Home लेख “सामाजिक नीतिमत्ता”

“सामाजिक नीतिमत्ता”

0

नैतिकता आपल्या संस्कृतीचे सौंदर्य आहे. ते आपल्याला समाजात कमी जास्त प्रमाणात बघायला‌ मिळतंच. योग्य अयोग्य यातील फरक समजून घेऊन, सारासार विवेकबुद्धीने आणि मानवी मूल्यांनुसार आचरण करणे म्हणजेच नीतिमत्ता.

काळानुसार जगातील मूल्यांचे स्वरूप आणि रहाणीमान बदलले आहे. त्यानुसार सामाजिक नीतिमत्ताही कुशी बदलू पहात आहे. ही नीतिमत्ता ढासळण्याची अनेक कारणे आहेत.

एकतर, सोशल मीडिया आणि बातम्या जास्त करून सतत जगाची किंवा माणसाची नकारात्मक बाजूच दाखवत आहेत. त्याचा परिणाम सामान्य माणसांवर होऊन, समाजात वाईटच गोष्टी घडत आहेत हा त्यांचा समज होतो.

दुसरं, आजचे युग प्रगतीचा जरी असला तरी माणूस सतत पैश्यासाठी धावत असताना दिसतो आणि स्वतःच्या भोवतीच फिरत, विचार करत असतो.

तिसरं, लोकांचे दृष्टिकोन आणि नैतिकतेचे मापदंड बदलले आहेत. जुन्या रूढी परंपरांच्या जागी व्यावहारिक दृष्टी अधिक आलेली दिसते. प्रत्येकाला आपलं व्यक्तिस्वातंत्र्य अधिक प्रिय वाटू लागलं आहे. संवादाचा अभाव वाढत चालला आहे. जुळवून घेणं ही बाबही शेवटचा श्वास घेते आहे असं वाटायला लागलंय.

हे सगळं जरी असलं तरी सामाजिक नीतिमत्तेवर चर्चा करून लेख लिहून काही बदलणार आहे का ? याचाही विचार करायला हवा.

“One can guide others but one cannot guide oneself“

आपण आपलीच वागणूक पडताळून बघायला हवी. दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतःच्या वर्तनात सचोटी आणि जबाबदारीची भावना ठेवणे गरजीचं आहे. या सर्वांची सुरुवात आपल्या घरातूनच करायला हवी.

“Charity begins at home.” म्हणतात ना तसंच.

मोठे कसे वागतात याचं सूक्ष्म निरीक्षण मुलं करत असतात. मुलांना काय कळतं ? हे म्हणणे धादांत खोटे आहे. घरातील संवाद, घरातल्यांची भाषा, हावभाव सगळं ते टिपत असतात. घरात एकमेकांची, एकमेकांशी वागणूक त्यांना बरंच काही शिकवून जाते.

आपण सहलीला जातो. तिथे जर आपण खाऊन संपवलेले पैकेट, फळांची सालं तशीच टाकून कचरा करून आलो तर‌ हे मुलांच्या नजरेतून सुटेल असं वाटतं का ?
घरात विजेचे दिवे लावून, नळ धोधो‌ सोडून काम करणं कितपत योग्य आहे ? घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्यांबरोबरची आपली वागणूक यातून‌ही आर्दश स्थिपित होत असतो.
घंटागाडी दाराशी येते पण त्यावेळेस “मी कामात असते” म्हणून आपल्या सोयीनुसार कचरा बाहेर टाकून घर स्वच्छ ठेवणं हे नियमांना धाब्यावर बसवणं नाही का ?

मला देशाने/ समाजाने काय दिलं ? हे म्हणण्यापेक्षा मी देशाला/समाजाला काय दिलं‌ ? हा प्रश्न आपण स्वतः स्वतःलाच कधी विचारतो का ? नाही ? तर विचारायला हवा साधे साधे नियम पाळणे‌ आपल्याकडून होत नाहीत. रस्त्यांवर पाट्या लागल्या असतात. गाडीची गती अमुक प्रमाणात ठेवा पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अनेकदा उलट दिशेने गाडी नेतो कारण जरासंच जाऊन आपलं इच्छित ठिकाण येणार आहे. नंतर अपघात झाला की नावं ठेवायला मोकळे.

