बातम्या सुन्न करणाऱ्या, काळजाचा दगड करणाऱ्या, अक्षरशः थिजवून टाकणाऱ्या आहेत.रोजच्या रोज बलात्कार होताहेत.लहान मुलींवर भीषण अत्याचार होताहेत.मुलगा बापाचा खून करतो,बाप मुलावर कुऱ्हाडीने वार करून प्राण घेतो,नवरा बायकोला जाळतो,आई मुलीचे प्राण घेते, नव विवाहिता नवऱ्याचा काटा काढते..अशा एकापेक्षा एक थरकाप उडविणाऱ्या बातम्या थांबतच नाहीत.शिवाय खरात सारख्या भोंदू बाबांचे प्रताप आहेतच सोबतीला..
अशा वेळी मनात विचार येतो,आपले संस्कार,आपले शिक्षण,आपली नीतिमत्ता कुठे गेली शेण खायला? आपण पाश्चात्य संस्कृतीला नावे ठेवत होतो.आपण तर त्यानाही लाजवेल अशा चिखलात,घाणीत फसलो.त्या एपेस्टिन की काय फायलीतले प्रकार इथेही सुरू आहेत दिवसा ढवळ्या आपल्या नाकावर टिच्चून पोलिस , कायदा,शासन या सर्वांच्या कर्तबगारीच्या चिंधड्या उडविणारे प्रकार रोजच्या रोज घडताहेत.अन् आपण थंड,निष्क्रिय षंढ वृत्तीने बघतोय फक्त.कुणीच काही करू शकत नाही? कुणीच हे थांबवू शकत नाही? आम्ही पिडीतांना न्याय देऊ, लवकरात लवकर आरोपींना शिक्षा देऊ,हेच ऐकत बसायचे आपण? इतकी खालची नैतिक पातळी कशी काय गाठली आपण?
लोकशाही आहे,आपलेच राज्य आहे, उत्तम संविधान आहे,शाश्वत विकासाच्या गप्पा आहेत, जगद्गुरु व्हायची स्वप्नं आहेत. सगळेच हास्यास्पद वाटते. शेंबडे पोरही विश्वास ठेवणार नाही आता कुणावर!अशा नराधमाना सामान्य कायदा, पुस्तकी न्याय चालणार नाही आता.वर्षानुवर्षे चौकशीचे, तपासणीचे गुऱ्हाळ हवे कशाला? सगळे काही सूर्य प्रकाशासारखे स्वच्छ आहे, स्वयं सिद्ध आहे. मग हा कायदा,हे कलम,ही कोठडी असे निरर्थक उपचार पाळायची गरज काय? सरळ एक दिवसात कोर्टात निर्णय घ्या.अन् गुन्हेगाराला सर्वांच्या देखत भर चौकात फाशी द्या. तत्पूर्वी त्याची धिंड काढा. ज्यांच्यावर अन्याय झाला त्या कुटुंबीयांना आपला रोष व्यक्त करण्यासाठी आरोपीला फटके मारण्याची,जोडे मारण्याची संधी द्या.हे क्रूर वाटेल.बेकायदेशीर वाटेल. पण अशी टोकाची भूमिका घेऊन दशहत निर्माण करणे गरजेचे झालेय आता.
तरुण मुले बेभान झाली आहेत. नशेच्या आहारी जाताहेत. पाश्चात्य संगीताच्या कन्सर्ट मध्ये दारू पिऊन, नशेच्या धुंदीत धिंगाणा घालताहेत.त्यात सभ्य समाजातील सुशिक्षित (?) मुली आहेत.हे सगळे कुणाच्या परवानगीने चालते? पोलिस गृहखाते अशा वेळी कुठे काय करीत असते ? हीच मुले नंतर आपल्या कारखाली माणसे चिरडून फरार होतात. निरपराध गरिबांचे जीव जातात. अन् हे पैशाच्या, सत्तेच्या,जोरावर सही सलामत सुटतात.समाजात उजळ माथ्याने मिरवायला मोकळे होतात !
तरी आपण म्हणतो आपली कायदा, सुव्यवस्था उत्तम आहे?दिवसा ढवळ्या कोयता गँग आपले प्रताप दाखवत नंगानाच करते.लोकांचे जीव जातात.संपत्तीचे नुकसान होते. मग ती पोलिस गस्त,ती सुरक्षेची हमी, ते दक्ष गृह खाते नेमके कुठे असते अशा वेळी ?
