Home यशकथा धामणगावची सपना झाली अमेरिकेत प्रोफेसर

धामणगावची सपना झाली अमेरिकेत प्रोफेसर

0

खेड्यातील अशिक्षित आईवडिलांची मुलगी स्वतःच्या इच्छाशक्तीमुळे ,सर्व अडी अडचणींवर मात करत अमेरिकेतील प्रख्यात विद्यापिठात प्राध्यापक झाली.एक अभिमानास्पद यशकथा..

ही गोष्ट आहे जुना धामणगाव येथील सपनाची. शिक्षण हे व्यक्तीचा कायापालट कसे करते, एकूणच व्यक्तीचे जीवनमान कसे बदलून टाकू शकते या उक्तीचे हे जिवंत उदाहरण आहे. येथे लिहीण्याचा उद्देश एकच आहे की यातून बोध घेऊन कुणीही व्यक्ती आपली प्रगती साधू शकतो. विशेषत: ही यशकथा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे.

सपना प्रकाश बनसोड ही जुना धामणगाव या खेडे गावातील अतिसामान्य कुटुंबात जन्मलेली मुलगी .घरची परिस्थिती बेताचीच. परिसरात बहुतेक लोक अशिक्षित. फक्त बाजूला प्राध्यापक दीपक आटे यांचे वास्तव्य. आई वडील अशिक्षितच. सपनाचे वडील भाजी विक्रेते तर आई शेतमजूर. सपनाचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. कोटांबा येथून दहावी झाल्यानंतर बारावी सायन्स आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वेतुन पूर्ण केले. बाबासाहेबांचे उच्च विचार सोबतीला होतेच. शिक्षणाचा ध्यास घेऊन सपनाने यवतमाळ येथून बी. फार्म. पूर्ण केले. मग एम.फार्म.साठी सरकारी कोट्यातून तिची पंजाब मधील मोहाली या ठिकाणी निवड झाली. नागपूर पलीकडे कधी न गेलेल्या आई-वडिलांनी माझा सल्ला घेतला व मी त्वरित प्रवेश घेण्याचा त्यांना सल्ला दिला .तेथे तिचे सर्व शिक्षण मोफत झाले. माझा पंजाबला जाण्याचा सल्ला तिच्या आई वडिलांनी एका क्षणात मानला याबद्दल मला त्याचे खूप कौतुक वाटले. सपना सुवर्णपदक प्राप्त करून एम. फार्म. पास झाली. संस्थेतर्फे हैदराबाद येथे तिचा पीएचडीसाठी प्रवेश झाला. पीएचडी साठी तिला पंचेचाळीस हजार रुपये महिना स्कॉलरशिप मिळत होती, त्यातील तीस हजार रुपये सपना दरमहा घरी पाठवत होती. पीएचडी होत नाही तोच सपनाची निवड अमेरिकेतील प्रतिष्ठित स्कूल ऑफ मेडिसिन, सेंट लुईस वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत प्रोफेसर पदावर झाली. आज भारतीय चलना नुसार साडेचार लाख रुपये महिना सपनाला वेतन मिळत आहे. गरीबीची परिस्थिती आहे म्हणून शिक्षण टाळणाऱ्यांसाठी सपनाची गोष्ट समाजाला प्रेरणादायी ठरल्याशिवाय राहणार नाही.

-लेखन : राजेश डोंगरे .
-संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version