Home लेख आयुर्वेद उवाच : १२

आयुर्वेद उवाच : १२

0

मधु (मध)
आयुर्वेदात मधाला मधु हे नाव दिले आहे. आजकाल वजन कमी करण्याच्या वेडाने मधाला चांगला भाव आला आहे. परंतु वजन कमी करण्यासाठी ज्या प्रकारे त्याचा वापर होतो, हे कितपत योग्य आहे ? याचा विचार केला पाहिजे.

* मधाचे सामान्य गुण – मध सामान्यतः वात कारक, पचण्यास जड, शीत, रक्तपित्त व कफ विकार नाशक आहे. संधान करणारे (तुटलेले जोडणारे) म्हणून पूर्वी अस्थी भग्न लेपात मधाचा समावेश असायचा, छेदन (मेद व कफाला छेदून कमी करणारे) म्हणून मेदस्वी लोकांमध्ये मध वापरावा पण तो जपून व नियमाने. मध हा रुक्ष व रसाने तुरट व मधुर आहे, ह्याचा मुख्य रस मधुर आहे.
* प्रकार – चरक ४ व सुश्रुत ८ प्रकार वर्णन करतात. हे प्रकार मधमाशीच्या जातींवरून आहेत. परंतु ह्यातील माक्षिक मधु सर्वश्रेष्ठ आहे, जो तैल वर्णी आहे.

* उष्ण मधु अथवा उष्ण द्रव्यांबरोबर मधु – विविध प्रकारच्या रस, वीर्य, विपाकाच्या फ़ुलांतून माश्या मध गोळा करतात आणि म्हणून ते गरम करणे अथवा उष्ण द्रव्यांसोबत खाणे निषिद्ध आहे.
मधमाश्या स्वतः विषारी असतात त्यांपासून निर्माण मध गरम केले असता विषयुक्त कार्य करते. म्हणून उष्णतेने पीडित व्यक्ती, उष्ण देश, उष्ण काळात मध वापर हा विषवत आहे. (परंतु वैद्याच्या सल्ल्याने काही आजारांत ह्याचा वापर उष्ण काळातही करता येतो)
म्हणूनच गरम पाण्यासोबत मध घेणे, अथवा काही पदार्थ बनवताना त्यात मध टाकणे व गरम करणे हे शरीराला हानिकारक आहे. बर्याचदा आपल्याला शुद्ध मध मिळत नसल्यामुळे हा त्रास सहसा कोणाला जाणवत नाही, परंतु मध वापरताना हि काळजी अवश्य घ्यावी.

* मधु अल्प मात्रेत सेवन – मध हे गुरु, रुक्ष, शीत, तुरट रसाचे असते, म्हणून अल्प मात्रेतच त्याचे सेवन करणे हितावह आहे.

* मध व तूप कधीही समान मात्रेत सेवन करू नये, आयुर्वेदात ते विषवत सांगितले आहे.

* मध नाना द्रव्यांसोबत संयोग पावते म्हणून ते योगवाही आहे आणि म्हणून अनेक औषधांसोबत त्याचा उपयोग होतो.

* अधिक मध सेवन केल्याने अथवा नियमपूर्वक मध सेवन न केल्याने मधाचे अजीर्ण होते व ते शरीरास हानिकारक आहे.

* खरे मध ओळखण्याच्या आयुर्वेदातील परीक्षा
१ मधाला मुंग्या लागत नाहीत आणि त्यावर माश्या बसत नाहीत.
२ कुत्रा खऱ्या मधास खात नाही.
३ तेलाप्रमाणे मधात बुडवलेली कापसाची वात जळते.

मधु आरोग्यास हितकर आहे फक्त त्याचा योग्य प्रकारे वापर करावा.
भेटु पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन तो पर्यंत..
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे।।

डॉ शार्दुल चव्हाण

– लेखन : प्रा वैद्य शार्दुल चव्हाण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version