पोलिस खात्याचा देखील नाईलाज असतो. मंत्री, खासदार, आमदार,उच्च अधिकारी यांच्या सुरक्षेत हा फौजफाटा असतो.कशाला हवी एव्हढी सुरक्षा या व्ही आय पी मंडळीना ?.कोण खाणार आहे यांना ? साधा माणूस समाजात निश्चिंतपणे वावरतो.मग हे तर समाजसेवक म्हणतात ना स्वतःला? सगळ्यांनी ही सुरक्षा स्टेट्स सिम्बॉल न समजता नाकारावी. पोलिसांना आपले नेमून दिलेले कायदा सुरक्षा सांभाळण्याचे काम करू द्यावे.अवतीभवती सशस्त्र पोलिस वावरताना दिसले की थोडीतरी दहशत निर्माण होईल.या नेते मंडळींनी जितका मोठा फौजफाटा तितका नेता मोठा या संभ्रमातून, गैर समजुतीतून बाहेर पडले पाहिजे.
आता खरात चे उदाहरण घ्या.त्याने केलेले गुन्हे, अत्याचार, गैर व्यवहार सगळे सूर्य प्रकाशासारखे स्वच्छ आहे. मग इतके दिवस हा गुन्हा, तो गुन्हा, ही चौकशी, ती चौकशी, हे न्यायालय ते न्यायालय, अशी नाटके करत विनाकारण वेळ,सरकारी पैसा खर्च करण्याची काय गरज आहे ? आधी भर चौकात फाशी देऊन त्या नराधमाचा निकाल लावा.त्याआधी ज्यांना त्याने फसवले त्यांना हवे तर त्याला फटके मारण्याची संधी द्या. तेही सर्वांसमोर.म्हणजे उद्या दुसरे कुणी असे गुन्हे करण्यापूर्वी दहादा विचार करेल!अशा बलात्कार, महिलांवर मुलींवर अत्याचार करणाऱ्याच्या मनात आधीच दहशत निर्माण झाली पाहिजे.नशेच्या आहारी जाणारी मुले,दारूच्या नशेत अपघात करणारी श्रीमंतांची धेंडे, सरकारची आर्थिक फसवणूक करणारे दादा, आका..यांना देखील ताबडतोब धडा शिकवला पाहिजे.एरवी ही मंडळी कोर्ट कचऱ्यात सबळ पुराव्या अभावी सहज सुटतात. आताचा आरोपी देखील आधी पकडल्या गेलाय.पण पुरावा नसल्याने सुटका झाली म्हणे ! खरात च्या बाबतीत देखील ते झाले आहे. आधीही त्याच्यावर आरोप झालेत. पण सरकारी लागेबांधे,अन् नेतेच पायी लोटांगण घालत असतील तर सही सलामत सुटले नाही तरच नवल!
खरात चे प्रकरण अनेक वर्षापूर्वी एका पत्रकाराने उघडकीस आणले.तेव्हा पोलिसांनी काय केले? गृहखाते गप्प का बसले? याचीही चौकशी करा अन् याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणाऱ्यावर कारवाई करा. डान्स बार, म्युझिकल कन्सर्ट,पार्ट्या यात काय चालते हे पोलिसांना माहिती नसते का ? मग ते आग लागल्यावर विहीर खोदण्याचे नाटक का करतात ? याचेही उत्तर मिळाले पाहिजे.
मुळात आपली शिक्षण व्यवस्था,आपले नैतिक संस्कार, आपले पालकत्व कुठे कमी पडते आहे? आपल्या पोलिस यंत्रणेत काय उणिवा आहेत.जलद न्याय देण्याच्या दृष्टीने कायद्यात काय सुधारणा करता येतील,यात समाजाची जबाबदारी काय ,आपल्या एकूणच अवस्थेत कुठे कुठे लूप होल्स आहेत.. हे सगळे गांभीर्याने, जलद गतीने तपासून त्यावर ऍक्शन घेणे आता अत्यावश्यक आहे. कारण डोक्यावरून पाणी चालले आहे. सगळी व्यवस्था अनियंत्रित झाल्यासारखी, हतबल झालेली दिसते आहे. हे करोना, कॅन्सर पेक्षाही भयानक रोग आहेत. सगळी सभ्यता, समाजव्यवस्था दुबळे करणारे हे भयंकर विषाणू आहेत.याकडे दुर्लक्ष होत काम नये. फक्त सरकारवर टीका करून स्वस्थ बसता येणार नाही आपल्याला.ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.प्रत्येक व्यक्तीची, कुटुंबाची जबाबदारी आहे. याकडे आता तातडीचा राष्ट्रीय आपत्कालीन प्रश्न म्हणून गांभीर्याने पाहिले पाहिजे. एरवी आपली सभ्यता समाजव्यवस्था रसातळाला जायला वेळ लागणार नाही.
— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैद्राबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

वाढती गुन्हेगारी सुंदर विचार करायला लावणारा lekh 👌