जागतिक पर्यावरण दिन 5 जून 1973 पासून साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख…
जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे, मानव जातीला पर्यावरणाविषयी जागरूक करून पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, संवर्धनाविषयी जागृकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा आहे.
पर्यावरणाच्या व्याख्या तर अनेक आहेत. विज्ञानाच्या अभ्यासक्रमात तसेच भूगोलाच्या दृष्टिकोनातून पर्यावरणाची व्याख्या बदलते. परंतु ढोबळमानाने व्याख्या बघितली तर ती “आपले सभोवतालचे वातावरण म्हणजे पर्यावरण होय.”
“सजीवांच्या नैसर्गिक परिवारास पर्यावरण असे म्हणतात.”
“पर्यावरण म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे पर्यावरण”. यात सर्व प्रकारचे नैसर्गिक घटक जसे पाणी, हवा, जमीन, प्रकाश, जंगले, प्राणी, झाडे इत्यादी या सर्वांचा समावेश पर्यावरणाच्या अंतर्गत येतात.
आपल्या जीवनात पर्यावरणाला अमर्याद महत्व आहे. हिरवीगार झाडे व वनस्पती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गाशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच आपण करू शकत नाही. पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून राहण्यासाठी पर्यावरण ही निसर्गाने दिलेली अमूल्य भेट आहे. पर्यावरणामुळे आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होतात.
मानवी जीवनाच्या उज्वल भविष्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी अधिकाधिक झाडे लावावी लागतील. पर्यावरणाच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. वृक्षतोड थांबवली पाहिजे. पर्यावरण पूरक विकासाला चालना दिली पाहिजे.
मानव निर्मिती आणि प्राकृतिक अशा सर्व ठिकाणी पर्यावरण सामावलेले आहे. पर्यावरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. पर्यावरणातील वातावरणामुळेच मानव आणि इतर प्राण्यांचे जीवन शक्य आहे. पर्यावरणात जर मानवाने समतोल राखला तर मानवजात टिकून राहील.
जगातील वातावरण दिवसेंदिवस सतत दूषित होत आहे. त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत आहे.
आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करून चालणार नाही. त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला नैसर्गिक प्रकोपामुळे जाणवला आहे.हे लक्षात घेऊन, आपण झाडे लावून ते जगण्यासाठीची मोहिम राबवू या तसेच पाण्याचा गैरवापर थांबवू या. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करण्यासाठी एखाद्या संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचवण्यासाठी विविध उपक्रम राबवू या आणि या माध्यमातूनच जनजागृती करू या. पर्यावरणाचा समतोल राखून खऱ्या अर्थाने समृद्ध भारत या दिशेने वाटचाल करू या.
झाडे लावा, झाडे जगवा, देश वाचवा.
पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
– लेखन : प्रियांका देशपांडे
एमजेएमसी विद्यार्थिन. नाशिक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🪴🌴🌱🦚🌳🏞️🌳🦚🌱🌴🪴