आपणच घरात मुलांना असं वातावरण दिलं पाहिजे की ज्याने ते आपलं मन मोकळं करू शकतील. मनातले सारे काही त्यांना आपल्या पालकांकडे बोलता आले तर त्यांची घुसमट न‌ होता ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत.

आपल्या मुलांना चूक केल्यानंतर पाठीशी न घालता, त्यांना प्रेमाने ती चूक निदर्शनास आणून दिली तर पुढे ते कोणतीही चूक करायला धजावणार नाहीत.

एका चोराची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहितच आहे, जो सतत चोऱ्या करत रहायचा आणि जेव्हा मोठ्या चोरीत तो पकडला गेला आणि त्याची आई त्याला भेटायला आली तेंव्हा त्याने तिलाच म्हटलं, “जर तू‌ पहिल्याच चोरीच्या वेळेस मला सावध केलं असतंस, तसं करण्यापासून रोखलं असतंस आणि मला पाठीशी घातलं नसतंस तर आज मी जेलमध्ये नसतो.”

आजकाल घरोघरी एक किंवा दोन मुलेच असतात आणि आई वडील त्यांना लाडाकोडात वाढवतात. कधी कधी हे लाड अती होतात. मुलांना वाटायला लागतं, मी म्हणेन तीच पूर्व दिशा. हीच सवय समाजासाठी घातक ठरते. कारण‌ ही मुलं समाजातही बेछूट वागतात आणि दुसऱ्याचे आणि स्वतःचे नुकसान करून बसतात. घराण्याला काळिमा‌ फासतात. घरातूनच त्यांना योग्य अयोग्य यात अंतर करण्याचे संस्कार मिळाले तर पुढे ते तसं वागणार नाहीत. मुलांचे लाड अवश्य करावे पण त्याला एक सीमा आपणच घालून द्यायला हवी.

किशोरावस्थेत तर पोरांकडे आई वडिलांनी बारीक लक्ष ठेवायलं हवे पण तो ‘पहारा’ वाटायला नको. ते सतत गुपचुप फोनवर बोलत असतील तर सावध व्हावे. त्यांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत ? हे घरातील लोकांना माहित असायला हवे. जर घरात मुलं/मुली आपल्या मित्रांबरोबर बोलत असतील तर त्यांच्या बोलण्यातल्या विषयांकडे लक्ष ठेवायला हवं. हे सर्व करताना मुलांवर अविश्वास दाखवतो आहोत हे त्यांना वाटायला नको याची खबरदारी घेतली पाहिजे.

श्रीमंत होण्याची स्वप्ने बघणे वाईट नाही पण ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत, त्यासाठीचे कष्ट हे देखील करायला कोण शिकवणार. घरचेच ना? पण घरचेच जर लाच लुचपत घेत असतील तर मुलांना काय शिकवणार ?

मागे टी. व्ही वर एक संदेशवजा जाहिरात दाखवायचे. वडील ऑफिसच्या काही फाईल्स बघत‌ बसले आहेत. प्रत्येक फाईलमध्ये काही नोटा आहेत. वडील त्या नोटा आपल्या खिशात टाकतात आणि फाईलवर साईन करून बाजूला ठेवतात. मुलगा रोज हे बघत असतो. एक दिवस तो मुलगा आपलं प्रगतीपत्र वडिलांपुढे ठेवतो. वडील ते उघडून बघतात‌. त्यात दहाची नोट ठेवलेली असते. वडील रागावून विचारता हे काय आहे ?
मुलगा म्हणतो “बाबा ! माझा निकाल चांगला लागला नाही. तुम्ही रागवाल म्हणून मी ऑफिसच्या फाईल्सची युक्ती वापरली.” वडील स्तब्ध होऊन बघत रहातात आणि त्यांना आपली‌ चूक समजते.
ही फक्त एक जाहिरात नसून एक संदेश आहे. घरात जे कराल त्यांचे पडसाद पोरांपर्यंत पोहोचतीलच. लवकर पैसा मिळावा म्हणून भ्रष्टाचार बळावत चाललाय. पैसा मिळवणे हे आयुष्याचे एकमेव ध्येय नाही हे घरा घरातून मुलांच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे.

