Home लेख “अधिकमास : आधुनिक दृष्टिकोन”

“अधिकमास : आधुनिक दृष्टिकोन”

0

समारोप

अधिक मास आणि त्या मासातील प्रथा परंपरा आपण या काळात देखील जमेल तसे पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो परंतु आजच्या एकविसाव्या शतकात आपण आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी देखील बदलत्या काळानुसार कसा बदल करू शकतो याचा थोडा विचार करूया.

तर आपलं आयुष्य मुख्यतः तीन खांबांवर उभं असतं. पहिला खांब म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य, दुसरा खांब म्हणजे कुटुंब आणि इतर नातेसंबंध आणि शेवटचा खांब म्हणजे करियर, आपले छंद आणि आर्थिक स्थैर्य.

जर हे तीन खांब मजबूत असतील तर आयुष्य स्थिर आणि आनंदी असतं. जर एकही खांब कमजोर असेल तर सगळं डळमळतं.

आता बघा इथून पुढे जर आपली दिनचर्या हिंदू सौरगणनेनुसार केली तर तीन वर्षांनी आपल्याला एक अख्खा महिना जास्तीचा मिळणार आहे. आजकाल तर कॉर्पोरेट जगात तीन वर्षांचे, पाच वर्षांचे बिझनेस प्लॅन्स बनतात पण आपल्या पूर्वजांनी हे आधीच सांगून ठेवलं आहे. दर तीन वर्षांनी थांब.. मागे बघ आणि पुढचं ठरव.

अधिकमास हा पुरुषोत्तम मास आहे. भगवान विष्णूंचा विशेष महिना आणि म्हणूनच या काळात बाहेरचे लक्ष विचलित करणाऱ्या घटना, जसे की शुभकार्य, विवाह, वास्तुशांती या कार्याच्या ऐवजी अंतर्गत आत्मचिंतन आणि परिवर्तनासाठी विशेष वेळ दिलेला आहे. थोडक्यात अधिक मास म्हणजे “रिव्ह्यू, रिसेट अँड रिस्टार्ट” म्हणजेच पुनवरालोकन वा समीक्षा करण्याचा वेळ.

मी स्वतः या अधिकमासात विचार करत होते की मागच्या तीन वर्षात आयुष्यात काय काय झालं ? २०२३ मध्ये मी कुठे होते आणि आज २०२६ मध्ये मी कुठे पोहोचले आहे ?

आपल्याला मुख्यत: तीन गोष्टींबद्दल विचार केला पाहिजे. पहिली म्हणजे स्वतःची काळजी.. शारीरिक आणि मानसिक आरोग्य !

मागच्या तीन वर्षात माझे वजन वाढले का कमी झाले ? एनर्जी लेवल कशी आहे ? झोप नीट लागते का ? स्क्रीन टाईम किती वाढला ? मानसिक शांती आहे का ताण-तणाव ?

हे प्रश्न स्वतःला विचारले तर खरं चित्र समोर येतं. कधी कधी आपल्याला वाटतं की सगळं ठीक आहे. पण प्रामाणिकपणे बघितलं तर समजते की कुठे कुठे घसरण झाली आहे, कुठे डागडुजीची गरज आहे तर कुठे प्रगती देखील आहे.

पुढच्या तीन वर्षांसाठी काय करता येईल ? रोज थोडा व्यायाम, झोपेची वेळ ठरवणं, मोबाईलचा वापर कमी करणे अशा छोट्या गोष्टी मोठा फरक करू शकतात.

आता दुसरा महत्त्वाचा खांब म्हणजे कुटुंब आणि नातेसंबंध !
मागच्या तीन वर्षात कुटुंबातील नाती कशी राहिली ? जोडीदाराशी मनमोकळे बोलणे होते का ? मुलांच्या आयुष्यात काय चाललंय ते माहित आहे का ? त्यांचे मित्र कोण, त्यांची स्वप्न काय, त्यांच्या समस्या काय ? आई-वडिलांशी भावंडांशी संपर्क किती आहे ?

