Home लेख सहज सुचलं म्हणुन ( ८ )

सहज सुचलं म्हणुन ( ८ )

1

शॅडो डान्स
परवा अचानक लाईट गेले. रात्रीची वेळ. एकदम अंधार झाला. नवरा कामानिमित्त बाहेर गेलेला. कपड्यांचं सेल्फ आवरत होते. आमच्या एरियात साधारण १ मिनिटांच्या वर लाईट जात नाही. म्हणून अंधारातच, आहे तिथे बसून राहिले. दोन मिनीट झाले, पाच मिनिट झाले पण आज नेहमीसारख घडलं नाही. लाईट परत येण्याचा पत्ता नाही.

आधी धडपडत फोन शोधला आणि त्याचा टॉर्च ऑन केला. आणि मग कपाळाला हात मारला. कारण अचानक असे लाईट गेलेच, तर नवऱ्याने इमर्जन्सी लाईट सोयीच्या ठिकाणी लावून ठेवले होते. पण पार विसरले होते. त्याला आल्यावर सांगितलं तर त्याला मोठ हसायला आलं आणि त्यानेच आठवणीने रात्र झालं की इमर्जन्सी लाईट लावून ठेवायला सुरुवात केली. for a safer side..

लहानपणी आम्ही छोट्या गावात राहायचो. लाईट केंव्हाही जाईल, हे माहिती असायचं. संध्याकाळ झाली की चिमण्या, कंदील मध्ये रॉकेल भरून ठेवणे, काचा रांगोळीने स्वच्छ करून ठेवणे. हे आईचे उद्योग सुरू व्हायचे. अगदी सुरुवातीला रस्त्यावर दिवे रॉकेल चे असायचे. संध्याकाळी लांब काडीने ते पेटवले जायचे. रात्री शेवटची बस येऊन गेली की त्यानंतर साधारण एक दोन तासांनी ते विझायचे.

नंतर पिवळे बल्ब आले होते. गावात त्याचा प्रकाश खूप वाटायचा तेंव्हा. आधीच्या दिव्यांच्या तुलनेत.
रात्री कंदिलाच्या प्रकाशात आमचे जेवण असायचे. जेवण आटोपल्यावर त्या प्रकाशात सावल्यांचा खेळ चालायचा. हाताच्या बोटांनी हरीण, हत्ती असे वेगवेगळे आकार करायचे आणि त्याच्या सावलीवर गोष्ट तयार करून, एकदा गोष्ट सांगितली आणि आई अन पपानी खूप कौतुक केलं.

रोज रात्री मला आणि माझ्या लहान भावाला पपा गोष्ट सांगायचे. त्याशिवाय आम्ही झोपत नव्हतो. तीच सवय नंतर माझ्या लेकाला लागली.
मग पपा गोष्ट सांगायला लागले की त्या सावल्यावर हाताचे आकार करायचे. हे सगळं आपल्या पिढीतील बऱ्याच जणांनी नक्कीच केला असेल. खरंच किती छोट्या छोट्या गोष्टीतून पूर्वी करमणूक व्हायची ना ?.
खूप दिवसांनी यू ट्यूब वर शाडो डान्स पाहिला आणि लाईट गेल्याचे निमित्त होऊन बालपणात फेरफटका मारून आले.

क्षमा प्रफुल

– लेखन : क्षमा प्रफुल. नवी दिल्ली
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version