Home लेख महिलांनो, प्रवास करताय ? जरा जपून !

महिलांनो, प्रवास करताय ? जरा जपून !

0

एस्टी महामंडळातर्फे महिलांना अर्धे तिकीट प्रवास योजना जाहीर झाली आणि महिलांना आनंदाचे भरते आले.

यशस्विनी पतीला म्हणाली, “अरे, किती छान बातमी आहे ना आणि बघ ना आज रात्रीपासूनच ही योजना सुरू होत आहे.”
“हो ना. पण तुला का आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत ?”
“ऐक ना, नेमक्या शिल्लक असलेल्या सुट्ट्या मी मागितल्या आणि आश्चर्य म्हणजे खडूस साहेबांनी लगेच मान्य केल्या. आता असे करते, आज रात्री बारा वाजता आईकडे जाते…”
“फर्स्ट डे फर्स्ट शो ?”
“होय”.
ओके.
“मी तयारीला लागते…” असे म्हणत यशस्विनी तयारीला लागली…

रात्री साडे अकराच्या सुमारास ते दोघं बसस्थानकावर पोहोचले. पाहतात तर काय… तोबा गर्दी ! तीही महिलांची ! यशस्विनीने पतीला घरी जायला सांगितले आणि ती प्लॅटफॉर्मवर आली. तिथंही तुफान गर्दी होती.

बस लागली… बस मागे मागे येत असताना अनेक महिलांनी बसमध्ये चढायला सुरुवात केली. बस प्लॅटफॉर्मवर थांबली नि यशस्विनीने धक्काबुक्की, रेटारेटी करत बसमध्ये प्रवेश केला. पाहते तर बसायला तर सोडा पण उभं राहायला ही जागा नव्हती.

यशस्विनी अक्षरशः एका पायावर उभी राहिली. बस सुरू झाली. यशस्विनीच्या हाताला कुणी तरी स्पर्श केला. तिने पाहिले. तशी शेजारच्या आसनावर बसलेली ती तरुणी थोडं पुढे सरकत म्हणाली,
“बस. करुया ॲडजेस्ट…”
“थॅंक्यू…” म्हणत यशस्विनी तिच्या बाजूला टेकली.

तरुणीच्या बाजूला चाळीशी ओलांडलेली महिला बसली होती. यशस्विनी बसली खरी पण तिला काही तरी वेगळे जाणवत होते. त्या तरुणीची चुळबूळ वेगळेच काहीतरी दर्शवत होती. कार्यालयात जाता-येता यशस्विनीला वेगवेगळ्या स्पर्शाची जाणीव होत असे… विशेषतः पुरुषी स्पर्शांचा तिला चांगलाच परिचय झाला होता. शेजारच्या तरुणीचा स्पर्श यशस्विनीला अस्वस्थ, बेचैन करत होता. यशस्विनी वारंवार सावरून बसत असताना तरुणीचा हात वेगळी कडे सरकला आणि यशस्विनीने दचकून तिच्याकडे पाहिले. डोक्यावर असलेल्या प्रकाशात तरुणीचा चेहरा वेगळाच वाटला… सुकुमार तरुणासारखा !

काही क्षणात बसमधील दिवे बंद झाले आणि… आणि… यशस्विनी जोरात ओरडली. तशी वाहकाने घंटी वाजवताच चालकाने बसचा वेग कमी केला आणि दिवे लावले.
“कोण ओरडले…? काय झाले…?” असे म्हणत वाहकाची शोधक दृष्टी सर्वत्र फिरत असताना यशस्विनी म्हणाली,
“म.. म.. मी…ही तरुणी नाही आहे. हा.. हे.. दुष्ट पोट्ट आहे…”
“क… क… काय?” वाहकासोबत अनेक आवाज आले. सारे उठून तिकडे बघत असताना यशस्विनी म्हणाली,
“होय ! अर्ध्या तिकिटाची सवलत मिळावी आणि मग मजाही मारता यावी म्हणून ह्याने मुलीचा वेश केलाय…” असे म्हणत तिने त्याच्या डोक्यावरचा केसांचा टोप ओढला आणि त्या तरुणाचं स्वार्थी नि घाणेरडं बिंग फुटलं…
क्रमशः

नागेश शेवाळकर

– लेखन : नागेश शेवाळकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version