आजकाल सगळे एकाच घरात राहतात. पण प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मध्ये असतो. शरीर एकत्र असत पण मन वेगवेगळ्या ठिकाणी असतं.
पुढच्या तीन वर्षात काय करता येईल रोज थोडा वेळ “डिवाइस फ्री फॅमिली टाईम”. आठवड्यातून एकदा एकत्र काहीतरी करणं. महिन्यातून एकदा आई-वडिलांना भेटणं, व्हिडिओ कॉल करणं अशा छोट्या गोष्टी नाती मजबूत करतात नाही का ?
आपल्यातल्या सगळ्या जणीच आपण ह्या बाबतीत खूपच सावधता बाळगतो आणि ही नात्यांची वीण घट्ट पकडून ठेवतो यामध्ये शंका नाही पण काही वेळेस आत्मचिंतन करणे जरुरीचे ठरते.

आता शेवटचा तिसरा खांब करिअर छंद आणि आर्थिक स्थिरता !
जे नोकरी करताय त्यांच्यासाठी मागच्या तीन वर्षात करिअर कुठल्या दिशेने गेले ? नवीन स्किल्स शिकलो का ? उत्पन्न वाढले का ? आर्थिक सुरक्षितता आहे का ? हे आपण आपल्या मुलांना सांगू शकतो आणि आपल्यासाठी आपण स्वत:ला विचारू शकतो. स्वतःला आवडीचे तीन वर्षात कोणते छंद मी जोपासले ? काही नवीन शिकले का ? संगीत, चित्रकला, लेखन, बागकाम जर मी शिकायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये मी किती प्रगती केली आहे ? आर्थिक बाबी व्यवस्थित आहेत का ? पुढच्या तीन वर्षांसाठी काय करता येईल ?

एक नवीन कौशल्य शिकणं, नवीन छंद जोपासणं, आर्थिक बाबींची व्यवस्था करणं, या गोष्टी आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनवतात. म्हणजेच आजच्या कॉर्पोरेटच्या भाषेत सांगायचं तर आपण पुढच्या तीन वर्षासाठी चा “Pivot Plan” आपण तयार करतोय. जिथे आपण पूर्णपणे आपलं आयुष्य जिथे कुठे बदल आवश्यक आहे तिथे बदल करण्यासाठी नियोजन करतो.

मंडळी, आपण 21व्या शतकात राहतोय. जग झपाट्याने बदलतय. टेक्नॉलॉजी बदलते, नोकऱ्या बदलतायत, जगण्याची पद्धत बदलते अशा काळात अधिकमासाचे महत्त्व कमी झालंय का ?

मला वाटते उलट वाढलंय. आजकाल सगळे इतके बिझी आहेत की थांबून विचार करायला वेळच नाही. सकाळी उठलो, ऑफिसला गेलो, रात्री आलो मोबाईल बघितला आणि झोपलो.
असे दिवस जातात, वर्षे जातात आणि एक दिवस मागे वळून बघतो तेव्हा समजतं की आयुष्य हातातून निसटून गेलं.

या अधिकमासात एक वेगळा दृष्टिकोन घेऊन बघता येईल हा काळ म्हणजे आपल्या आयुष्याच्या पुस्तकातील एक कोरे पान आहे. मागच्या तीन वर्षांचा स्वतःच्या आरोग्याबद्दल कुटुंबांच्या नात्यांबद्दल करिअर किंवा छंद बद्दलच आत्मचिंतन, पुढच्या तीन वर्षांमध्ये काय बदलायचे काय नवीन करायचे कुठे पोहोचायचे याची दिशा ठरवता येईल आणि तेहतीस दिवसात एक छोटी सवय बदलता येईल जी दशावतारांच्या टप्प्यातून जाऊन पक्की होईल.

अधिकमास आपल्याला सांगतोय.. थांब ! 30 दिवस थांब. मागे बघ, आत्मचिंतन कर, पुढे बघण्याचा प्रयत्न कर. जसं कॉम्प्युटरला रिस्टार्ट लागतं तसं माणसालाही रिस्टार्ट लागतच असते.. नाही का ? आणि अधिक मास हा आपला “एन्युअल” किंवा वार्षिक रिस्टार्ट आहे, फक्त तीन वर्षांनंतर येणारा रिस्टार्ट, असे मला वाटते. आपल्याला काय वाटते ते जाणुन घ्यायला आवडेल.
धन्यवाद.
लेखमाला समाप्त…

ऋचा कुलकर्णी.

— लेखन : ऋचा कुलकर्णी. सिंगापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +919869484800.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version