Home लेख “रात्री जेवायला काय करू?” – जगातील सर्वात अवघड आणि न सुटलेलं कोडं...

“रात्री जेवायला काय करू?” – जगातील सर्वात अवघड आणि न सुटलेलं कोडं !

0

​”ब्रह्मांड कसं तयार झालं ?”, “आधी कोंबडी ~आली~ की अंडं ?” किंवा “कटप्पाने बाहुबलीला का मारलं ?”… या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विज्ञान आणि गुगल शोधून काढेल हो. पण गेल्या काही हजार वर्षांत मानवजातीला एका अत्यंत गहन, क्लिष्ट आणि गूढ प्रश्नाचं उत्तर शोधता आलेलं नाही. तो प्रश्न म्हणजे – “रात्री जेवायला काय करू ?”

​हा प्रश्न नसून एक ‘कौटुंबिक ब्रह्मास्त्र’ आहे, जे रोज संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान प्रत्येक घरातील गृहिणीच्या डोक्यात डागलं जातं.
​दिवसभराची सगळी कामं आटोपून गृहिणी जरा कुठे सोफ्यावर टेकते, तोच तिच्या डोक्यात एक धोक्याची घंटा वाजते. फ्रिज नुसतं पाहिलं जातं (जणू काही फ्रिज स्वतःहून भाजी चिरून देणार आहे !). पण समोर दिसतात फक्त अर्धा टोमॅटो, दोन सुकलेल्या मिरच्या आणि कालच्या भाजीचं उरलेलं कढण आणि मग सुरू होतो, घरातल्या सदस्यांशी संवादाचा (वादाचा) ऐतिहासिक सोहळा !

जेव्हा गृहिणी अत्यंत आशेने घरातल्यांना विचारते, “आज रात्री जेवायला काय करू ग बाई ?”, तेव्हा मिळणारी उत्तरं ही मराठी साहित्यातील उत्कृष्ट विनोदी नमुने ठरतील. पतीरायांचे उत्तर असते, “काहीही कर, मला चालतं !” (टीप : हा जगातला सगळ्यात मोठा सापळा आहे. ‘काहीही’ मध्ये जर तुम्ही मेथीची भाजी केली, तर लगेच तोंड वाकडं होतं. ‘अरेरे, रात्री मेथी कोण खातं?’). मुलांचे उत्तर ठरलेले असते, “मम्मी, काहीतरी चमचमीत कर ना !” (चमचमीत म्हणजे काय ? रोज रात्री पिझ्झा-बर्गर किंवा पनीर टिक्का बनवायला घर काय हॉटेल आहे?). त्यात सासूबाईंचे आपले वेगळेच सांगणे असते, “बघ बाई, तुझ्या आवडीचं कर, मला फक्त तेल-मसाला नसलेलं, मऊ आणि पचायला हलकं काहीतरी दे !”. थोडक्यात काय, तर पूर्ण स्वातंत्र्य देऊनही कोणालाच काही सुचत नसतं, पण शेवटी सगळी जबाबदारी मात्र बिचाऱ्या गृहिणीवरच येऊन पडते.
​जेव्हा घरातून काहीच उत्तर मिळत नाही, तेव्हा गृहिणी ‘यूट्यूब’चा आधार घेते. तिथे सर्च केलं जातं: “१० मिनिटांत बनवा रात्रीचा सोपा डिश”. पण तो व्हिडिओ सुरू झाला की समजते, त्या सोप्या डिशसाठी शेकडो गोष्टी लागतात. अवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, चिली फ्लेक्स आणि माहित नाही कुठलं कुठलं चीज ! शेवटी गृहिणी वैतागून फोन बंद करते आणि आपल्या नेहमीच्या ‘कढई’कडे वळते.

सर्व विचारमंथन, वादविवाद आणि नकारांचे टप्पे पार पडल्यावर, रात्री ८:३० वाजता गृहिणी स्वतःच्या हुकूमशाही अधिकाराचा वापर करते. जगातल्या ९०% घरांमध्ये रात्रीच्या जेवणाचा शेवट याच तीन हुकमी पर्यायांपैकी एकाने होतो :-
​१) वरण-भात अन् बटाट्याची कापं: हा जगातला सर्वात सुरक्षित, सोपा आणि सगळ्यांचा आवडता मेन्यू.
२) खिचडी-पापड-लोणचं: जेव्हा गृहिणी पूर्णपणे थकलेली असते, तेव्हा ‘खिचडी सम्राट’ प्रकट होतो.
३) पिठलं-भाकरी किंवा पोळी: काही सुचत नसेल तर बेसन झिंदाबाद !
​रोज रात्री जेवणाचे ताट समोर आल्यावर सुटकेचा श्वास टाकणारे घरचे लोक तृप्त होऊन जेवतात. पण त्यांना काय ठाऊक, हे जेवण बनवण्यामागचं ‘लॉजिस्टिक’, ‘प्लॅनिंग’ आणि मानसिक कसरत इस्रोच्या उपग्रह सोडण्यापेक्षा कमी नव्हती !
​रात्रीचं जेवण संपतं, भांडी घासून होतात. गृहिणी सुखाची पाठ टेकते… आणि डोळे मिटता मिटता अचानक तिच्या डोक्यात पुढचा विचार वीज चमकल्यासारखा येतो— “उद्या सकाळी डब्याला काय करू ??”
​आणि हे चक्र असं चं अखंड चालत राहतं!😊

सुनीता नाशिककर

— लेखन : सुनीता नाशिककर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version