Home साहित्य फुड फंडा

फुड फंडा

1

महाराष्ट्रातल्या खाद्य संस्कृती बद्दल अनेक पुस्तके बाजारात आहेत. खाद्य पदार्थ कसे तयार करावेत याबद्दलही अनेक लहान मोठी पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध आहेत.

परंतु ॲड. अश्लेषा गणेश मुळे या तरुणीने वयाच्या 5 व्या वर्षी केलेल्या पदार्थापासून आजपर्यंत जे पदार्थ नातेवाईकांनी, शेजारी यांच्याकडून शिकले, त्या पदार्थ्यांचे एक छोटेखाणी पुस्तक नुकतेच “फुड फंडा” नावाने प्रकाशित झालेले आहे.
खरंतर इतर पुस्तकांच्या खाद्य पदार्थ तयार करण्याच्या सामुग्री आणि कृती याचाही समावेश या पुस्तकात असला तरी तो खाद्य पदार्थ नेमका कसा आणि केव्हा, कोणी केला त्याचे रसाळ वर्णन यात आहे.

महाराष्ट्रात असणाऱ्या उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या ॠतू सोबतच ग्रामीण भागापासून मोठया महानगरापर्यंतच्या विविध खाद्य पदार्थांची मांडणी या पुस्तकात दिसून येते. शेती व्यवसायात असणारे खान्देशातील आजोबा आणि वडिलांच्या नोकरीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करीत असतांना त्या त्या विभागातले प्रसिध्द असे खाद्य पदार्थ सहजपणे या
पुस्तकात डोकावून जातात.

ॲड. अश्लेषा गणेश मुळे यांनी म्हटल्याप्रमाणे, नेटचा वापर जसा वाढला तसे नवीन पदार्थ टेस्ट करायला आवडू लागले. यासोबतच बाबांच्या खवय्यगिरी बद्दलही पुस्तकात आवर्जून उल्लेख केला आहे.

नव्या पिढीला बाहेर ऑर्डर देऊन हवे ते पदार्थ मागविण्याची सवय आहे. मात्र याला अपवाद म्हणून नव्यापिढीचे नेतृत्व करणाऱ्या ॲड. अश्लेषा यांच्या पुस्तकात तीन पिढीतील पदार्थ दिसतात. आजीची पारंपारिक पध्दत आणि आईचे वर्तमानातले खाद्य पदार्थ यासोबतच नव्या जमान्यातील चायनिज सारखे पदार्थ या पुस्तकात दिसतात. विशेष म्हणजे अलिकडच्या काळात मुलांना न आवडणाऱ्या गुळपोळी, मेथी लाडू, बाजरीचा खिचडा, मेथीचा मुखिया, मेथीची उसळ, हुर्डा उपमा असे पदार्थ दिसतात.

आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरात येणाऱ्या भाज्या आणि फळे यांची देखील माहिती असणे आवश्यक असते. याचीच जाणीव ठेवून ओल्या हळदीचे लोणचे हा पदार्थ या पुस्तकात आवर्जून दिला आहे. दिवाळीत केल्या जाणा-या पदार्थांसोबतच अन्य सण वारी केले जाणारे पदार्थ ही यात आवर्जून आहेत.

अलिकडच्या काळात मोठमोठे केक शॉप उपलब्ध असतांना घरातूनच वेगवेगळया पध्दतीचे केक बनविणाऱ्या लहान बहिणीचा उल्लेख करून कॉफी केकची रेसिपी या पुस्तकात आहे.

नाचणी म्हटल्यानंतर पौष्टिकतेकडे लक्ष जाते. नव्या पिढीला नाचणीची भाकरी आवडत नसली तरी नाचणीचा उपमा मात्र आवडतो. हे अधोरेखित करणारा पदार्थ या पुस्तकात दिसतो. काळानुसार महानगरातल्या स्वयंपाकघरात लुप्त होणाऱ्या पदार्थांत कोकण मांडगे, पंचभेळ कढी, आल्याचे पाचक, केळयाच्या वड्या, तांदुळाची धिरडी, बोटूगल्याची खीर, हुर्डा उपमा, मेथीचे गोड अप्पे, चिकुचे लाडू, पापडाची भाजी असे पदार्थ कृती वाचतांना जुन्या जमान्यात गेल्याचा भास होतो.

फुड फंडा हे पुस्तक परिपूर्ण आहे असा दावा लेखिकेने केलेला नाही. अथवा सर्वच खाद्य पदार्थ या पुस्तकात आहेत असेही नाही. अवघ्या 56 पानी पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रसिध्द चित्रकार सुनिल डुंबरे यांनी केले आहे. साहित्य आरोहन प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून नितीन लिमये यांनी हे मुद्रित केले आहे. या पुस्तकाची किंमत 30 रुपये असली तरी या मधील पदार्थांचही श्रीमंती खूप मोठी आहे. वाचकांनी या पुस्तकाचे कौतुक आणि स्वागत केले पाहिजे, असे वाटते !

राजेंद्र मोहिते

– लेखन : राजेंद्र मोहिते
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version