मिळ ’तॉई’, ना !
विशाखाच्या सासूबाईंनी संक्रांतीचे हळदीकुंकू संक्रांतीच्या दिवशीच ठरवले. विशाखाला संक्रांतीची सुट्टी असते.
सतत पालुपद होते, “तुला सोयीचे म्हणून, हो. तुला रजा घ्यायला नको म्हणून हो. सणवार करायला हवेत म्हणून, हो.”
एके काळी सासूबाई नोकरी करणाऱ्या होत्या. आता सासूच्या भूमिकेत शिरल्या आहेत, त्यामुळे शब्द जाणीवपूर्वक ठासून बोलत असतात.
हळदीकुंकू, भरजरी साड्या, लफ्फेदार दागिने ह्या कसल्याही गोष्टींची विशाखाला बिलकुल हौस नाही. विशाखा कबड्डी प्लेअर आहे. त्या गुणवत्तेवर तिला नोकरी मिळाली आहे. तिच्या टॉमबॉय व्यक्तिमत्वावर भाळून विश्वासने तिला मागणी घातली आहे. केस घट्ट बांधते ती. सुटसुटीत कपडे घालून चपळपणे वावरणे आवडते तिला. कानात साधे, इवलेसे स्टडस् ! अगदी जेमतेम कानाचे छिद्र झाकले जाईल असे.
त्यामुळे काळी चंद्रकळा, लांब बाहीचे ब्लाऊज तिचा जीव घुसमटला. कल्चर्ड मोती आणि पोवळे जडवलेला सेट घालून झाल्यावर ती मनाशी म्हणाली, “जड झालं ग बाई !”
एवढ्याने काय होतंय ! संक्रांतीचे पहिले हळदीकुंकू. सासूबाईंच्या बहिणीने, म्हणजे मावससासूबाईंनी हलव्याचे दागिने ‘’घssर्री ‘ करून आणले होते. वाकी सकट ! सोन्याचे मंगळसूत्र आज मोठे दोन चेनवाले घाल म्हणाल्या. पोळ्याचा बैल झाल्यासारखे वाटले विशाखाला.
करते काय ! सासूबाईंची हौस !
हलव्याची वाकी घालून झाल्यावर विश्वसुंदरी घालते तसा हलव्याचा मुकुट दिला मावससासूबाईंनी. त्या सुंदऱ्यांचे बरे आहे, कपडे असे तोकडे असतात की जराही उकडत नाही !
असं तिच्या मनात येतं आहे, तर सासूबाई म्हणाल्या, “अगं हलव्याची वाकी बघून आठवण झाली, अस्सल सोन्याची वाकी आहे !“ त्यांनी तिजोरी उघडली आणि वाकी आणली.
“हलव्याची वाकी थोडी वर सरकव आणि ही खाली दिसू दे. दीडशे वर्षांपूर्वीची जड वाकी आहे. लग्नात मी ही काढली नाही बाहेर ! डोळे दिपतात, आलेल्या मुलीचे !”
गोल्ड मेडल मिळवण्यात रस असलेल्या मुलीला ह्याची काहीही गरज नसताना त्या ऐकवत होत्या.
जणू कबड्डीची पार्टी ओलांडून प्रतिस्पर्धी आत, घरात आला. आता त्याला चीत करायचेच ! ती ऐकून घेते आहे म्हटल्यावर त्यांना आपण बरोबर वागत आहोत असा आत्मविश्वास आला. त्यांचे असमंजस बोलणे विशाखाला सहन होत नव्हते. पण मावससासूबाईं समोर होत्या. तिनं संयम ठेवला.
वाकी घातल्यावर, “दमले बाई !” असे विशाखा पुटपुटली. तिचा चेहरा तर असा त्रस्त झाला होता की, अत्याचार सहन करते आहे जणू !
सासूबाई मावससासूबाईंना दात ओठ खात म्हणाल्या, “तोंड वाकडे म्हणजे काय ! मिळतंय ना !”
मिळतंय मधल्या ‘त‘ वर विशेष जोर देऊन. उच्चारी मिळ‘तॉई’ ना ! त्या विशिष्ट उच्चारण्याचा अर्थ असा की सहज मिळालं की किंमत नसते, उलट माज असतो.
