Home पर्यटन वर्धा : गीताई मंदिर

वर्धा : गीताई मंदिर

1

वर्धा येथील गोपुरी मध्ये असणारे गीताई मंदिर हे बहुधा देशातील असे एकमेव मंदिर आहे. या मंदिराच्या परिसरात 730 दगडांवर गीतेचे अठरा अध्याय कोरलेले पाहायला मिळतात.

गीताई मंदिराचा परिसर 27.8 एकरचा असून अतिशय शांत निसर्गरम्य आहे. येथे येणाऱ्यास गीता शांतपणे वाचण्याचा आनंद मिळतो. गीतेचे हे अठरा अध्याय वेगवेगळ्या रंगाच्या शिळेवर कोरण्यात आले असून यासाठी लागणाऱ्या या शिळा देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आणल्या गेल्या असल्याने एकात्मतेचे प्रतीक याठिकाणी पाहायला मिळते याठिकाणी आचार्य विनोबा भावे यांनी रचलेल्या या गीतेमधील ओळी कोरल्या आहेत.

आपल्याकडे अधिक मासात भगवान विष्णू चे कृष्णाचे नामस्मरण करण्याचे सांगितले आहे. त्याकाळात गीतेचे वाचन केल्याने ही पुण्य मिळते असे म्हटले आहे. परंतु गीतेचे असेही मंदिर असू शकते याची कोणी कल्पनाच करणार नाही पण हे वास्तव आहे.
देशातील एकमेव हे असे मंदिर आपणास वर्धा येथील गोपुरीत पाहायला मिळते. जिथे संपूर्ण गीता दगडी शिलांवर कोरलेली आहे.

यामध्ये पूर्वेकडील शिलांसाठी लागणारे दगड चुनार उत्तरप्रदेश येथून तसेच पश्चिमेकडील दगड कोल्हापूर मधील आहेत. उत्तरेकडील दगड हे कुरोली मध्यप्रदेश मधील आहेत. बुंदेल राजस्थान मधून तर दक्षिणेस कुप्पम आंद्रप्रदेश तथा कर्नाटक आणि तामिळनाडू मधून ही यातील काही दगड आणले गेले आहेत.

येथे प्रत्येक अध्याय वेगवेगळ्या रंगाच्या दगडावर कोरलेला असल्याने एक अध्याय संपला की दुसरा अध्याय वेगळ्या रंगाच्या दगडावर कोरलेला दिसतो.

या मंदिरातील हे दगड भारताच्या दृढ एकतेचे प्रतीक आहेत. याठिकाणी तरुण पिढी सोबत वृध्द पिढीही येऊन गीतेचे वाचन करताना दिसते. वर्ध्यातील पर्यटन स्थळांमध्ये या मंदिराचाही समावेश आहे.
या ठिकाणी या शिळा उभारताना ऊन वारा पाऊस याचा परिणाम काय होईल विचार केला आहे. या शिळा 2 फूट जमिनीत काँक्रिट मध्ये सेट केल्या असून त्यांची ऊंची 9 फूट ठेवली असून रुंदी 2 फूट आहे. एकसमान या शिळा लावलेल्या आहेत. दोन शिलांमधील अंतर 3 इंचाचे आहे. या शिळा लावताना समोर चरखा आणि मागच्या बाजूने गाईचे प्रतीकात्मक रूप पाहायला मिळते.

या शिळा लावताना महत्वाची काळजी अशी घेतली आहे की उभे राहून वाचताना अक्षरे समोर यावीत. तसेच अगदी पाच ते सहा फुटांपर्यंत ही अक्षरे दिसत असल्याने व्यवस्थित वाचता येतात.

याठिकाणी आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनावरील प्रदर्शन ही भरविण्यात आले आहे. आचार्य विनोबा भावे यांनी गितेच्या 700 ओव्यांचा मराठी अनुवाद केला. 1932 मध्ये पुस्तक रुपात त्या प्रसिध्य केल्या. त्याच या शिलावर कोरण्यात आल्या आहेत.

वर्धा येथे गेल्यावर हे मंदिर पाहायला नक्की जा.

मानसी चेऊलकर

— लेखन : मानसी चेऊलकर. अलिबाग
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. “गीताई माऊली माझी,तिचा मी बाळ नेणता….
    पडता रडता घेइ, उचलुनी कडेवरी….”
    या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्या चा, मी साक्षीदार आहे.त्या दिवशी पूजनीय विनोबा भावे सहित सर्व मान्यवरांच्या समक्ष मी स्टेज वरून सर्व शालेय विद्यार्थ्यांचे सूत्र संचालन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version