होळी

1

माघी गणेश नाचून गेला, शिवरात्रीही गेली सरूनी
उत्सव, व्रतवैकल्यामार्गी उभी शेवटी फाल्गुनी
घराघरातून अग्नि पूजला विनाश करण्या राक्षसीचा
दुष्ट होलिका जळून जाता उत्सव रंगे होळीचा

बंधन सुटले, नियमही झाले सैल जरासे लोकात
सद् भाव, एकजूट सत्कार्यी या भेद निघाले मोडीत
हर्षभरीत होऊनि धुळवडीस या खेळती रंग धुळीचा
आनंदरंगी रंगत असता रंग उडाला पंचमीचा

श्रीरंग खेळतो होळी गोकुळी अन् मथुरा वृंदावनी
सप्तरंगी रंगूनी रंगवी, रंगकर्मी तो रंगारी
वाजवी अलगूज एका हाती दुस-या हाती पिचकारी
मानवता अन् समानता हे रंग उडवीतो गिरिधारी

तन्मय होऊनि गोपगोपिका भजू लागती कान्ह्याला
भान हरपूनि पाहू लागल्या त्या योगेश्र्वर आत्म्याला
नाही वृंदावन, ती मथुरा, गोकुळ श्रीहरी गोपी त्या
आज रंगते होळी अमुची चौकटीत त्या नियमांच्या

नाही सरले कौरव सगळे महाभारती युध्दात
दुर्वर्तनी ते पुन्हा उपजले, समाजपुरूषाच्या कुशीत
दुर्योधन, दुःशासन, शकुनी सदनी राहूच्या जमती
निमित्त होळीचे सांगूनी, दुर्वर्तनी चाळे करिती

विध्वंसक कृत्ये करतांना हात न त्यांचा धरी कुणी
दुराचारी होलिका सोडूनी विवेकास देती अग्नि
अर्थ संपला, रंग उडाला होळीच्या या सणातला
गौरव सरला, भाव लोपला होळीपूजन करण्याला

द्वंद्व चालले मनात आता विकार विचार शक्तीचे
कर्दमि रुतली शालिनता, मानवता, सच्छिलतेसंगे
आव्हान देऊनि द्वंद्वाला त्या विकारावरी मात करा
परिशीलन ते करा स्वतःचे, होळीला साक्षीस धरा

करा होळी त्या वैराची जे एकमेका तोडीतसे
करा होळी अविचारांची जे दुस-यालाही नाडतसे
जाळा कचरा मनातला अन् व्ससनाचीच करा होळी
शुध्द होऊनि एकदिलाने, खा प्रसाद ती पुरणाची पोळी

स्वाती दामले

– रचना : स्वाती दामले.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

२. नको कत्तल झाडांची….

नको कत्तल झाडांची ठेवा भान जगायचे
नाश पर्यावरणाचा का हो त्यांना मारायचे
ते ही असती सजीव देती जीवाला ते जीव
होळी मध्ये जाळून हो काय मिळणार नाव ?

सण साजरा करावा गोड धोड खाऊन तो
जाळा थोड्याश्या गोवऱ्या धूर पण कमी होतो
हजारोंनी लाकडे ती भस्म होळीत होतात
जाळूनी ती लाकडे हो काय मिळते हातात ?

दुष्टप्रवृतींना जाळा होईल समाज निकोप
बंधुभाव वाढवून होईल फायदा हो खूप
जरा डोळसपणाने सण करू या साजरे
नाचा खेळा भोवताली माळा केसात गजरे..

पायी बांधून धुंगरू ठेका धरू या काठीचा
लावू गुलाल गालाला सण पंचमी पाठीचा
जाऊ रंगात रंगून भेदभावच घालवू
ज्ञानज्योत प्राणज्योत प्रेमज्योतीला पालवू..

झाडे वाचविणे आता आहे आपल्याच हाती
नाही तर आयुष्याची पहा होणारच माती
एक एक झाड पहा जगविते माणसाला
स्मरू उपकार त्यांचे जागू माणूसपणाला….

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक

३. होळी सण

षडाक्षरी काव्य रचना

फाल्गुन मासाचा
होतसे आरंभ
नववर्ष होई
उष्मेचा प्रारंभ

पालवी गळते
साठवण करा
काष्ठ झडलेली
ढिगाऱ्यात भरा

अनिष्ठ प्रथांची
बांधू चला मोळी
सद्गुणांची सदा
भरू सारे झोळी

कन्हैयाची होळी
होती किती भोळी
नाच गात खाती
पुरणाची पोळी

गुलाल उधळी
राखेमध्ये पाणी
उडवत मुलं
म्हणतात गाणी

भक्त प्रल्हादाला
होलिकेची कथा
सण सजवती
सुंदरशी प्रथा

एरंडाचे झाड
उभे करतात
शेण्या काष्ठ फुलं
छान सजतात

नक्षीची रांगोळी
सड्याचे शिंपण
होळी पेटवता
शोभते अंगण

होळीच्या सणाला
नियम पालन
निसर्ग देवता
मिटवे क्षालन

पाणी अपव्यय
घातकसे रंग
नच खेळल्याने
दिसेल श्रीरंग

रंगात न्हाऊन
खेळ खेळू खूप
निसर्गाचे मस्त
उजळू स्वरूप

पाचोळा सांगतो
कुकर्माचा नाश
वृक्ष संवर्धनी
नच घडो ऱ्हास

शोभा कोठावदे

– रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️👍9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version