Home लेख आपली सुरक्षा, आपली जबाबदारी !

आपली सुरक्षा, आपली जबाबदारी !

0

आजच्या वेगवान डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सुरुवातीला औद्योगिक क्षेत्रापुरती मर्यादित असलेली सुरक्षेची संकल्पना सर्व क्षेत्रांसाठी अत्यावश्यक बनली आहे. मागील पन्नास वर्षांत सुरक्षा जागृतीत लक्षणीय प्रगती झाल्याचे दिसून येते. अशी जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतात ४ मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. हा उपक्रम १९७२ पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या पुढाकाराने सुरू झाला. या दिवसाचा मुख्य उद्देश उद्योग, कार्यालये, रस्ते तसेच घराघरांत सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि अपघातमुक्त वातावरण घडवणे हा आहे.

मुळात आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, सुरक्षा ही केवळ नियमांची अंमलबजावणी नसून ती एक सशक्त संस्कृती आहे, ही जाणीव सर्व स्तरांवर निर्माण झाल्याशिवाय अपघातांच्या प्रमाणात अपेक्षित घट होणार नाही, ही चिंतेची बाब आहे.

रसायनांची वाहतूक, रासायनिक कारखान्यांना लागलेल्या आगी, गॅस गळती यामुळे झालेली वित्त व जीवितहानी या बातम्या आजही वारंवार समोर येतात. अलीकडेच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर एलपीजी गॅस टँकरचा अपघात होऊन जवळजवळ ३६ तास वाहतूक ठप्प झाली होती. हजारो प्रवासी एकाच ठिकाणी अडकून पडले. अशा घटना केवळ अपघात नसूनo सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींकडे गंभीर इशारा असतात.

अपघातांच्या कारणांचा विचार केल्यास तांत्रिक गुंतागुंत, असुरक्षित कार्यप्रणाली, देखभाल व दुरुस्तीतील ढिसाळपणा, अपुरे प्रशिक्षण तसेच नियमांकडे दुर्लक्ष ही कारणे प्रामुख्याने आढळतात. अनेकदा आपत्कालीन योजना कागदोपत्री सक्षम असतात; परंतु प्रत्यक्ष सराव, मॉक ड्रिल आणि वेळेवर कृती यांचा अभाव असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते.

कायदे व अधिनियम वेळोवेळी अधिक सक्षम केले जातात. नवीन धोरणांची भर पडते. मात्र त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन, व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील समन्वय अत्यावश्यक आहे. अंमलबजावणीतील शिथिलता हीच अपघातांना आमंत्रण देणारी ठरते.

सुरक्षा ही केवळ कारखान्यापुरती मर्यादित नाही. तर राष्ट्रीय सुरक्षा, दलात रस्ते अपघात, बांधकाम क्षेत्रातील धोके, घरगुती गॅस व विद्युत उपकरणांचा अयोग्य वापर, उंच इमारतीतील आग प्रतिबंधक यंत्रणांची अकार्यक्षमता, वाढते सायबर गुन्हे, या सर्व क्षेत्रांत सुरक्षा जाणीव तितकीच आवश्यक आहे. आज “सुरक्षेची मानसिकता आणि वर्तणूक” ही संकल्पना अधिक महत्त्वाची ठरत आहे. नियमांची भीती नव्हे, तर सुरक्षिततेबद्दलची अंतर्मनातील बांधिलकीच सुरक्षित समाज घडवू शकते.

कारखान्याची सुरक्षा व्यवस्था, सुरक्षेची मानसिकता व वर्तणूक, आणि कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी, हे तीन स्तंभ मजबूत असतील, तर औद्योगिक तसेच इतर क्षेत्रांतील अपघातांची संख्या निश्चितच कमी होईल.
सुरक्षा ही केवळ व्यवस्थापनाची जबाबदारी नाही; ती प्रत्येक कामगार, प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.आपण सुरक्षित राहिलो तर कुटुंब सुरक्षित राहील; कुटुंब सुरक्षित राहिले तर समाज आणि राष्ट्र अधिक सक्षम व सशक्त बनेल. चला तर मग
अपघातमुक्त, जग आणि विकसित भारत घडवू या !

सुधीर थोरवे.

— लेखन : सुधीर थोरवे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version