून झाले, पण त्या विद्यार्थ्याचे नाव सांगायचे राहून गेले. आजकाल असेच होते.. महत्वाचे सांगायचे राहून जाते, त्या विद्यार्थ्याचे नाव आहे, डॉ आशिष विजय पांढरीपांडे.
तो माझा मुलगा आहे हे आता सांगणे न लगे..! आता मला या विद्यार्थ्याचा किती किती अभिमान वाटत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. अधिक लिहिणे न लगे !!

प्रा डॉ विजय पांढरीपांडे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version