Home यशकथा जिचे तिचे आकाश…: १३

जिचे तिचे आकाश…: १३

2

नंदिनी धारगळकर

काही काही व्यक्ती, कितीही मोठ्या झाल्या .. वयानी, ज्ञानानी … तरी त्यांची जिज्ञासू, अभ्यासू वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्या सतत वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतात. अशाच आजच्या डॅा.नंदिनी धारगळकर .

डॅा.नंदिनी या मुळच्या मुंबईच्या, डॅा.नंदिनी पुराणिक. त्यांनी पुणे येथून १९७३ मध्ये बी.ए.एम.एस. पूर्ण केले. त्या सुमारास के.ई.एम. मध्ये सरकारने एक स्पेशल कोर्स तात्पुरता सुरू केला होता. त्यात दर सहा महिन्यानी १ परिक्षा देऊन त्या एम. बी.बी.एस. झाल्या. एल.सी.पी.एस. ही पुढची स्पेशल डिग्री त्यांनी मुंबईहून १९७४ मध्ये घेतली. त्या एम.डी. आयुर्वेद (फिजियोलॉजी) आहेत. ती डिग्री त्यांनी पुणे विद्यापीठातून १९८७ साली घेतली.
आयुर्वेदातच त्यांनी पीएच.डी पुणे विद्यापीठातून १९९४ मध्ये केली. एन.आय.आय टी. मधून त्यांनी डिजिटल आणि टेक्नॅालॅाजिचे विशेष ज्ञान मिळवण्यासाठी १९९८ मध्ये स्विफ्ट इंडिया प्रोफेशनल कोर्स केला. त्यांना ज्योतिष शास्त्रामध्ये आवड होती. म्हणून त्यांनी मेडिकल ॲस्ट्रॅालॅाजी शिकण्यासाठी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतून शिक्षण घेतले. त्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातल्या अधिकृत माहिती सांगणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यासाठी त्यांनी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापिठातून २००४ साली विशेष प्राविण्य मिळविले आहे.

डॉ नंदिनी यांनी अमेरिकेच्या परदेशी भाषा शिकवणाऱ्या बी.व्हि. बी. इंटरनॅशनल स्कूलमधून २००७ ते २०१० मध्ये जपानी भाषा शिकण्यासाठी सर्व परिक्षा दिल्या. अधिकृत शिकवण्यासाठीच्या शेवटच्या दोन परिक्षाही दिल्या. त्यांना विचारले, ”एकदम मध्येच जपानी कां शिकावेसे वाटले ?” तेव्हा त्या म्हणाल्या, ”विदेशी भाषा शिकायची होती. रिटायरमेंट जवळ आली होती. जापनीज लोकांचा काम करण्यांचा आवाका, शिस्त या सर्वांविषयी प्रचंड आदर होता. म्हणून जिद्दीने ती भाषा शिकली. संस्कृत येणाऱ्या कोणालाही अशा भाषा फारच वेगळ्या, अनियमित वाटतात.

इतक्या विविध गोष्टी शिकल्यामुळे डॉ नंदिनी विविध क्षेत्रात कार्यरत राहिल्या. त्यांनी विविध पदांवर, भारतातल्या अनेक विद्यापिठातून, हॅास्पिटलमधून, संस्थामधून काम केले. त्यांनी प्राचार्य, डिन, हेड ॲाफ द डिपार्टमेंट, शिक्षक, लेक्चरर, डेमॅानस्ट्रेटर, उच्च पदवी विद्यार्थ्याना मार्गदर्शक, पेपर सेटर, परिक्षक, चेअरमन, डायरेक्टर, सिलॅबस सेटर, ट्रेनर, योग शिक्षक म्हणून काम केले. भारत सरकारच्या आरोग्य खात्यातही त्या होत्या. अशा विविध ठिकाणचा भरपूर अनुभव त्यांना आहे. दिल्ली, गुजरात, पुणे, नाशिक, मुंबई, लातुर, नागपूर, जयपूर, गुवाहाटी, अशा अनेक हॅास्पिटलमध्ये, विद्यापिठात त्या कार्यरत होत्या.

सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ नंदिनी यांनी अनेक ठिकाणी पैसे न घेता काम केले आहे. दृष्टीहिन मुली, १२ वर्षाखालील रस्त्यावर राहणाऱ्या मुली ह्यांना त्या मार्गदर्शन करत होत्या. अनेक संस्थांमधून ताणतणाव, ध्यान धारणा, योग ह्यावर त्यांनी भाषणं देऊन माहिती दिली आहे. फिरत्या दवाखान्यात त्यांनी आपली सेवा दिली आहे. संगणक शिकवले आहे. आदिवासी महिलांसाठी तळेगांवला काम केले आहे. मुलांसाठी व्यक्तीमत्व परिक्षा, त्यांचा शिक्षणाचा कल ओळखण्यासाठी च्या परिक्षा घेण्यासाठी त्या अनेक शाळेत गेल्या आहेत. त्यांची विस्तृत शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी, त्यांच्या आयुर्वेद आणि योग या क्षेत्रात अनेक पदव्या आणि प्रमाणपत्रे, त्यांचे विविध शैक्षणिक आणि प्रशासकीय पदांवरचे काम, अनेक संशोधन प्रकल्प यामुळे त्या आयुर्वेद आणि योग या क्षेत्रातील एक तज्ञ व्यक्ती आहे आणि त्यांनी या क्षेत्रात दिलेले अनेक योगदान हे मोलाचे समजले जाते.

डॉ नंदिनी यांची एकूण २१ पुस्तक प्रसिध्द आहेत. त्यात आयुर्वेदिक फिजिओलॅाजी, अंकशास्त्र, होमिओपथी, असे विषय आहेत. त्यांचे अनेक लेख, रिसर्च पेपर्स विविध जर्नल्स मध्ये आले आहेत. जपानी भाषेवर त्यांची ई साहित्य मध्ये अनेक पुस्तकं आहेत. त्यांनी आयुर्वेद शिकवणारी २ पाठ्यपुस्तकं लिहिली आहेत. “डॅाक्टर मी काय खाऊ” या पुस्तकातून त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले आहे.

डॉ नंदिनी यांना शैक्षणिक क्षेत्रात लक्षणिय यश मिळवल्याबद्दल तर अनेक पुरस्कार मिळाले आहेतच पण व्यावसायिक क्षेत्रातल्या उत्तम कामगिरी बद्दलही अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्या पदवी परिक्षेत प्रथम आल्या होत्या. उत्तम शिक्षकाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहे. विशेष प्राविण्य मिळालेली व्यक्ती म्हणून त्यांना मानानी अनेक समित्यांमध्ये घेऊन सन्मानित केले आहे.

डॉ नंदिनी या सध्या नोकरीतून निवृत्त झाल्या असल्या तरी स्वतंत्र खाजगी प्रॅक्टीस करतात. ॲानलाईन सल्लेही देतात. परदेशातल्या मुलांना शिकवतात. अनेक वर्ष त्या योग शिकवत आहेत. योग आचरणात आणत आहेत. आजच्या; २१ जून च्या योग दिनी त्यांनी दिलेला सोपा सल्ला नक्कीच मोलाचा आहे. त्या म्हणतात, ”योग आचरणात आणल्यामुळे मन सात्विक होतं, पचन चांगलं होतं आणि आपली सकारात्मक वृत्ती वाढून उत्साह वाढतो.”
त्यामुळेच त्यांचे शिक्षण आणि कामाचा व्याप अवाक करणारा आहे. त्यांनी असेच सदा कार्यरत राहून समाजपयोगी काम करत रहावे यासाठी त्यांना खूप शुभेच्छा !

चित्रा मेहेंदळे

— लेखन : चित्रा मेहेंदळे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

2 COMMENTS

  1. एक सखी एवढ्या विविध क्षेत्रात आपली मुद्रा यशस्वी रित्या उमटवते, हे खरोखरच प्रेरणादायी आहे. खूप छान कार्य👍, शुभेच्छा 💐

  2. शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन

    सुंदर प्रेरणादायी लेख 👌👌👌🙏आजची जीवनशैली पाहता प्रत्येकाने योग आचरणात आणणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version