Home लेख वर्धा साहित्य संमेलन ( ५ )

वर्धा साहित्य संमेलन ( ५ )

0

४ फेब्रुवारी २०२३. आजचा दिवस माझ्या साहित्यिक आयुष्यातला महत्त्वाचा दिवस होता. आज माझ्या “सांजवात” या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय साहित्य संमेलनात होणार होते. त्याचप्रमाणे रात्री निमंत्रितांच्या कवी संमेलनात मला कविता सादरीकरणाची संधी मिळणार होती.

सकाळी साडेआठ वाजता संमेलन स्थळी घेऊन जाण्यासाठी आलेल्या बसने मी संमेलन स्थळी पोहोचलो. मुंबईच्या कवी सौ. प्रतिभा सराफ याही बरोबर होत्या. नाश्ता करून मी मुख्य मंडपात आलो. साडेनऊ वाजता डॉ. अभय बंग यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. मुलाखत फारच उत्तम झाली. मा. मुक्ता पुणतांबेकर, मा. विवेक शिरसाठ व विनोद सावंत यांनी डॉक्टरांना बोलते करून श्रोत्यांपुढे त्यांचा जीवनपट उलगडला.

कार्यक्रमात असतानाच अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मा. बळीराम गायकवाड मला जॉईन झाले. हा कार्यक्रम ऐकायला अ.भा.सा.परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लेखक व कवी प्रवीण दवणे हेही सौ. दवणेंसह उपस्थित होते. आपल्या मुलाखतीत डॉ. बंग यांनी विनोबांच्या सहवासात आपण कसे घडलो, महात्मा गांधींची नई तालीम, यात व्यक्तिमत्त्व कसे घडत गेले, सेवेचा निर्णय त्यांनी कसा घेतला, गरीब ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी संशोधनाचा, स्टॅटिस्टिक्स यांचा कसा उपयोग झाला, आणीबाणीत वसंत साठ्यांनी विनोबांचा आणीबाणीला पाठींबा आहे, हे कसे पसरवले या संबंधात माहिती सांगितली. तरुणांनाही मार्गदर्शन केले.

बारा वाजता ग.त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचावर माझ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन असल्याने मला मुलाखत पूर्ण ऐकता आली नाही. तसेच नंतर होणाऱ्या अनुवादावरील परिसंवादात डॉक्टर बळीराम गायकवाड हे भाग घेणार होते. तोही ऐकता आला नाही.

मी बारा वाजता प्रकाशनासाठी प्रकाशन मंचावर पोहोचलो तेंव्हा बाल साहित्यकार मा. एकनाथजी आव्हाड व इतर मान्यवर सभामंडपात उपस्थित होते. डॉ. रवींद्र मुंढे यांनी सर्व व्यवस्था केली होती. खास माझ्या काव्यसंग्रह प्रकाशासाठी प्राध्यापक नरेंद्र पाठक हेही सभागृहात पोहोचले. प्रा. पाठक यांच्याकडे संमेलनाचे मुंबई समन्वयक अशी जबाबदारी होती.
ते स्वतः साहित्य अकादमीचे सदस्य असून अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रांताचे कार्याध्यक्षही आहेत. हा प्रकाशन समारंभ मी फेसबुक लाईव्ह केला. त्याला बसवकल्याणचे श्री पाटील यांची मदत झाली. त्याचबरोबर कल्याणचे श्री दाते यांनीही काही व्हिडिओ काढले. तसेच माझे मित्र श्री सुधीर चित्ते यांनी प्रकाशन समारंभाचे सुंदर फोटो काढले.

या प्रकाशन समारंभात प्राध्यापक नरेंद्र पाठक यांनी लेखकाने कशी पुस्तके लिहावीत याचे मार्गदर्शन उत्तम तऱ्हेने केले. त्या दिवशी जवळजवळ ९६ पुस्तकांचे प्रकाशन झाले. काही पुस्तकांचे प्रकाशन माझ्या व डॉ. मुंढे यांच्या हस्ते व्यासपीठावरून झाले.

अनेक लेखकांनी व कवींनी माझ्या स्वाक्षऱ्या त्यांच्या पुस्तकांवर घेतल्या. हा एक अविस्मरणीय अनुभव होता. या प्रकाशना संबंधी माझ्या नावासह दुसर्‍या दिवशी तेथील लोकमत मध्ये बातमी छापून आली.

प्रकाशन कार्यक्रमा नंतर अखिल भारतीय साहित्य परिषदेचे संमेलनात आलेले सर्व साहित्यिक अनौपचारिकरित्या एकत्र भेटले. तेथे साहित्य परिषदेच्या वर्धा जिल्हा व ठाणे महानगर कार्यकारीणीची घोषणा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. प्रवीण दवणे यांनी केली.
प्रा श्याम देशपांडे हे वर्धा जिल्हा अध्यक्ष तर लेखक, कवी व चित्रकार विजयराज बोधनकर हे ठाणे महानगराचे अध्यक्ष म्हणून काम पहाणार आहेत.

तेथेच मध्य प्रदेश मराठी साहित्य अकादमीचे उदय परांजपे यांचीही ओळख झाली. अकोला, बुलढाणा, नागपूर येथीलही साहित्यिक आले होते.

दुपारी कवी दुर्गेश सोनार, कवी मृणाल केळकर, कवी निशा काळे, कवी अविनाश पाटील, कवी गुणवंत पाटील, जालन्याचे कवी डॉ. राज रणधीर, कवी संजय गगे खरीडकर, ठाण्याच्या कवी हर्षदा अमृते, पनवेलचे कवी रविंद्र सोनावणे, डोंबिवलीचे गझलकार आनंद पेंढारकर व हेमंत राजाराम यांची भेट झाली. कवी कट्टा व गझल कट्ट्यावर मी हजेरी लावली. वरील पैकी अनेकांच्या कविता व गझला ऐकल्या.

मा. सुधीर चित्ते यांनी वंदनीय मावशी केळकर वाचन मंचावर अभिवाचन सादर केले, त्याला हजर राहिलो. छायाचित्रे काढली.
मा. मनिषा चव्हाण यांचे अभिवाचन ऐकणे हुकले. डॉ. बळीराम गायकवाड यांची अनेक मंडळींशी ओळख करून दिली.
अशी ही ४ तारखेची दुपार आनंदात गेली.
क्रमशः

प्रवीण देशमुख

– लेखन : प्रवीण देशमुख. कल्याण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version