Home साहित्य अगा पंढरीच्या मायबापा !

अगा पंढरीच्या मायबापा !

0

विठूराया ! कळतंय… समजतंय तेव्हापासुन तुझी रूपे बघत आले आहे. अनंत रूपे तुझी. किती डोळ्यात भरून ठेवावी भक्तांनी ? समजून घेताना तू अगदीच साधा भोळा… आपल्या मायबापा सारखाच. शांत, प्रेमळ, अंगाखांद्यावर खेळवणारा, जबाबदारी पार पाडणारा, लेकरांवर सतत छाया धरणारा. हा माहेरचा अनुभव देणारा मायबापच. हीच तुझी खरी ओळख.

भक्तांच्या काळजात अढळ माऊलीचे स्थान शेवटचे वळण आहे. हेच तुझे तुला सांपडलेलं व भक्तांना आवडलेलं खरं रूप आहे. खरोखरचं
“विठू माझा लेकूरवाळा !”
“माहेर भक्तांचे चंद्रभागेतीरी”
हे भक्त म्हणतात तेच खरं.
त्या भक्तीच्या एका रंगात तू आणि तुझी लेकरे आज युगे युगे “अवघा रंग एक झाला” म्हणत धावत पंढरी पोचतात.
तूं जन्माला यायचास…. कंस तुझा मामा तूला मारायला टपलेला. वासुदेवांनी टोपलीतून तूला बाळ म्हणुन यशोदेच्या ओटीत ठेवलं तुझ्यासाठी नदीमातेने पूरातून मार्ग काढुन दिला.
ते बाळरूप गोकूळाने आपल्याच मायेच्या पदराखाली वाढवलं. यशोदेचा नंदन म्हणजे गोकूळाचा आत्माच !
ही नंदाघरची रूपे फार आवडती झाली. मोठा झाल्यावर तुझ्या गोपाळांच्या मुलांबरोबर लोभस पण खट्याळ असा गोपिकांच्या खोड्या काढणारा, मैय्याकडे सतत तक्रारी आणणारा यशोदेचा कान्हा. हे ही रूप फारच मोहक होतं. शिरी डुलणारे मोरपीस, काळे कुरळे कुंतल, भाळी गंध, हातात पायात वाळे, दंडात बाजूबंद गळ्यात माळा आणि हंसरा निरागस चेहेरा. गोकूळातला हा मुरलीधर म्हणजे जीव की प्राण होता.

आतापर्यंतची तुझी नंदाघरची, गोपांबरोबरची, ओठात बांसरी धरलेली आणि राधाचा कृष्णकन्हैय्या ही रूपे फारच मनोहर होती. राजस सुकूमार मदनाचा पुतळा असावा असे वाटते. गुरूगृही सर्व विद्या, कला, निती, कौशल्य प्राप्त केल्यावर तू क्षत्रिय झालास.
लोकांचे पालन पोषण रक्षण ही तुझी जबाबदारी झाली आणि तुला मनात नसुनही तुझे प्रिय गोकूळ, गोपगोपिका, धेनूवासरे, कालिंदी नदी, स्वत:नंद यशोदा व राधा सर्वांना शोकात लोटून द्वारकेला यावे लागले.

खरोखरच एखाद्या योद्ध्यासारखा तू राजबिंडा दिसलास. गोकूळातलं साधं रूप सोडून तू भरजरी वस्त्र सुवर्णालंकार, राजमुगूट यात तू खरोखरच योद्धा, राजा, असा शोभलास. आता तुझे हे द्वारकाधीशाचे रूप फारच देखणे रूबाबदार होते.
मनात राधा, नंद यशोदा व अख्खे गोकूळ विसरताना शतश: विदीर्ण झालेला तू एकांतात विलाप करतानचे रूपही मनी कोरलेले आहे.
सुदाम्याच्या भेटीवेळचा अधीर भावनेने भारलेला द्वारकाधीश पाहुन मन खरोखरच कळवळले रे !
तू त्यावेळी गोकूळच होऊन गेलेला दिसलास. परंतु राजधर्माच्या शृंखलेने तू बांधलेला अगतिक वाटलास. राधेला शेवटी भेटतानाही तू पश्चातापी विरही दिसलास पण तुझे प्रेम तू विसरला नव्हतास.
तिला तुळशीचे रूप देऊन वक्षावरी रूळणारी सतत र्हुदयाजवळी स्थानापन्न करणारी तुळशीमाळा धारण करत प्रेम जपलंस, नव्हे कालाबाधित राखलस. आजही पहिले नाव राधा मगच कृष्ण.
मीरेचा तू शाम !

तिच्यावाटचे वीष प्राशन करून घननीळ झालास. किती सुंदर आहे हा तुझा रंग व रूप.
राजा, योद्धा, क्षत्रीय, द्वारका धीश ह्या रूपांबरोबरच. तूं गुरूगृहीचे गुरूबंधू पांडव यांना मदत केलीस.
महाभारतात पांडवांचा सल्लागार, अर्जूनाचा सारथी, “तुझी लढाई तुलाच लढावी लागेल” हे सांगणारा मित्रसखा, अतिशय चलाख रणनीतीत कुशल, नम्र प्रेमळ अशा सोबत्याचे रूप फारच धीर देणारे, सत्य धर्म याचे पालन करणारे अजरामर झाले.