आज समाज खूप सुसंस्कृत झाला आहे असं आपण म्हणतो पण अजूनही मुलींकडून हुंडा अपेक्षित असतो. हा हव्यास का? समाजात मिरवता यावं म्हणून की आपल्याला जे शक्य झालं नाही ते मुलीवाल्यांकडून शक्य करून घ्यावं म्हणून ? ही मानसिक विकृती प्रत्येक घरातून मुळासकट उपटून काढायला स्वतः घरच्यांनीच प्रयत्न करायला हवेत.

आपल्या शेजारच्या घरात काही गैर होताना बघताच गप्प न बसता ही सूचना संबंधित विभागाकडे पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे. आजकाल माहिती देणाऱ्याचे नांव गुप्त ठेवण्याची खबरदारी घेतली जाते तेव्हा घाबरण्याचे कारण नसते.

रस्त्यांवर मारहाण होते आहे हे बघताना, एखाद्या मुलीची छेड काढली जात आहे हे दिसत असताना आपणच जर त्यांच्या मदतीला धावलो तर ? हे ही खरं की अशा वेळेस आपल्या जिवाला धोकाही असतोच पण जवळच्या चार लोकांची साथ घेऊन आपण प्रयत्न तर करूच शकतो किंवा संबंधित विभागाला फोन करून सूचना देऊ शकतो.

रस्त्यांवर अपघात झाल्यावरही माणसं मदतीला जाण्याचं टाळतात कारण नंतर पोलिसांच्या तपासणीला तोंड देणं धोक्याचं वाटतं. ते खरंच आहे पण मग सार्वजनिक फोनवरून किंवा एखाद्या दुकानावरून फोन करून एंबुलेस मागवता येऊ शकते. तसेही आजकाल अनेक हॅल्पलाईन नंबर दिलेले असतात त्यांचाही उपयोग करू शकतो.

सारांश‌ हाच की आपण समाजिक नीतिमत्ता पाळायचे ठरवले तर एक पाऊल तर नक्कीच उचलू शकतो. नुसतं समाजात काय चाललंय, समाज रसातळाला चाललाय, समाजात नीतिमत्ता नावाची गोष्टच उरलेली नाही हे घोकत बसण्यात काही अर्थ नाही. या प्रकाराला “नपुंसक आक्रोश” हेच म्हणू शकतो.

पण आपण आपल्या आचरणातून सामाजिक नीतिमत्ता जोपासण्यासाठी खारीचा वाटा जरी उचलला तरी खूप आहे.
कृतीतून ते दाखवायला पाहिजे मगच बोलण्याचं सार्थक होतं.
“बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.”
उपदेश न देता वागणूकीतून ते दिसायला हवं. एक आदर्श उपस्थित करता यायला हवा.

म्हणून…
“यथा चित्तं तथा वाचो यथा वाचस्तथा क्रिया
चित्ते, वाचे, क्रियायांच साधुनामेकरूपता ।।”

जे मनात आहे तेच वाणीतून उतरायला हवं. जे बोलता तशीच क्रिया करा म्हणजे तसं वागा. मनात, बोलण्यात आणि कार्यात एकरूपता सत्पुरुषांमध्ये दिसून येते.

असाच जर समाजाचा प्रत्येक घटक वागू लागला तर‌ सामाजिक नितीमत्ता जोपासणं म्हणजे ‘हवेत तीर मारणं’असं रहाणार नाही.

राधा गर्दे

— लेखन : राधा गर्दे. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version