“पालवी“
आज माझ्या आयुष्यातील एक अत्यंत भावनिक, अंतर्मुख करणारा आणि आत्म्याला स्पर्शून जाणारा दिवस होता. पवित्र पंढरपूर नगरीत असलेल्या पालवी या सेवाभावी संस्थेला भेट देण्याचा योग आला… आणि खरं सांगायचं तर ही फक्त एक भेट नव्हती, ती एक अनुभूती होती… एक जागृती होती… एक अंतर्मन हलवून टाकणारा प्रवास होता.
सन 2001 साली समाजातील अत्यंत वेदनादायी वास्तवातून एचआयव्ही बाधित निराधार बालकांसाठी महाराष्ट्रातील पहिला संगोपन प्रकल्प म्हणून पालवीची सुरुवात झाली. आज या प्रकल्पाने आपला रौप्य महोत्सव साजरा केला आहे. एका छोट्याशा रोपट्याप्रमाणे लावलेली ही पालवी आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाली आहे.

सध्या या प्रकल्पामध्ये एक महिन्याच्या बालकापासून ते 30 वर्षांपर्यंतची जवळपास 150 मुले प्रेमाने, सुरक्षिततेने आणि सन्मानाने जीवन जगत आहेत. ही मुले कुठून आलीत माहिती आहे का ?
कचराकुंडी…
एस.टी. स्टँड…
रेल्वे स्टेशन…
स्मशानभूमी…
आरोग्य केंद्र…
पोलीस स्टेशन…
ज्या ठिकाणी आयुष्य संपल्यासारखं वाटतं, तिथून ही निरागस जीव पालवीमध्ये येतात… आणि इथे त्यांना नवजीवन मिळतं. इथे त्यांना फक्त आसरा नाही, तर मुक्त, सन्माननीय आणि प्रेमळ आयुष्य दिलं जातं.
या संपूर्ण सेवायज्ञामागे उभी असलेली महान व्यक्ती म्हणजे सौ. मंगलताई शहा. त्यांचं कार्य, त्यांचा त्याग, त्यांची सेवा… शब्दांच्या पलीकडचं आहे. दररोज जवळपास 150 गरजू लोकांना रेल्वे स्टेशन, बसस्टँड आणि हॉस्पिटल परिसरात स्वतःच्या हाताने बनवलेलं अन्न त्या देतात. म्हणूनच आम्ही त्यांना प्रेमाने “अन्नपूर्णा” म्हणतो.
त्यांच्या आयुष्यावर आधारित “आणि ते मंगल झाले” हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. – आणि खरंच, त्यांच्या स्पर्शाने प्रत्येक दुःख मंगल होतं, प्रत्येक वेदना पवित्र बनते. त्यांच्या सोबत त्यांची मुलगी सौ. डिंपल घाडगे आणि संपूर्ण परिवार या सेवेत कार्यरत आहे. आजच्या काळात संपूर्ण कुटुंबाने स्वतःला समाजकार्यासाठी समर्पित करणं हे फार मोठं उदाहरण आहे.
पालवी फक्त एक बालसंगोपन केंद्र नाही, तर एक सर्वांगीण विकासाची कार्यशाळा आहे. सध्या येथे खालील प्रकल्प राबवले जात आहेत :
1️⃣ एचआयव्ही संगोपन व पुनर्वसन
2️⃣ पालवी ज्ञान मंदिर शाळा (इयत्ता 1 ली ते 10 वी – 100% निकाल)
3️⃣ पालवी क्रिएशन – गोधडी, पर्सेस, हँडबॅग उत्पादने
4️⃣ निराधार महिलांना आधार
5️⃣ गरज त्याला आसरा
6️⃣ मेडिकल केअर युनिट
7️⃣ गोशाळा प्रकल्प
8️⃣ पालवी अंकुर प्रकल्प
2007 साली सुरू झालेल्या शाळेमध्ये सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, ई-लर्निंग, वाय-फाय, प्रयोगशाळा अशा सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर आत्मविश्वास, संस्कार आणि स्वाभिमान निर्माण करणारी प्रक्रिया आहे – आणि पालवी हेच काम करत आहे. सध्या जवळपास 400 मुले, मुली आणि निराधार महिला या कुटुंबाचा भाग आहेत.
आज त्या निरागस मुलांच्या डोळ्यांत पाहताना मला एकच गोष्ट जाणवली – आपण किती भाग्यवान आहोत ! आपल्याकडे घर आहे, कुटुंब आहे, सुरक्षितता आहे…पण या मुलांकडे काय होतं? काहीच नव्हतं… आणि तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. का ? कारण त्यांना मंगलताईंच्या मायेचा हात मिळाला आहे.
खरंच, अशा त्यागमूर्ती लोकांमुळेच हे जग चाललं आहे.जगात अजूनही मानवता जिवंत आहे, कारण कुठेतरी एखादी मंगलताई दिवसरात्र झटत आहे.
भविष्यात किमान 500 बालकांसाठी निवासी प्रकल्प उभारण्याचं स्वप्न साकार होत आहे. हे स्वप्न फक्त मंगलताईंचं नाही, तर आपल्या सर्वांचं आहे. जर आपण प्रत्येकाने थोडासा हातभार लावला, तर ही पालवी अधिक बहरून येईल. माझे मनापासूनचे आवाहन माझ्या सर्व मित्रपरिवाराला, बांधवांना आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे – जर शक्य असेल तर या पवित्र कार्याला मदतीचा हात द्या.आर्थिक मदत, वस्तू स्वरूपातील मदत, वेळेची मदत… काहीही. कारण इथे दिलेला प्रत्येक रुपया एका बालकाच्या आयुष्याला नवी दिशा देतो. इथे दिलेला प्रत्येक घास एखाद्या उपाशी पोटाला समाधान देतो. इथे दिलेली प्रत्येक भेट एखाद्या जीवाला आशेचा किरण देते.
या लेखाच्या माध्यमातून मी सौ. मंगलताई शहा, सौ. डिंपल घाडगे मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. तुमचे कार्य म्हणजे सेवा, तुमची सेवा म्हणजे साधना आणि तुमची साधना म्हणजेच ईश्वरभक्ती. तुम्ही खरोखरच मानवतेचे दीपस्तंभ आहात.
मित्रांनो, आज पंढरपूरच्या भूमीत मला विठ्ठलाचं दर्शन मंदिरात नाही, तर पालवीच्या प्रांगणात झालं. त्या प्रत्येक मुलामध्ये मला देव दिसला. त्या दिवशी ती पण प्रत्येक सेवेमध्ये मला पूजा दिसली… आणि त्या प्रत्येक अश्रूमध्ये मला करुणेची गंगा वाहताना दिसली. चला, आपण सर्व मिळून या सेवायज्ञाचा भाग बनूया. पालवीला साथ देऊया.
कारण कुणाचं तरी आयुष्य बदलण्याची संधी आपल्याला रोज मिळत नाही.
— लेखन : महेबूब कासार. निवृत्त उपायुक्त, वस्तू व सेवाकर विभाग, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 98694 84800