Home लेख महामारी आणि विश्वाचा नवोदय (भाग २)

महामारी आणि विश्वाचा नवोदय (भाग २)

0

यापूर्वीच्या लेखात आपण अँटोनाईन प्लेग या महाभयंकर महामारीमुळे संस्कृतींची झालेली वाताहत पाहिली. या लेखमालेचा उद्देश केवळ महामारीमुळे झालेल्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकणे एवढा मर्यादित नसून यातून जगातील विविध संस्कृतींचा कशाप्रकारे नव्याने उदय झाला याबद्दल देखील उहापोह होईलच!
काळाचा प्रवास पुढे नेताना महामारीचे दुसरे गंतव्य आढळते ते इसवीसनाच्या ५४१ ते ५४९ या नऊ वर्षांच्या कालखंडाचे. जस्टिनियन किंवा जस्टिनियासिक प्लेग नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्लेगच्या साथीला सर्वात पुरातन आणि एक भयंकर महामारी मानले जाते. या साथीच्या रोगास एसरसिनिया पेस्टीज हा जिवाणू कारणीभूत होता. या रोगाने भूमध्य सागराचे खोरे, युरोप आणि आसपासचा पूर्व प्रांत, ससानियन साम्राज्य तसेच रोमन साम्राज्य आणि मुख्यतः या साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टटिनोपल शहर पछाडले होते. रोमन साम्राज्याचा तत्कालिन राजा असलेल्या जस्टिनियन यास या रोगाची बाधा झाली होती ज्यातून तो पुर्णतः बरा झाला आणि ओघाने रोगास राजाचे नाव दिले गेले. नावात काय असते म्हणा!

या महामारीचे वर्णन वाचताना वाचकाचे हृदय द्रवते. डोळे नकळत पाणावतात. प्रतिदिन होणाऱ्या मृतांचा आकडा एवढा भयंकर होता की स्मशानभूमीत प्रेतांसाठी जागाच शिल्लक नव्हती. कैक मृतदेह अंत्यविधीविनाच शहरात एक नकोशी दुर्गंधी सोडत होते. अभ्यासकांच्या मते राजधानीची जवळपास २०% तर युरोपातील एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश लोकसंख्या नष्ट झाली होती. इजिप्तहुन येणाऱ्या धान्य कोठारातील उंदरांच्या सुळसुळाटातून ही महामारी पसरली होती. या महामारीचा दुष्परिणाम अरेबियन राष्ट्रांवर झाल्याचे अभ्यासक सांगतात.

२०१३ साली झालेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले की एसरसिनिया पेस्टीज या जीवाणुचे मूळ तियान शान या चीन आणि कजाकस्तानच्या सीमेवर असलेल्या पर्वत रांगांमधे दडलेले असल्याचे आढळते. महामारीच्या काळ्या काळाचा पडदा चौदाव्या शतकाच्या मध्यावर येऊन थांबतो आणि आपल्याला दिसतो तो एक भयावह साथीचा रोग ज्याचं नावदेखील तेवढच जीवघेणं! अर्थातच ब्लॅक डेथ जो पेस्टीलेन्स या नावाने देखील ओळखला जातो. या साथीच्या रोगावर बऱ्याच अभ्यासकांनी आपली मतं मांडली आहेत. काहींच्या मते हा एक अत्यंत दुर्दैवी काळ होता ज्याने इसवीसनाच्या १३४७ ते १३५१ या कालावधीत युरेशिया, उत्तर आफ्रिका आणि युरोप मधील जवळपास ७५ ते २०० दशलक्ष लोकसंख्या मृत पावली होती. म्हणजे शाहरुख काजोल फेम जोडीच्या सुपरहिट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटातील तो हिरवागार निसर्गरम्य परिसर कधी काळी रोगग्रस्त होता. येरेसिनिया पेस्टीस या जिवाणूमुळे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे संशोधक सांगतात. या महामारीचा युरोपच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनावर दूरगामी परिणाम झाला.

मध्य अथवा पूर्व आशियातून आलेली ही महामारी व्यापारी जहाजांद्वारे कॉन्स्टटीनोपल, सिसिली आणि इटली द्वीपकल्पमार्गे भूमध्य सागराचे खोरे, पश्चिम आशिया आणि उर्वरित युरोपात पसरली. संशोधन असे सांगते की हा रोग एकदा उंदरातून मानवाकडे संक्रमित झाला की त्याचा संसर्ग मानवातून पसरायचा ज्यात निमोनिया सदृश लक्षणे आढळून येत असतं. यावरून असे लक्षात येते की त्याकाळी देखील सामाजिक आणि व्यक्तिगत अंतर आणि स्वच्छता या बाबींना अनन्य साधारण महत्त्व आलेले होते. या महामारीने युरोपातील जवळपास ३०% ते ६०% तर विश्वातली ३७५ दशलक्ष ते ४७५ दशलक्षच्या आसपास लोकसंख्येला मृत्यूच्या काळ्या पडद्याआड लोटले. त्यात भर म्हणून की काय पण तत्कालीन काही धर्म अशा महामारीस ईश्वरी प्रकोप मानत ज्यावर आपण उपचार करणे म्हणजे ईश्वरी संकेतांना डावलने असे मानले जाई.. तर काहींच्या मते हा ईश्वरी अधिकार अथवा आदेश होता!

यापुढील भागात आपण एकोणिसाव्या शतकातील महामारीचा भारतीय समाजव्यवस्थेवर झालेल्या दूरगामी परिणामावर चर्चा करूत.

क्रमशः
– लेखन: तृप्ती काळे.
– संपादक: देवेंद्र भुजबळ.9869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version