पर्यावरण दिनानिमित्त विशेष कविता वाचू या. पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा.
— संपादक
अरे माणसा माणसा
जरा पाही माझ्याकडे
विनविते पुन्हा पुन्हा
तुला घालते साकडे -१.
आपल्याच सुखासाठी
सुटे जंगले कापत
पुढे काय वाढलेले
तुला नाही रे माहीत -२.
सारे लुटून नेलेस
मला केलेस उजाड
अजूनही तेच चालू
तरी नाही तुला चाड -३.
सर्व जंगले तोडिता
दिसू लागे मी भकास
नदी नाले झाले सुके
कसा होईल विकास -४.
माती लागली नरम
जरा जपून वागणे
कोपराने नको खणू
माझे एकच मागणे -५.
कसे रुजेल बियाणे
नदी,नाले माझी नस
सुकताच पाणी त्यांचे
कशी उजेल ही कूस -६.
तुला सांगते माणसा
होई थोडासा कंजूस
पाणी जीवन सर्वांचे
नको ओतू भसाभस -७.
आता दुसरे सांगणे
नको करू वृक्षतोड
वृक्ष सर्वांचा आधार
नाहीतर परवड -८.
समजून घेई थोडे
गढुळले हवामान
सृष्टीतल्या सजीवांचे
येई धोक्यात जीवन -९.
ऐक माझे एवढेच
मीही राहीन ऋणांत
हवा,पाणी आणि वृक्ष
भले तुझे जतनात -१०.
— रचना : श्रद्धा जोशी. डोंबिवली
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