हळदी कुंकू समारंभ आटोपला. विश्वासचा मावसभाऊ आपल्या आईला घेऊन गेला.
“गुळाच्या पोळीपासून सगळे उरले आहे. खिचडीसुद्धा टाकू नकोस, विशाखा.”
“जेवणाआधी मला बोलायचे आहे. आई, बाबा, विश्वास सगळे बसा समोर.”
त्यांना अंदाज आला, ही सून तिच्या मनाविरुद्ध बैलासारखी सजली, आता शिंगं उगारणार आहे.
“अगं थांब भात, भाजी गरम करते.” असं म्हणत सासूबाई आत सटकू लागल्या. पण विशाखांनं स्वतः बैठक मारली आणि हुकुमात सांगितलं, “इकडे या.बसा सगळे.”
“लग्न होऊन इथं आले मी, सहा महिने झाले. मी मिळवती आहे. आल्यावर माझं कॉन्ट्रिब्यूशन देते, म्हणून सांगितलं. तुम्ही नाही म्हणत राहिलात. ताटात काय, नि वाटीत काय, एकुलता एक मुलगा त्याची एकुलती बायको ! असं म्हणालात. ऐकायला मला गोड वाटलं. पण सहा महिने महागाई, वाढती बिलं ऐकवत राहिलात. मी प्लेअर आहे. पौष्टिक खाते. ह्या ना त्या शब्दात सुनावत राहिलात. तसं करू नका. पैसे स्पष्ट बोलला असतात, तर बरं झालं असतं. मी विश्वासकडे देत असते पैसे.
तो बोलला नाही का ?“
“आज ‘तिळगुळ घ्या गोड बोला‘चा दिवस आहे…” त्या उत्तर टाळू लागल्या.
“हो का ? मग मिळ‘तॉई’ ना असं आहे, असं का म्हणालात ?“ सासूबाई गप्प राहिल्या.
“मावससासूबाईं समोर मी उद्धट बोलायला हवं होतं का ? तसं नको असेल तर, तुम्ही पण सांभाळत चला.
मी विश्वासजवळ एकही चहाडी केलेली नाही. तुम्ही तिघे कुटुंबातले आधीचे सदस्य आहात, म्हणून तिघांना एकाच वेळी सांगते. तिघेही ठरवा. काय, कसं वागायचं ते. मला माझा अपमान झालेला चालणार नाही आणि मी असली गाऱ्हाणी घेऊन माझ्या आईवडिलांकडे जाणार नाही. कुटुंब म्हणजे टीम वर्क असतं. एकत्र, एक दिलांने राहिलं तर विजय आपलाच होतो. पराजय झाला तरी, एकत्र असल्याने तो हरल्याची भावना देत नाही. मी साडी बदलते आणि मगच अन्न गरम करते आणि हो, इतके बोचणारे कपडे, दागिने मला आवडत नाहीत. तुमचा मान राखायला म्हणून मी घातले. उपकार नाही सांगत. तुम्हाला माहीत असूदे.”
विशाखा म्हणाली ते खरं आहे. कुटुंब म्हणजे टीम वर्क असतं. एकत्र, एक दिलांने राहिलं तर विजय आपलाच होतो. पराजय झाला तरी, एकत्र असल्याने तो हरल्याची भावना देत नाही ! त्यांनाही माहीत असेल हे. पण सासूज्वर अंगात शिरला की ह्या गोष्टी नाही लक्षात येत.
कोणी म्हणेल आता नसतो, हा सासूज्वर. सासू हेच नाते हवे असे नाही. कोणत्याही नात्यात असतो हा ज्वर ! डॉमिनेशन म्हणजे दादागिरी, सासूगिरी. थोडी चालवून घेता येते. मात्र अति केलं की विकृती ठरते. घरी, ऑफिसमध्ये, कोणत्याही ग्रुपमध्ये टीमवर्क असते. आपण तो ज्वर बाळगू नये आणि सहनदेखील करू नये.
क्रमशः:
— लेखन : वसुंधरा घाणेकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