महाभारतात द्वौपदी साठी सदैव बंधूधर्म पाळलास. तिच्या रक्षणासाठी हाक येताच तू तिच्या पाठी ऊभा राहिलास. हे तुझे स्त्री सन्मान राखणारे, अराजकता नष्ट करणारे रूप धीर गंभीर जबाबदार दिसले. पूढे तिला अक्षयी अन्नपात्र देऊन तू कायमच तिचा बंधूसखा झालास. अतिशय आवडणारे हे रूप होते. महाभारत हे महाकाव्य खरं तर तूच व्यापून टाकलंस अगदी गोकूळाच्या अध्यायासारखे.
फक्त तू आणि तूच दिसलास सुंदर रूपात जिथे तिथे. आता तुला भक्तीत आळवणारी लेकरं दिसू लागली. त्यांच्या भक्तीत तू विरघळून गेलास. जशी दुधात साखर.

तुझा भक्त पुंडलिकाने भक्ती करत काया वाचा बुद्धीने तो विठ्ठलमय झालास. कर्नाटकातून तू या भक्ताच्या भेटीसाठी “विठ्ठल कर्नाटकू” झालास आणि हा कानडा राजा महाराष्ट्रात आला. पुंडलिकाची नगरी ती पंढरपूरी तू आलास. तो मायबापांच्या सेवेत होता म्हणुन तूला वीट दिली त्यावर “वीटेवरी कर कटेवरी” हा बाप ऊभा राहिला.
म्हणून तूझे रूप विठ्ठल … विठूराय झाले. सावळे सुंदर रूप मनोहर झाले.
मग तुझी जास्तीच लेकरे अंगाखांद्यावर खेळू लागली.

ज्ञानोबा निवृत्ती सोपान मुक्ताई ही भावंडे, विसाजी जनाई संत सखूबाई, चोखोबा गोरोबा, नरहरी सोनार, कान्होपात्रा, एकनाथ नामया ही भक्तीमय झालेली, संत तुकोबांसारखी देहभान विसरलेली “काया ही पंढरी… आत्मा हा विठ्ठल” झालेली विठूमय लेकरांचा तू “लेकूरवाळा” झालास. बाप म्हणुन त्यांची सेवा सुद्धा केलीस.

ज्ञानोबांना ज्ञानेश्वरी लिहिताना तूच तर पाठी होतास. पसायदान तूच लिहुन घेतलेस. भिंत चालवलीस रेड्याकडून वेद म्हणवून घेतलेस, सावताचा मळा, चोखोबाची गुरे, गोरोबाची मडकी, जनाईचे दळणकांडण, नाथाघरी पाणी भरणं, सा-र्याच रूपात तू केवळ “लेकूरवाळा बाप”च वाटलास.
शेतकरी, गुराखी पाणक्या दिसलाच नाहीस. इतका लेकरांत गुंतलास. यात सर्वात सुंदर रूप होते महाराघरी जेवतानचे तृप्त रूप. इथेच भक्तीबरोबर जात धर्म, पंथ, ऊचनीचता सारे भेद तू नष्ट केलेस. तुला फक्त भोळा भक्तीभावच आवडतोस हेच तू त्या रूपात दाखवून दिलेस आणि तशीच श्रद्धेनी भक्ती करणारी तुझी लेकरं.

अशी ही अनंतरूपे तू वेळोवेळी दाखवत नेहमीच सत्य व धर्माचे पालन केलेस. बंधूभाव भूतदया शिकवलीस. कर्तव्य श्रेष्ठ हेच सांगितलंस. स्त्री, गुरूजन, रणनिती यांच्याविषयी आदर शिकवलास. खरोखरच अंतरी जपून साठवून ठेवावीत अशीच आहेत.
अनंत रूपात हे विश्वच व्यापून दशांगुळे ऊरलायस तू !
म्हणुनच का रे यशोदा मातेला लोणी नाही खाल्ले म्हणताना … आ…
करत तोड उघडुन विश्वरूप दर्शन दिले होतेस ?
काळ लोटला… युगे सरली.. आता मायमाऊली म्हणुन शेवटच्या वळणावर पंढरपूरी चंद्रभागेतीरी कायमचे मुक्कामी राहिलात. रखमाई रागावली, वेगळी झाली पण तूम्ही वीटेवरी मायबाप म्हणूनच राहिलात. काया वाचे तुमच्या भक्तीत रमलेल्या भक्तांसाठी मायबाप माऊली झालात‌.

हीच तुमची लेकरे वारी करत माहेरी येतात. वारकरी होऊन. आयुष्याच्या संध्याकाळी पैलतीर दिसू लागतो. संध्याछाया घाबरवून सोडतात अशा कातरवेळी या सर्वात आठवते ते तुमचे हेच “मायमाऊली”चे धीर देणारे रूप. हळूवारपणे हात धरून‌ क्लेश न देता पैलतीरी पोचवणारे हे रूप च शाश्वत व आश्वासक असे वाटते.

— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version