Home साहित्य पुस्तक परिचय

पुस्तक परिचय

0

वास्तव

“वास्तव” हा शुभांगी गान यांनी लिहीलेला कथासंग्रह त्यांनी मला दिला आणि एक छान कथासंग्रह माझ्या वाचनात आला. तेरा कथांचा हा कथासंग्रह एका बैठकीत वाचून होईल असे प्रथमदर्शनी मला वाटले होते पण कथेचा बाज, गूढता, कथेतील प्रवाहीपणा आणि कथानक विचार करायला लावतात आणि वाचकाला गुंतवून ठेवतात .त्यामुळे कथा उमजून घेत वाचावी लागते.

अनेकविध भावभावनांची आंदोलने, मानवी जीवनात येणारे सुखदुःखाचे चढ उतार, मानवी अपेक्षा, इच्छा,मानवी मनाचे रहस्य,गूढ ,भावनांची उकल, वेदना, संवेदना या सर्वांचं एकत्रितपणे बांधलेलं कथासूत्र आपल्याला या कथासंग्रहात दिसून येते. मानवी मन हेच मूळात गूढ आहे.हातात आलं म्हणेपर्यंत ते कधी निसटून जाते हेच कळत नाही.पण हेच मन इतकं मजबूत आणि धाडसी असतं की आलेल्या संकटावर नेटाने मातही करते.कोविड काळ सगळ्यांना सतावून, तावून, सुलाखून गेला.त्याचे सावट कथांवर पडणार नाही हे अशक्यच.

दोन वेगवेगळ्या अर्थाच्या कोविड कथा आहेत. देशप्रेमाचे उदात्तीकरण या कथा करतात. तर तीन कथा मैत्रीच्या आहेत.दोन कथा गूढ आहेत तर दोन तीन कथा आयुष्याचे वेगवेगळे जीवनरंग गडद करतात.काही कथा आदर्शवादी आहेत तर काही कथा वृध्दाश्रम, वृद्धांच्या समस्या,आईचे मुलांवरचे प्रेम,तर काही ठिकाणी तारुण्यातल्या प्रेमाची झालेली विटंबना,कितीही अपमान झाला तरी खरं प्रेम कधी मरत नाही आयुष्याच्या उतारवयात तेच संयत प्रेम ताकद बनतं,एकमेकांची काळजी घेतं.

शिल्पकार,संवेदना या सामाजिक बांधिलकी जपणा-या कथा आहेत.तर वास्तव या शीर्षक कथेत कोविडमुळे पतीपत्नी पाॅझिटिव आल्यावर एका वर्षाच्या बाळाला वाॅटसपवरुन इतरांच्या पदरात टाकतात तो प्रसंग मन हेलावून टाकतो.

वास्तव जीवनात जे प्रसंग आपल्या आपल्यासमोर येतात त्याचे तंतोतंत वर्णन लेखिकेने या कथासंग्रहात केले आहे. त्यामुळे स्वरुप दीप प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा कथासंग्रह वास्तव या कथा शीर्षकाला पूरेपूर न्याय देतो असे वाटते.

प्रा.मानसी जोशी

— परिचय : प्रा.मानसी जोशी. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती: सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version