आपल्यात एक म्हण आहे, जी आजच्या समाज माध्यमांच्या काळात फार लागु पडते, ती म्हणजे “दिसते तसे नसते, म्हणुन जग फसते !” त्यात आजकाल काही खोडसाळ माणसे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून खोटानाटा, फसवा मजकूर अशा पद्धतीने तयार करतात की, भली भली मंडळी सुद्धा फसतात. काही वेळा त्यांचे हसे होते तर काही वेळा त्यांना कायदेशीर कारवाईला तोंड देण्याची वेळ येते. यात पुन्हा आर्थिक फसवणूक, विवाह विषयक फसवणूक हे तर स्वतंत्र लेखाचे विषय आहेत.
नुकतेच माझ्या एका सहकार्याने मला केसरी वृत्तपत्राचा 28 सप्टेंबर 1927 चा अंक पाठविला. मी स्वतःच काही काळ केसरी वृत्तपत्रात काम केले असल्याने तो अंक मोठ्या आत्मियतेने काळजीपूर्वक वाचला आणि माझ्या लक्षात आले की, जो अंक आता फक्त केसरीच्या संदर्भ शाखेतच उपलब्ध आहे, तो असा जाहीर कसा होऊ शकेल ? पुन्हा त्या बातमीचा विषय, भाषा, शैली सर्वच संशयास्पद वाटत होती. म्हणुन मी त्या सहकार्याला कळविले की, हा बनावट अंक दिसतोय, तू तो अजून कुठे पाठवू नकोस, अन्यथा अडचणीत येशील.

माझी ही शंका दुसर्याच दिवशी खरी ठरली. कारण केसरी वृत्तपत्रात आर एस एस विरोधी, पहिल्या पानावर छापल्या गेलेली ती खोटी बातमी वाचून, तिच्यावर विश्वास ठेऊन माजी न्यायमूर्ती श्री बी जी कोळसे पाटील यांनी टीकेची झोड उठवली. नंतर भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याने माजी न्यायमूर्ती श्री बी जी कोळसे पाटील यांनी खोट्या बातमीच्या आधारे बदनामी केली, म्हणुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जाहीर केल्याची बातमी तरुण भारत वृत्तपत्राच्या 11 जुलै 2026 अंकात पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध झाली.
आपण मुळात हे लक्षात घेतले पाहिजे की असा खोटा, खोडसाळ मजकूर पत्रकार लिहितच नाहीत. काही उपद्रवी व्यक्ती तो तयार करून गंमत बघत बसतात. बर्याचदा फार मोठ्या व्यक्ती सुद्धा अशा खोट्या बातम्यांना बळी पडतात आणि त्यांचे हसू होते, ज्याचे नुकतेच घडलेले उदाहरण वर दिले आहेच.
त्यामुळे आता जे काही दिसते, त्यावर सरसकट विश्वास न ठेवता, त्याची खातरजमा करूनच घेतली पाहिजे. असे काही आपल्याला जरी कुणा मित्राने, परिचिताने पाठविले असेल तरी निदान आपण तरी ते पुढे पाठवित जाऊ नये. अन्यथा आपले हसू होईल तर कदाचित काही बाबतीत कायद्याचा बडगा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही !
दिवसेंदिवस जसजसे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचे तंत्र लोकांना अवगत होत जाईल, तसतसे उपद्रवी लोकांकडून त्याच गैरवापर करण्याचे प्रमाण वाढतच जाईल असे दिसते. त्यामुळेच आपण अधिकाधिक सावध राहिले पाहिजे. अशा खोट्या बातम्यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचे, एखाद्या व्यक्तिची बदनामी करण्याचे प्रकार वाढीस लागतील. या सर्व गैरप्रकारांना प्रभावीपणे कसा आळा घालायचा, हे सरकार पुढील मोठेच आव्हान आहे.
या अशा प्रकारच्या घटना तुमच्या बाबतीत घडल्या आहेत का ? याबाबतीत तुमचे मत काय आहे ? कृपया अवश्य कळवा.
— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️+91 9869484800